विशाखापट्टणम वायू गळती : स्टायरिन गॅस नेमका आहे तरी काय?

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात एलजी पॉलिमर्स कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झालाय तर परिसरात राहणारे शेकडो नागरिकांना अस्वस्थ वाटत आहे.

या गॅस गळती प्रकरणानंतर अनेक मन विचलित करणारे व्हीडिओ समोर येत आहेत. काही जण गाडीवरून जाताना अस्वस्थ वाटत असल्यामुळे खाली पडले आहेत. तर काही जण रस्त्यात उभे असताना बेशुद्ध पडले आहेत. किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत असल्याचं आढळून येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या कंपनीच्या प्लांटमधून स्टायरिन गॅसची गळती झाल्याची माहिती मिळाली आहे, असं विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चांद यांनी सांगितलं.

या घटनेमुळे 35 वर्षांपूर्वी भोपाळमध्ये घडलेल्या गॅस गळतीची आठवण लोकांना झाली. भोपाळमध्ये युनियन कार्बाईट कंपनीच्या प्लांटमधून मिथाईल आयसोसायनाईट वायूची गळती झाली होती. त्यावेळी या वायूचा दुष्परिणाम झालेल्या लोकांवर नेमके काय उपचार करायचे हे सुरुवातीला डॉक्टरांना माहिती नव्हतं. कारण त्यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं.

विशाखापट्टणम वायू गॅस गळती प्रकरणात स्टायरिन गॅसची गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. हा वायू नेमका कसा आहे, त्याची बाधा झाल्याची लक्षणं काय या गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.

स्टायरिन वायू म्हणजे काय ?

स्टायरिनचा प्राथमिक उपयोग हा पॉलिस्टिरिन प्लास्टिक आणि रेसिन्स (राळ) बनवण्यासाठी होतो. स्टायरिन गॅस हा रंगविरहीत किंवा हलकासा पिवळ्या रंगाचा असतो. हा एक ज्वलनशील पदार्थ असून त्याचा गोड वास येतो. या गॅसला स्टिरॉल किंवा विनिल बेन्झिन म्हणूनही ओळखलं जातं.

बेन्झिन आणि इथिलिनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोअरिंग, तसंच टेबलवेअर आणि मोल्डेड फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो.

माणसांवर स्टायरिनचा काय परिणाम होतो?

हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणे, घशात घरघर, खोकला आणि फुप्फूस जड होतं. हा वायू जास्त प्रमाणात माणसाच्या संपर्कात आला तर त्याला स्टिर्न सिकनेस होतो. यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, चक्कर येणे, शौचास अनियमितपणा येण्याची लक्षणं आढळतात.

काहीवेळा यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि माणूस कोमात जाण्याची शक्यता असते.

त्वचा स्टायरिन शोषून घेऊन शकते. त्याचा केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होते तसंच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशाच प्रकारचा त्रास स्टायरिन गॅस शरिरात गेल्यावरही होऊ शकतो. त्वचा आणि डोळे जळजळ करतात.

स्टायरिनमुळे लूकेमिआ आणि लिम्फोमा होण्याचा धोका वाढतो असं साथीच्या रोगाचं संशोधन सांगतं. पण अपुऱ्या पुराव्यांमुळे हा दावा सिद्ध होऊ शकलेला नाही.

सामान्य व्यक्तीं स्टायरिन वायूच्या थेट संपर्कात येऊ शकतात का?

स्टायरिन वायूचा उपयोग हा औद्योगिक रसायनांसाठीच होतो. त्यामुळे जर तुम्ही स्टायरिन वायूला कामासाठी हाताळत असाल तरच तुम्ही त्याच्या थेट संपर्कात येऊ शकता. पण सामान्य व्यक्तीशी त्याचा थेट संपर्क होण्याची शक्यता कमी आहे.

प्लॅस्टिक नष्ट न होता त्यापासून राहीलेल्या काही भागापासून अगदी कमी प्रमाणात स्टायरिन वायूशी तुमचा संपर्क होऊ शकतो. किंवा नैसर्गिकरित्या वातावरणातूनही होण्याची शक्यता असते. पण याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)