कोरोना लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतोय?

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

20 एप्रिलपासून लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणाऱ्या भागांमध्ये दिल्लीचा समावेश नाही. यामागे अनेक कारणं असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दिल्लीत कोव्हिड-19 आजाराची लक्षणं न दिसणारे म्हणजेच असिम्पटमॅटिक कोरोनाग्रस्त मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

असिम्प्टमॅटिक कोरोनाग्रस्त म्हणजे असे रुग्ण ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. मात्र, त्यांना आजाराची कुठलीच लक्षणं दिसत नाहीत.

अशा रुग्णांमुळे चिंता अधिक वाढल्याचं सांगत केजरीवाल यांनी म्हटलं, "दिल्लीने अधिकाधिक कोरोना चाचण्या करायला सुरुवात केली आहे. एका दिवसात करण्यात आलेल्या 736 कोरोना चाचण्यांपैकी 186 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले. हे सर्व लक्षणं नसलेले रुग्ण आहेत. यापैकी कुणालाच ताप, खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास नव्हता. त्यांना याची कल्पनाच नव्हती, की ते कोरोना विषाणू घेऊन वावरत आहेत. हे तर अधिक गंभीर आहे. कोरोना पसरलेला असतो आणि कुणाला याची कल्पनाही नसते."

लक्षणं नसलेल्या रुग्णांचा धोका केवळ दिल्लीतच नाही तर देशातल्या इतरही राज्यांमध्येही आढळून येत आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसाम, राजस्थान या राज्यांनीही अशाप्रकारची प्रकरणं आढळत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लक्षणं नसणारे कोरोनाग्रस्त डॉक्टरांसाठी नवं आव्हान ठरत आहेत.

संसर्ग कधी पसरू शकतो?

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी कोरोना कोणकोणत्या मार्गाने पसरतो, हे समजून घ्यायला हवं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना विषाणुचा फैलाव होण्याचे तीन मार्ग असू शकतात.

लक्षण असलेले/सिम्प्टमॅटिक: ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसली आणि त्यांच्या माध्यमातून इतरांना हा संसर्ग झाला, असे रुग्ण. लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसातच अशा व्यक्तींकडून इतरांना विषाणूची बाधा होऊ शकते.

प्रीसिम्प्टमॅटिक: विषाणूचा संसर्ग झाल्यापासून आजाराची लक्षणं दिसण्यापर्यंतचा जो मधला कालावधी आहे, त्या कालावधीमध्येसुद्धा संबंधित व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो. या कालावधीला 'इन्क्युबेशन पीरियड' म्हणतात. हा जवळपास 14 दिवसांचा असू शकतो. यात कोरोनाची थेट लक्षणं दिसत नाहीत. मात्र, हलका ताप, अंगदुखी अशी सौम्य लक्षणं सुरुवातीला दिसू शकतात.

लक्षण नसलेले/ असिम्प्टमॅटिक: अशा व्यक्तींमध्ये आजाराची लक्षणं अजिबात दिसत नाहीत. मात्र, ते पॉझिटिव्ह असतात आणि त्यांच्याकडून इतरांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. जगातल्या इतर देशांमध्येही असे रुग्णं आढळले आहेत. मात्र, भारतात अशा रुग्णांची संख्या तुलनेने जास्त आहे.

लक्षण नसलेल्या रुग्णांचा धोका अधिक का?

बंगळुरूमधल्या राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे डॉ. सी. नागराज यांच्या मते, जगभरात असिम्प्टमॅटिक कोरोनाग्रस्तांची संख्या 50 टक्क्यांच्या आसपास आहे.

आपल्या संस्थेविषयी सांगताना ते म्हणतात, की त्यांच्या संस्थेतल्या 12 रुग्णांमध्ये 5 रुग्ण लक्षण नसलेले आहेत. हे प्रमाण जवळपास 40% आहे.

डॉ. नागराज यांच्या मते, लक्षणं नसलेल्या रुग्णांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांचं वय. त्यांच्या संस्थेत असिम्प्टमॅटिक आढळलेले पाचपैकी तीन रुग्ण 30 ते 40 वयोगटातले आहेत. चौथा रुग्ण 13 वर्षांचा आहे तर पाचवा रुग्ण पन्नाशीच्या वरचा आहे.

दिल्लीत आतापर्यंत जे असिम्प्टमॅटिक रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या वयाविषयीची माहिती अजून मिळालेली नाही.

जगात लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र तरीही असे रुग्ण आव्हान असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांच्या मते अशा प्रकरणांसाठीसुद्धा आपण तयार असायला हवं.

त्यांनी म्हटलं, "हॉटस्पॉट झोनमध्ये राहणारे वृद्ध हाय रिस्कवर आहेत आणि त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करायला हवी. त्याचप्रमाणे जे लोक असिम्प्टमॅटिक आहेत, मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत. त्यांनीदेखील स्वतःचं अलगीकरण करायला हवं. अशांनी गरज पडल्यास आम्हाला संपर्क करावा आणि गरज असेल तर त्यांचं अलगीकरण हॉस्पिटलमध्ये करण्याची व्यवस्था केली जाईल."

भारतासाठी चिंतेचं कारण

डॉ. नागराज यांच्या मते भारतात तरुणांची संख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांनाच कोरोनाची लागण सर्वाधिक आहे आणि म्हणूनच कोरोनाचा हा नवा ट्रेंड चिंता वाढवणारा आहे.

4 एप्रिल रोजी केंद्र सरकारने काही आकडेवारी प्रसिद्ध केली होती. या आकडेवारीनुसार देशात जे कोरोनाग्रस्त आढळले आहेत त्यातले 41.9% लोक 20 ते 49 वयोगटातले आहेत, तर 32.8% लोक 41 ते 60 वयोगटातले आहेत.

या आकडेवारीवरून भारतात तरुण वर्ग कोरोनाला बळी पडत असल्याचं स्पष्ट होतं.

भारतात लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. डॉ. नागराज यांच्या मते भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती इतरांपेक्षा चांगली आहे आणि कदाचित यामुळेच कोरोनाचा संसर्ग होऊनही त्याची कुठलीच लक्षणं न दिसणाऱ्यांची संख्या आपल्या देशात जास्त आहे.

राजस्थानातल्या सवाई मानसिंग हॉस्पिटलचे डॉ. एम. एस. मीना यांचं मतही काहीसं असंच आहे. भारतीयांचं राहणीमान, जीवनशैली आणि भौगोलिक परिस्थिती यासाठी कारणीभूत असावी, असं मीना यांना वाटतं.

ते पुढे म्हणतात, "आपण उष्ण प्रदेशात राहतो. उष्ण पदार्थ खातो. उष्ण पेय पितो. यामुळेच आपल्याकडे लक्षणं नसलेले रुग्ण जास्त आहेत. त्यांच्या मते कोरोना विषाणू उष्णतेला संवेदनशील आहे.

डॉ. मीना म्हणतात, की आपल्या देशात तरुणांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त आहे आणि आजारातून बरे होणाऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे. या सर्वांवरून हेच दिसतं की भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि म्हणूनच कोरोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही सध्या आपल्याकडे कमी आहे."

'लक्षणं नसलेले रुग्ण दुधारी तलवारीसारखे'

असिम्प्टमॅटिक रुग्णांचं वर्णन करताना डॉ. मीना त्यांना 'दुधारी तलवार' म्हणतात.

ते म्हणतात, "एखाद्या व्यक्तीला कुठलीच लक्षणं नसतील तर तो स्वतःची चाचणी करणार नाही. चाचणीच न केल्याने तो पॉझिटिव्ह आहे, हे कळणारच नाही आणि अशा प्रकारे अजाणतेपणे त्याच्याकडून इतर अनेकांना या आजाराची लागण होऊ शकते."

डॉ. मीना यांच्या मते, घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने स्वतःची कोव्हिड-19 चाचणी करायला हवी. आपण एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचं कळताच प्रत्येकाने स्वतःची चाचणी करून घ्यावी.

डॉ. नागराज आणि डॉ. मीना या दोघांचंही म्हणणं आहे, की रॅपिड टेस्टिंग आणि पूल टेस्टिंग यामुळे असिम्प्टमॅटिक रुग्णांची ओळख पटण्यात थोड्याफार प्रमाणात मदत नक्कीच होईल. मात्र, त्यासोबत तरुणांनी स्वतःची अधिक काळजी घेणंही गरजेचं आहे.

संशोधनातून काय पुढे आलं?

मेडिकल जर्नल असलेल्या 'नेचर मेडिसिन'मध्ये 15 एप्रिल रोजी एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या नव्या संशोधनानुसार, "कोव्हिड-19 आजार झालेल्या रुग्णामार्फत त्याला आजाराची लक्षणं दिसण्याच्या 2-3 दिवस आधीच संसर्गाचा फैलाव व्हायला सुरुवात होते. 44% प्रकरणांमध्ये हे दिसून आलं आहे. पहिलं लक्षणं दिसल्यानंतर इतरांना संक्रमित करण्याची क्षमताही पूर्वीपेक्षा कमी होते."

या अभ्यासाठी 94 कोरोनाग्रस्तांचे नमुने तपासण्यात आले होते.

"भारताने आपल्याकडे आढळणाऱ्या असिम्प्टमॅटिक रुग्णांवर स्वतंत्र संशोधन करण्याची गरज आहे. त्यामुळे एक ठोस माहिती हाती येईल आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला आपली पुढची रणनीती आखता येईल. हॉटस्पॉटच्या बाहेरही असिम्प्टमॅटिक व्यक्तींची चाचणी करण्याची गरज आहे किंवा नाही, हेदेखील या संशोधनातून कळू शकेल," असं डॉ. नागराज म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)