उद्धव ठाकरे यांचा कारभार फेसबुकवरून चालणार का?-राधाकृष्ण विखे-पाटील #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्वर प्रसिदध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा-

1. मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरून चालणार का?- राधाकृष्ण विखे पाटील

कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का? असा सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही असा आरोपही त्यांनी केला.

भाजपतर्फे 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आलं. परप्रांतीय कामगारांसाठी उपाययोजना नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

2. आता आदेश मीच देणार- गोंधळ टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा निर्णय

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही अशी टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर 'आता आदेश फक्त मीच देणार' असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 'झी 24तास'ने ही बातमी दिली आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या सूचनांमध्ये स्थानिक पातळीवर परस्पर कोणतेही बदल करू नका, असे बजावण्यात आले.

3. मोदींचं पॅकेज म्हणजे फसवणूक- के.चंद्रशेखर राव

'कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यातून त्यांनी आकड्यांचा खेळ केला आहे. केंद्राकडून राज्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जाते,' असा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

चंद्रशेखर राव यांनी म्हटलं, की मोदींचं पॅकेज म्हणजे केंद्राने केलेली हवा आहे. केंद्राने स्वत:ची प्रतिष्ठा कमी करून घेतली आहे. या पॅकेजमधून सामंतशाही आणि हुकूमशाही दिसते.

कोरोनामुळे राज्यांचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना निधीची आवश्यकता आहे. संघराज्य पद्धतीत अशा प्रकारचं धोरण असू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

4. अर्णब गोस्वामी खटला सीबीआयकडे तपास सोपवण्यास कोर्टाचा नकार

पालघर झुंडबळी प्रकरणातील चर्चेवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर इतर राज्यात दाखल असलेल्या सर्व प्राथमिक माहिती अहवालांच्या चौकशा रद्दबातल केल्या.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाची चौकशी रद्द करण्यास मात्र नकार दिला आहे. या प्रकरणाचीचौकशी केंद्रीय अन्वेषण शाखेकडे (सीबीआय) वर्ग करण्याची गोस्वामी यांच्या वतीने करण्यात आलेली विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. 'दैनिक जागरण'ने ही बातमी दिली आहे.

पत्रकारितेचे स्वातंत्र्य हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ गाभा आहे, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यातून लोक व देशाचे स्वातंत्र्य मजबूत होत असते. भारतातील स्वातंत्र्य जोपर्यंत पत्रकार सुडाच्या कारवाईला न घाबरता सत्तेविरुद्ध सत्य बोलतात तोपर्यंतच आहे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी मांडले.

रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांनी हे मत मांडले.

5. अॅसिड हल्ल्यावर व्हीडिओ बनवणं टिकटॉक स्टारला महागात

अॅसिड हल्ल्यावर व्हीडीओ बनवणं टिकटॉक स्टार फैजल सिद्दिकीला चांगलंच महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी फैजलवर जोरदार टीका केली असून त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्याचीही मागणी अनेकांनी केली आहे.

महिलांवरील अॅसिड हल्ल्याचं उदात्तीकरण केल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे, तर टिकटॉक या अॅपने कारवाई करत फैजलचा वादग्रस्त व्हीडीओ अॅपवरून काढून टाकला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फैजल सिद्दिकी टिकटॉक स्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे टिकटॉकवर 1 कोटी 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या व्हीडिओत तो आधी एका मुलीला धमकी देतो आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकतो. त्यापुढील दृश्यात मुलीचा विद्रुप चेहरा दाखवण्यात आला. या व्हीडिओतून फैजलने अॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्याचं उदात्तीकरण केल्याची टीका करत महिला आयोगाने निषेध व्यक्त केला आहे.

फैजलच्या या व्हीडिओनंतर सोशल मीडियावर #BanTikTok आणि #FaizalSiddiqui हे हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होऊ लागले होते. अनेकांनी टिकटॉक या अॅपवरच बंदी आणण्याची मागणी केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)