हाफकिन: महाराष्ट्रात येऊन युक्रेनच्या 'या' डॉक्टरांनी लाखो भारतीयांचे प्राण वाचवले

    • Author, हरजिंदर
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

साथीच्या जीवघेण्या रोगापासून सुटका करणाऱ्या देवदुताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

मुंबईत काही वर्षांपूर्वी शिवसेनेने हाफकिन इन्स्टिट्युटच्या परिसरात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी हाफकिन इन्स्टिट्युटचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. पुढे स्मारकाची जागा बदलण्यात आली. मात्र, या घटनेने दाखवून दिलं की ज्या व्यक्तीने आपल्या देशाला दोन मोठ्या साथीच्या आजारापासून वाचवलं त्याचा आपल्या सगळ्यांनाच कसा विसर पडला आहे.

त्या व्यक्तीचं नाव आहे व्लादेमार मोर्डेकई हाफकिन. युक्रेनमध्ये जन्मलेले व्लादेमार हाफकीन योगायोगाने भारतात आले. मात्र त्यांनी त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची 22 वर्ष भारतातच घालवली.

सेंट पीट्सबर्गमधून त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. मात्र ते प्राध्यापक होऊ शकले नाही. तत्कालीन झारच्या रशियन साम्राज्यात एका ज्यु धर्मियाला एवढा मोठा सन्मान मिळणं शक्यच नव्हतं. यामुळे उद्विग्न झालेल्या हाफकीन यांनी युक्रेनला रामराम ठोकला आणि ते जिनेव्हाला गेले. जिनेव्हामध्ये ते फिजियोलॉजी विषयाचे प्राध्यापक झाले. मात्र, त्यांचं मन लागेना. त्यामुळे ते पुढे पॅरिसला गेले. तिथे त्यांना त्यांचे गुरू मिळाले. लुई पाश्चर.

पाश्चर इन्स्टिट्युटमध्ये ते असिस्टंट लायब्रेरियन म्हणून रुजू झाले. मात्र, नोकरीसोबतच त्यांनी बॅक्टिरियोलॉजीचा अभ्यास सुरू ठेवला. यातूनच पुढे ते कॉलराच्या लसीच्या संशोधनाकडे वळले. व्लादेमार हाफकिन यांनी कोंबडा आणि गिनिपिगवर चाचणी घेतल्यानंतर स्वतःला ही लस टोचून घेतली. त्यांनी जी लस तयार केली होती त्याची दोन इंजेक्शन्स एका ठराविक अंतराने घ्यावी लागायची.

आपलं संशोधन यशस्वी झाल्याची खात्री पटल्यानंतर लस मोठ्या प्रमाणावर वापरावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्यावेळचे इतर शास्त्रज्ञ त्यांच्या संशोधनाशी सहमत नव्हते. त्यांचे गुरू लुई पाश्चरदेखील नाही.

भारतातही मोठा विरोध

त्याआधीही एक लस विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तो चुकीचा निघाला. त्यावेळी असं मानलं जाऊ लागलं होतं की कॉलरा आतड्यांमधला आजार आहे. त्यामुळे लस त्यावर उपाय ठरू शकत नाही.

याच दरम्यान योगायोगाने डॉ. हाफकिन यांची भेट लॉर्ड फ्रेडरिक हेमिल्टन डफरीन यांच्याशी झाली. ते पॅरिसमध्ये ब्रिटिश राजदूत होते आणि त्याआधी भारताचे व्हॉईसरॉय म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं होतं. भारतात मोठ्या प्रमाणावर कॉलराची साथ आली होती.

लॉर्ड फ्रेडरिक यांना वाटत होतं की या लसीचा वापर बंगालमध्ये झाला पाहिजे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे हाफकिन लवकरच भारतात आले.

मार्च 1893 मध्ये ते कोलकत्याला पोहोचले. मात्र, भारतातही त्यांना बराच विरोध झाला. लस उपयोगाची नाही, असा त्यावेळी समज होता. शिवाय, जर्नल ऑफ मेडिकल बायोग्राफीमध्ये असंही छापून आलं होतं की डॉ. हाफकिन यांनी पॅरिसमध्ये कॉलरा पसरवणाऱ्या ज्या जीवाणूवर (बॅक्टेरिया) संशोधन केलं होतं, त्यापेक्षा भारतात कॉलरा पसरवणारा जीवाणू वेगळा आहे.

शिवाय, भारतातले लोक साथीच्या आजाराल दैवी कोप मानायचे. ते अॅलोपॅथी औषधंही घेत नव्हते. अशा परिस्थितीत वेदना देणाऱ्या या लसीचे दोन इंजेक्शन घ्यायला कोण तयार होणार?

या सगळ्या विरोधी वातावरणात डॉ. हाफकिन यांनी स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली. मात्र, मुख्य अडचणी अशी होती की ते जेव्हा बंगालमध्ये दाखल झाले, त्यावेळी बंगलामधली कॉलराची साथ जवळजवळ संपुष्टात आली होती. अवध आणि पंजाब प्रांतात मात्र कॉलराचा जोर कायम होता.

व्हॅक्सीनची पहिली व्यापक चाचणी

सर्वात जास्त त्रास सैन्याला होता आणि त्यांनीच डॉ. हाफकिन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. हाफकिन आग्र्याला गेले. तिथून उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या छावण्यांमध्ये फिरून त्यांनी जवळपास 10 हजार जवानांना लस टोचली. हा प्रयोग यशस्वी ठरला आणि संपूर्ण भारतातून त्यांना बोलावणं येऊ लागलं.

बंगालमध्ये कॉलराने पुन्हा डोकं वर काढलं. तेव्हा त्यांना बंगालमधून बोलावणं आलं. त्यांनी आसाममधल्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना आणि गयाच्या तुरुंगातल्या कैद्यांनाही लस दिली. अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ 42 हजार लोकांना कॉलराच्या लसीची इंजेक्शन्स दिली. ही जगातली पहिली मोठ्या प्रमाणावरील व्हॅक्सीन ट्रायल मानली जाते. लवकरच त्यांनी लसीची नवीन आवृत्ती शोधून काढली. त्यामुळे आता दोन नाही तर एकच इंजेक्शन पुरेसं होतं.

भारतातून कॉलरा हद्दपार झाला तर ब्युबोनिक प्लेगची साथ आली. कॉलराच्या तुलनेत प्लेग जास्त भयंकर होता. प्लेगचा संसर्ग झालेल्यांपैकी जवळपास निम्म्यांचा जीव जायचा. त्यामुळे प्लेगचा मृत्यूदर खूप जास्त होता. यावेळीसुद्धा लस विकसित करण्याची जबाबदारी डॉ. हाफकिन यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. यासाठी त्यांना मुंबईतून बोलावणं आलं. मुंबईतल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती.

हाफकिन ऑक्टोबर 1896 मध्ये मुंबईत दाखल झाले. इथे आल्यानंतर तीनच महिन्यात त्यांनी लस शोधून काढली. इतकंच नाही तर तीन महिन्यांच्या अत्यल्प काळात त्यांनी एका सश्यावर या लसीची पहिली यशस्वी चाचणीही घेतली. यावेळीही त्यांनी पहिली ह्युमन ट्रायल स्वतःवरच केली. मात्र, खऱ्याअर्थाने ह्युमन ट्रायल झाली ती शेजारच्या भायखळा तुरुंगातल्या कैद्यांवर. त्याकाळात कैद्यांवर औषध किंवा लसीची चाचणी घेणं सामान्य बाब होती.

यासाठी 154 कैदी तयार करण्यात आले. त्यांना आधी प्लेगचा संसर्ग करण्यात आला. लस टोचली त्या पहिल्याच दिवशी तीन कैदी दगावले. पुढच्या काही आठवड्यात आणखी काही कैदी दगावले. मात्र, ढोबळमानाने प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर प्लेगचा फैलाव झालेल्या भागातल्या एक हजार व्यक्तींना लस टोचण्यात आली.

भारतच नाही तर जगातल्या वैद्यकीय क्षेत्रात ही लस ढोबळमानाने यशस्वी मानण्यात आली. मात्र, नंतरच्या काळात दीर्घकालीन अभ्यासानंतर डॉ. हाफकिन यांची प्लेगवरची लस 50 टक्केच यशस्वी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र, एखाद्या साथीच्या आजारात 50% लोकांचे प्राण वाचवणं, हेदेखील मोठं यश आहे.

डॉ. हाफकिन यांनी पुढची काही वर्ष या व्हॅक्सीचे देशभर प्रयोग केले. मात्र, त्याचदरम्यान पंजाबमधल्या मुल्कोवाल गावात एक अशी घटना घडली जी वैद्यकशास्त्राच्या इतिहासात मुल्कोवाल डिझास्टर म्हणून ओळखली जाते.

30 ऑक्टोबर 1902 रोजी गावातल्या 107 लोकांना ही लस देण्यात आली. काही दिवसांनंतर यातल्या 19 जणांमध्ये टिटॅनसची लक्षणं दिसली आणि लवकरच त्या सर्वांचा मृत्यू झाला. याचा आरोप डॉ. हापकिन यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना बडतर्फ करण्यात आलं. या बातमीची जगभर चर्चा झाली. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

हताश झालेले डॉ. हाफकिन पॅरिसला परतले आणि तिथून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपली बाजू मांडत राहिले. पुढे तपासात आढळलं की त्यांची काहीच चूक नव्हती. त्यांच्या एका सहकाऱ्यांनी लसीच्या बाटलीवर अस्वच्छ झाकण लावल्याने हा सगळा प्रकार घडला होता.

यानंतर डॉ. हाफकिन भारतात परतले. मात्र, त्यांना कोलकात्याच्या बायोलॉजिकल प्रयोगशाळेच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आलं. या प्रयोगशाळेत लसीवर संशोधन आणि लस उत्पादन यासाठीची व्यवस्था नव्हती. कदाचित मुल्कोवालच्या आरोपांनी त्यांचा पिच्छा सोडला नव्हता.

डॉ. हाफकिन यांचं प्रेरणादायी कार्य

असं सांगतात की याच काळात जैन धर्मातल्या अहिंसावादाचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी पक्षी आणि प्राण्यांचा वापर पूर्णपणे बंद केला.

सुप्रसिद्ध बॅक्टिरियॉलॉजिस्ट डॉ. विलियम बलोच यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलं आहे की कोलकात्यातल्या आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये डॉ. हाफकिन काहीसे चिडचिडे झाले होते.

याविषयीचा एक किस्सा सांगितला जातो. कोलकात्यातल्या प्रयोगशाळेत डॉ. हाफकिन यांचा एक सहकारी एकप्रकारच्या जंताचं डिसेक्शन करत होता. प्रयोगासाठी म्हणून जंताला मारल्यामुळे डॉ. हाफकिन त्या सहकाऱ्यावर खूप चिडले होते.

अशा स्वभावामुळेच 1915 साली अवघ्या 55 व्या वर्षी त्यांना निवृत्त करण्यात आलं. निवृत्तीनंतर ते लगेच युरोपात परतले. तीन वर्षांनंतर भारतात स्पॅनिश फ्लूची साथ आली आणि भारताला पुन्हा एकदा डॉ. हाफकिन यांची आठवण आली. मात्र, यावेळी डॉ. हाफकिन उपलब्ध नव्हते. विज्ञानापासून दूर आता ते ज्यु धर्माच्या शिकवणीचं पालन करत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते. यावर त्यांनी एक लेखही लिहिला होता - Plea of Orthodoxy (रुढीवादाची याचना).

त्यांना काहींनी 'महात्मा हाफकिन' ही उपाधीही दिली. याच शीर्षकाचं एक पुस्तकही आहे. 1925 साली मुंबईतल्या ग्रँट कॉलेजमधल्या त्यांच्या प्रयोगशाळेचं नाव बदलून हाफकिन इन्स्टिट्युट करण्यात आलं. 1964 साली भारतीय टपाल सेवेने त्यांच्यावर एक स्टॅम्पही काढला.

आज जगभर कोव्हिड-19 च्या लसीवर संशोधन सुरू आहे. अशावेळी डॉ. हाफकिन त्या सर्व संशोधकांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)