You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विनोद तावडे: 'खडसेंचं तिकीट फडणवीस किंवा चंद्रकांत पाटलांनी कापलं नाही'
विधान परिषदेवर संधी न मिळाल्यामुळे राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे नाराज आहेत अशी चर्चा होती. एकनाथ खडसेंची पक्षावरील नाराजी आणि एकूणच पक्षात असलेल्या वातावरणाबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांच्याशी बीबीसी मराठीने बातचीत केली.
विधानसभेचं तिकीट नाकारलं हे खरंय. पण विधानपरिषदेसाठी मी नाही म्हटलं. विधानसभेचं तिकीट मिळालं नाही तेव्हा नाराज होतो ते का नाही मिळालं याचं उत्तर आजही मिळू शकलेलं नाही. ती चर्चा योग्यवेळी होईल. त्याची स्पष्टता मी नक्की करुन घेईन. मला विधानसभा दिली, लोकसभा दिली तर मी जाईल असं विनोद तावडे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं.
मंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा नाही
मी गायब नाही. पूर्वी मी अनेक वर्षे बोललेलो आहे. आता शेलार, दरेकर बोलतात. जसे पूर्वी फडणवीस नागपूरविषयी अधिक बोलायचे. आता ते 7-8 वर्षात ते महाराष्ट्राविषयी बोलतात. मी सक्रिय आहे.
आमदार, मंत्री होण्याची महत्वाकांक्षा नाही. पक्षाने सांगितलं आमदार हो, व्हायचं. विरोधी पक्षनेता हो व्हायचं. 1999 ला माझ्यापेक्षा सिनियर नेते असताना मला भाजप अध्यक्ष केलं. त्यावेळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्यांना डावललं असं म्हणता येईल का?
खडसे, मुंडे यांची नाराजी
मी समितीत नसल्याने त्यांना उमेदवारी का मिळाली नाही हे माहिती नाही. खडसेंनी पक्ष उभा करण्यासाठी मेहनत घेतली. आता तिकीट नाकारलं याचा अर्थ पक्षाने सर्वस्वी दूर केलंय असं असण्याचं काही कारण नाही माझं सगळ्यांशी बोलणं झालंय. चर्चाही होतेय.नाथाभाऊंच्या कामाचं योगदान कुणीही दूर करू शकत नाही. त्यामुळे त्यांना आज नाही तर उद्या संधी मिळेल. त्यांच्या क्षमतेचं काम देण्यात येईल.
पंकजाताईंशी दिवसाआड बोलणं होतं. विधानपरिषदेविषयी बोलणं झालं. जे म्हणायचं आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे.त्यांनी भाजपमध्येच राहिलं पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यांचं पक्षात मोठं योगदान. ते पक्ष सोडणार नाहीत. केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल. घाम गाळून, रक्त आटवून पक्ष उभा केलाय.भाजपमध्ये कायम केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असतं. राज्यात कुणी कुणाचं तिकीट कापलंय असं मला वाटत नाही. पक्ष सोडण्याबाबत खडसे ते असा काही निर्णय घेणार नाहीत त्यांच्या डोक्यात असं काहीही नाही. सत्ता गेल्यामुळे पंकजा, नाथाभाऊ जातील अशा चर्चा होत असतात.
पक्षाच्या बाजूने
देवेंद्र फडणवीसांनी माझ्या तिकिटासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांचा दोष आहे असं मी अजिबात मानत नाही. मी कुणाच्याही बाजूचा नाही. मी पक्षाच्या बाजूने आहे.
काँग्रेसला नाथाभाऊंच्या स्वागताची संधी मिळणार नाही
बाळासाहेब थोरातांना नाथाभाऊंच्या स्वागताची संधी अजिबात मिळणार नाही. खडसेंनी काही दशकं पक्ष वाढवला आहे. नाथाभाऊ पक्ष सोडतील असं मला वाटत नाही. त्यांना विधानपरिषदेची अपेक्षा होती. केंद्राने असा निर्णय का घेतला त्यांचीही बाजू असेल. चर्चा करुन तो विषय संपेल. पण त्यांची नाराजी स्वाभाविक आहे.
ती योग्यवेळी दूर होईल असं वाटतं.देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील यांनी व खडसे, मुंडे यांच्यासाठी खूप आग्रह केला होता. पण प्रत्यक्षात केंद्राने वेगळे निर्णय घेतले. नाथाभाऊंची नाराजी दूर करण्याइतका मी मोठा नाही. केंद्रीय नेतृत्व त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल.
कर्तृत्व आणि क्षमतेप्रमाणे काम दिलं जाईल
विधानसभा, विधानपरिषद उमेदवारी मिळण्याबाबत फडणवीसांचा संबंध नाही. माझं कर्तृत्व आणि क्षमतेप्रमाणे मला काम दिलं जाईल असा मला विश्वास. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंधविधानसभा पराभवानंतर विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळेल, असं वाटल्याने नाराजी वाढते. सत्ता आली असती तर १२-१३ जणांना उमेदवारी देता आली असती. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील मुद्दाम करत आहेत असं मला वाटत नाही.
नोकरशहा जुने हिशोब चुकते करत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातही हे पहायला मिळालं आहे.राजेश टोपे आणि अनिल देशमुख सोडले तर कुणीही लोकांमध्ये फिरत नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण कुठेही फिरताना दिसत नाही पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये सर्व अधिकारी दिसतात. पण आपले केवळ उद्धव ठाकरे दिसतात. पुणे, कोकण अशी जबाबदारी वाटून घ्यायला हवी.नोकरशाहीच्या ताब्यात सगळं दिलंय. आणि नोकरशाही आपले जुने हिशेब चुकते करताना दिसतेय. अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन काही होणार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)