गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी प्रसिद्ध केलेली ही मुलाखत पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

खडसेंनी त्यांच्यावर केलेले आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या अर्जाला घेतलेला आक्षेप आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी बीबीसी मराठीच्या नीलेश धोत्रेंशी बोलताना उत्तरं दिली.

त्या मुलाखतीचा हा संपादित अंश -

एकनाथ खडसेंनी टीका करताना तुमच्या जुन्या व्हीडिओचा दाखला दिला आहे - तुमच्या पक्षाबाबतच्या निष्ठेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भविष्यात तुमच्या विरोधकांकडून अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला जाईल, त्यावर तुमचं काय उत्तर असेल?

यावर बोलण्याइतपत मी मोठा कार्यकर्ता नाही. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील बोलले आहेत. त्यामुळे यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. खडसेसाहेब मोठे नेते आहेत. पक्ष त्यांच्याबाबत बोलेल. मी साधा कार्यकर्ता आहे.

लोकसभेला तुम्ही 'मोदी गो बॅक'ची घोषणा दिली होती. सहा महिन्यात तुम्ही परत आलात. पार्टी सोडल्यानंतर बरेचदा नेते मोठ्या नेत्यावर टीका करत नाहीत, पण तुम्ही केलीत. आता अशी टीका करायला नको होती असं वाटतं का? कारण खडसे तोच मुद्दा धरून बसलेत...

मी कुठलंही चुकीचं विधान केलेलं नाही, वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलं नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप पक्ष सोडला होता. पण आता धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर मी भाजपमध्ये परत आलो. त्यानंतर मी बारामती लढवली. आता सहासात महिने झालेत. त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे.

देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात चांगल्या पद्धतीने मांडू शकले. ते त्यांनी आणलं. पण धनगर आरक्षणाबाबत ते कमी पडले, असं वाटतं का?

राज्यात धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असं सर्क्युलर काढा, अशी आमची मागणी होती. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या आणि आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी आमची मागणी होती. पण ती यशस्वी होऊ शकलं नाही.

पण धनगड आणि धनगर हे एकच आहे हे सरकारनं आम्हाला लेखी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. ते आता आम्ही कोर्टात सादर केलं आहे. त्यामुळे आज ना उद्या आम्हाला निश्चितपणे न्याय मिळू शकतो. भाजप धनगरांच्या आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. भाजपच धनगरांना न्याय देईल, असा लोकांचा आग्रह होता म्हणून मी भाजपमध्ये परत आलो.

गोपीचंद पडळकर यांची राजकीय विचारधारा कुठली? तुम्ही धनगरांसाठी भाजपमध्ये आला आहात की भाजपचं हिंदुत्व तुम्हाला पटतं?

भाजप बहुजनांना संधी देणारी पार्टी आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार केला तर राजकीय शक्ती जास्त नसलेल्या छोट्या छोट्या समूहांना न्याय देण्याचा भाजपचा अजेंडा आहे. तो फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या जास्तीतजास्त घटकांना भाजप न्याय देऊ शकते, हा माझा ठाम विश्वास आहे, ठाम भूमिका आहे.

भाजपमध्ये बहुजनांसाठी काम करणार अनेक नेते आहेत. पंकजा ताई किंवा एकनाथ खडसे त्यांच्यापैकीच आहेत. यांच्याशी काही चर्चा झाली आहे का? या नेत्यांना बरोबर घेतल्याशिवाय बहुजन समाजासाठी काम करणं शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?

पंकजा ताई, नाथाभाऊ हे जुनेजाणते नेते आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू. नेतृत्वच केलं पाहिजे, असं काही नाही. पण आपली जी भावना आहे, ती मुळापासून आहे. त्यात आपण थोडी-थोडी भर टाकत जाऊ.

निवड झाल्यानंतर पंकजाताई किंवा खडसेंशी काही बोलणं झालं आहे का? त्यांचा कुणाचा अभिनंदनाचा फोन आला होता का?

नाही, अजून बोलणं झालेलं नाही. अजून चर्चा झालेली नाही.

विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार, असं भाजपकडून कधी कळलं होतं? तेव्हा तुम्ही कुठे होतात?

मला आदल्यादिवशी समजलं... 5 मे रोजी. तेव्हा मी शेताकडे होतो.

खडसेंनी आरोप केला आहे की या उमेदवारांना मार्चमध्ये सांगण्यात आलं होतं, कारण त्यांच्या प्रतिज्ञापत्रांवरच्या तारखा मार्चच्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातल्या सर्व स्टँप वेंडरकडे असलेल्या स्टँपवर 19, 20 आणि 21 मार्चचे शिक्के आहेत. त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होतोय. माझा स्टँप मी 5 मे रोजी संध्याकाळी घेतला होता. उद्धवसाहेबांच्या स्टँपवरचा शिक्का 19 मार्चचा आहे. पण त्याचा मागे मात्र इशू कधी केला आहे, त्याचा सुद्धा स्टँप आहे आणि तो 5 तारखेचा आहे.

मी अनेक निवडणुका लढवल्यामुळे माझी सर्व कागदपत्रं तयार होती, पण 5 तारखेच्या आधी मला पूर्व कल्पना मात्र नव्हती.

विषय प्रतिज्ञापत्राचाच निघाला आहे तर, तुमच्यावर गुन्हे लपवण्याचे आरोप करण्यात आले, मग ते आयोगासमोर टिकले नाहीत. पण त्यामागे अजित पवार आणि जयंत पाटील यांचं कटकारस्थान आहे, असं तुम्ही म्हटलं. ते लवकर उघड करू असंही तुम्ही म्हटलं. नेमकं काय कटकारस्थान आहे?

निवडणूक बिनविरोध ठरली होती, पण तरीही जयंत पाटील यांनी त्यांच्या खात्यातल्या लोकांना कामाला लावून माझ्यावरील केसेसची माहिती घेत होते. माझ्या वकिलांशी त्यांनी चर्चा केली होती. हे सर्व योग्य नाही. त्यांनी आक्षेप घेण्यासाठी पूर्वतयारी केली होती, पण आयोगानं मात्र कोर्टात जाण्यास सांगितलं.

राष्ट्रवादीचा मूळ जातीयवाद हा स्वभाव जात नाही. त्यांना पैपाहुण्यांचं राजकारण करायचं आहे. तेच त्यांना पुढे न्यायचं आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलिसांना पत्र पाठवून माहिती घेणं, या काही चांगल्या गोष्टी नाहीत.

बारामतीमध्ये अजित पवार यांना 1 लाख 95 हजार 641 मतं मिळाली. तर पडळकर यांना 30 हजार 376 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या मतांची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकाची आहे. ती साधारण 20 टक्के आहेत, पण ती सुद्धा सगळी मतं तुम्हाला मिळाली नाहीत. तिथला धनगर समाज तुमच्यावर नाराज आहे, असं म्हणायचं का?

लोकांनी मला तिथं नाकारलं. अजित पवार दोन वेळा रडल्याचं असेल किंवा पवार कुटुंबीय अडचणीत आल्याची चर्चा असेल किंवा ईडीची नोटीस असेल, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना चांगली मतं मिळाली. पण धनगर समाज माझ्यावर नाराज आहे, असं मला वाटत नाही.

बारामतीपेक्षा खानापूर मतदारसंघ लढता असतात तर जास्त फायदा झाला असता, असं वाटतं का? एक हक्काचा मतदारसंघ कायम हाताशी राहिला असता, असं नाही का वाटत?

असं काही नाही. मला कुठलंही दुःख नाही. मला देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड विश्वास आहे. त्यांना मी एकही शब्द बोललो नाही, की मला बारामतीमध्ये कशाला पाठवताय. त्यांनी सांगितलं त्या प्रमाणे मी बारामती लढलो. त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. मला काहीही वाईट वाटत नाही, कुठलीही शंकाकुशंका नाही. भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडायचं मी ठरवलं आहे.

विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर तुमचे जुने सहकारी महादेव जानकर यांच्याशी काही बोलणं किंवा फोन झाला आहे का?

नाही, साहेबांचा फोन आलेला नाही. मी त्यांना विधान परिषद सुरू झाल्यावर भेटणार आहे. त्यांचे दर्शन घेणार आहे.

गोपीचंद पडळकर यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे - महादेव जानकर, विकास महात्मे की गोपीचंद पडळकर स्वतः?

आपल्या नेतृत्वाशी कधीही स्पर्धा करायची नसते. मी छोटा कार्यकर्ता आहे, अनेकांनी याआधी आरक्षणासाठी त्यांचं आयुष्य खर्ची केली आहेत. त्याचं काम खूप मोठं आहे. अण्णासाहेब डांगे, विकास महात्मा, महादेव जानकर, गणपतराव देशमुख यांचं काम खूप मोठं आहे. आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. या सर्वांना मी माझा नेता मानतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)