उद्धव ठाकरे: महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केलं. राज्याने 70,000 उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. असं उद्धव यांनी म्हटलं.

इतर देशांमध्ये जे काही झालंय, ते मला महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाहीय. टीकेचा धनी झालो तरी चालेल. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

या संवादातील 5 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देत आहोत.

1. 'कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राची पूर्ण तयारी'

महाराष्ट्रात एकूण 1484 कोव्हिड केअर सेंटर आहेत आणि अडीच लाख बेड्स महाराष्ट्रात तयार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

"मुंबईत बीकेसी, रेसकोर्स, वरळी, ठाणे, मुलुंड चेकनाका इत्यादी ठिकाणी कोरोना केअर सेंटर तयार ठेवलेत. ऑक्सिजनची सुविधा असणारे जास्तीत जास्त बेड्स आहेत, आयसीयू बेड्स सुद्धा उपलब्ध करून देत आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.

तसंच, यावेळी उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं की, महाराष्ट्राला आणखी कोव्हिड योद्धे आणखी हवेत. ज्यांना सेवा करण्याची इच्छा असेल, त्यांनी स्वत:हून पुढे आले पाहिजे

2. 'आतापर्यंत 40 हजार उद्योग सुरू'

"राज्यात आजपर्यंत 70 हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलीय. त्यातील 50 हजार उद्योग सुरू झालेत. पाच लाखांपर्यंत कामगार कामावर रुजू झालेत," अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी नवीन उद्योगांना राज्यात येण्यासाठीही योजना जाहीर केली.

ते म्हणाले, "जवळपास 40 हजार एकरापेक्षा जास्त जमीन नवीन उद्योगांसाठी राखून ठेवतोय. ग्रीन इंडस्ट्री म्हणजे प्रदूषणविरहित उद्योगांना परवानगीसाठी अटी ठेवणार नाही. 'या आणि उद्योग सुरू करा', असं आपलं धोरण असेल. आता ज्यांना जमीन घेण्यास जमणार नाही, त्यांना भाडेतत्वावर जमीन देऊ."

3. 'महाराष्ट्र आत्मनिर्भर करू'

स्थलांतरित मजूर परत गेल्यानं मजुरांचा तुटवडा पडू नये म्हणून स्थानिकांनी पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

"कामगारांची उणीव आहे कारण परराज्यांमधले अनेक मजूर गेले आहेत. त्यामुळे जिथे उद्योगधंदे सुरू झालेत, तिथे भूमीपुत्रांची गरज आहे. ग्रीन झोनमधल्या मराठी तरुणांनी आता घराबाहेर पडावं आणि उद्योगांना मनुष्यबळ पुरवावं. भूमिपुत्रांनो पुढे या," असं आवाहन ठाकरेंनी केलं.

तसंच, आपला महाराष्ट्र आपल्या पायांवर उभा करू, मोदीजींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करू, असंही ठाकरे म्हणाले.

4. 'महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार'

"मार्चपासून लॉकडाऊन केलं नसतं, तर देशात, महाराष्ट्रात, मुंबईत किती मृत्यू झाले असते, याच्या अंदाजाचा विचार केला तरीही अंगावर काटा येतो. शृंखला तोडली नसली, तर लॉकडाऊनमुळे विषाणूच्या प्रसाराची गती कमी झाली," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कुणालाही घरी डांबून ठेवण्यासारखी शिक्षा नाही, असं म्हणत ते पुढे म्हणाले, "इतर देशांमध्ये जे काही झालंय, ते मला महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाहीय. टीकेचा धनी झालो तरी चालेल. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे."

5. 'गावी जाण्याची गरज नसेल तर घाई करू नका'

"मुंबईत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोक राहतात. अनेकजण गावी जात आहेत. पण गावी जाण्याची गरज नसेल तर अस्वस्थ होऊन घाई करू नका," असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

"काही जिल्हे ग्रीन झोन आहेत. ते ग्रीनच ठेवायचे आहेत. मुंबईतून गेलेल्या लोकांमुळे तिथे कोरोना पसरू नये याची काळजी घ्यायला हवी," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)