कोव्हिड झालेला पत्रकार : ‘कोरोना झाल्याचं ऑफिसला सांगितल, त्यांची रिअॅक्शन फार थंड होती'

    • Author, मयांक भागवत
    • Role, मुक्त पत्रकार

मुंबईतल्या जवळपास 56 पत्रकार आणि कॅमेरामन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई महापालिकेतर्फे गेल्या आठवड्यात फिल्डवर काम करणाऱ्या 167 पत्रकारांची कोव्हिड-19ची टेस्ट करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील 56 रिपोर्टर आणि कॅमेरामन यांना कोरोनाची लागण झाली आहे.

काही मंत्री आणि राजकारणी यांनी ट्वीट करून याबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेतही या वृत्ताला दुजोरा दिलाय.

याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आरोग्य मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल म्हणाले, "इन्फेक्शन-प्रिव्हेन्शन मॅनेजमेंट हे कोणताही आजार प्रतिबंध करण्याची एक प्रमुख गोष्ट आहे. पत्रकारांना कोरोनाचा लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बातमी दुर्दैवी आहे. आमची विनंती आहे की पत्रकारांनी काम करताना काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. डिस्टंसिंगचं योग्य पालन केलं पाहिजे. फेस मास्क किंवा फेस कव्हर वापरणं गरजेचं आहे."

पत्रकारांची व्यथा

"आजार झाल्याची भीती नाही, पण अनेक पत्रकारांना भीती आहे की घरी बसून काम सुरू केलं तर नोकरी जाऊ शकते. येत्या काळात कर्मचारी कपातीची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की घरी बसलो तर ते त्यांच्याविरोधात जाऊ शकतं," असं एका महिला पत्रकारानं ओखळ उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं.

नाव न सांगण्याच्या अटीवर एक फोटोग्राफरने बीबीसी मराठीला त्यांचा अनुभव सांगितला.

ते म्हणाले, "लॉकडाऊन झाल्यापासून मी काम करतोय. फिल्डवर काम करताना अनेक ठिकाणी जावं लागतं. रिस्क असूनही काम करावं लागतं. नक्की कुठे कॉन्टॅक्ट झाला, हे सांगणं कठिण आहे. दिवसभरात अनेक लोक संपर्कात येतात. मात्र, कोरोना झाल्याचं ऑफिसला सांगितल्यानंतर ऑफिसची रिअॅक्शन फार थंड होती."

मुंबईत ज्या पत्रकारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यात काही प्रमुख टिव्ही चॅनल्सचे पत्रकारही आहेत.

त्यांच्यातील एक पत्रकार बोलताना म्हणाले, "मला कोणतही लक्षण नाही. कोरोनाचं कव्हरेज करताना मुंबईतील अनेक ठिकाणी फिरलो. धारावीतही गेलो. उच्चभ्रू वस्तीपासून झोपडपट्टीतही फिरलो. लोकांचे प्रश्न, सरकारच्या उपाययोजना या सर्व गोष्टी कव्हर केल्या. पण, कोरोनाची लागण झाल्याचा फोन येताच, कानावर विश्वास बसला नाही. योग्य काळजी घेवूनही संसर्ग झालाच."

मुंबईत कोरोनाचा फैलाव झाल्यापासून काही टीव्ही चॅनल्सने रिपोर्टर्स, कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सना ऑफिसमध्ये येणं बंद केलं होतं.

याबाबत बोलताना एक कॅमेरामन म्हणाला, "लॉकडाऊन केल्यापासून आम्हा फिल्डवर असलेल्या रिपोर्टर आणि कॅमेरामनला ऑफिसमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. कॅमेरा आणि सर्व यंत्र घरी घेवून जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं. आठवडाभर काम आणि पुढील आठवडा सुट्टी असं रोस्टर लावण्यात आलं होतं."

"आम्ही फिल्डवर काम करताना पॉझिट्व्ह आलो. पण आता आमच्या घरच्यांच काय, त्यांना मदत कोण करणार, त्यांची काळजी वाटते. काम बंद करण हा पर्याय नक्कीच नाही. पण ऑफिसने ही गोष्ट समजून घ्यायला हवी" असं एक रिपोर्टर म्हणाला.

दरम्यान याबाबात भाजप नेते किरिट सोमय्या म्हणाले " 52 पत्रकार पॉझिटिव्ह येण हे नक्कीच शॉकिंग आहे. माझी सरकारला आणि चॅनल मालकांना विनंती आहे की यांच्या ट्रिटमेंटला मदत करावी. यांना इन्शुरन्स कव्हरही देण्यात यावं."

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांन देखील ट्विटवरून सर्व पत्रकारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

अनेक पत्रकारांना स्वतःला आयसोलेट करून घेणंसुद्धा कठीण जात आहे. काही जण एकत्र कुटुंबात राहतात. तर काही महिला पत्रकारांना ज्या स्वतःच घरातली कामं करून फिल्डवर जात होत्या त्यांच्यासाठी तर फारच कठीण झालं आहे. कारण सध्या मोलकरीण सुद्धा मिळण शक्य नाही. काही महिला पत्रकार तर त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून रिपोर्टिंग करत आहेत जेणेकरून त्यांच्या घरची मंडळी सुरक्षित राहतील.

दरम्यान या सर्व 53 पत्रकारांच्या आरोग्याच्या सुविधेची आणि विलगिकरणाची व्यवस्था गोरेगाव मधील फर्न हॉटेलमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष विष्णू सोनवणे यांनी दिली आहे.

मुंबई आणि पुणे कोरोनाचे हॉट स्पॉट बनलेत. मुंबई कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बत २७००च्या वर जावून पोहोचली आहे. राज्यातील २२३ मृत्यूंपैकी १३२ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)