You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? या थेरपीचा कोरोनाग्रस्तांना फायदा नसल्याचं एम्स हॉस्पिटल का म्हणतंय?
कोव्हिडचा बरा झालेला पेशंट कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या पेशंटला बरं करू शकतो? जगातल्या अनेक देशांमध्ये याप्रकारे रुग्णांवर उपचार सुरू झालाय. मात्र, या थेरपीचा फायदा होत नसल्याचं दिल्लीस्थित एम्स हॉस्पिटलने म्हटलंय.
प्लाझ्मा थेरपीचा फायदा नाही - एम्स हॉस्पिटल
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस म्हणजेच नवी दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटले म्हटलंय की, कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या केल्यानंतर त्याचा विशेष फायदा होताना दिसत नाहीय.
एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना आज (6 ऑगस्ट) ही माहीती दिली. मात्र, हा निष्कर्ष सुरुवातीच्या केसेमधून आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
प्लाझ्मा थेरपीचा नेमका प्रभाव जाणून घेण्यासाठी 15 - 15 रुग्णांचे दोन गट बनवण्यात आले होते. यातल्या रुग्णांच्या एका गटाला कोरोनाचे सामान्य उपचार देण्यात आले होते. तर दुसऱ्या गटाला प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यात आला होता.
याबद्दल डॉ. रणदिप गुलेरिया सांगतात, "दोन्ही गटातील रुग्णांचा मृत्यू दर हा समान होता आणि दोन्ही गटांना काही विशेष फायदा मिळाला नाही. मात्र, अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी आम्हाला अजून पुरावे लागतील. पण, प्लाझ्मा थेरपीने रुग्णांना कोणताही त्रास होत नसल्याचं स्पष्ट झालंय."
प्लाझ्मा थेरपी अजूनही चाचण्यांच्या पातळीवर असून त्याचा अंतिम निष्कर्ष अद्यापही आलेला नाही. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय.
टर्कीमध्ये प्लाझ्माचा पहिला डोनर
टर्कीमधले डॉ. कुर्सत डेमिर कोरोनातून बरे झालेले पहिले प्लाझ्मा डोनर ठरले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे. मात्र प्लाझ्मा थेरपी किती यशस्वी ठरू शकते, याबद्दल अजून ठोस पुरावे मिळाले नसल्याचंही ICMRने यापूर्वीच म्हटलं आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानंही प्लाझ्मा थेरपीकडे एक प्रायोगिक उपचारपद्धती म्हणूनच पाहिल्याचं ICMR कडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ही बातमी चांगली असली तरीसुद्धा अजून बरंच संशोधन यात होणं बाकी आहे.
पण ही थेरपी काय आहे? हिचा वापर भारतात होतोय का? यामुळे कोरोनाचं संकट दूर व्हायला मदत होईल का? हे आपण समजून घेऊयात.
प्लाझ्मा थेरपी काय आहे?
रक्तातला प्लाझ्मा वेगळा काढून त्यावर अभ्यास सुरू आहे. हाच प्लाझ्मा आता इतर कोव्हिड रुग्णांचे जीव वाचवू शकणार आहे.
कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचं रक्त आता इतर पेशंट्चे जीव वाचवू शकेल.
हे नेमकं कसं शक्य आहे?
तर एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.
सर्वात आधी केरळमध्ये प्रयत्न
प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी भारतात सगळ्यांत आधी केरळच्या 'श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी' या हॉस्पिटलने प्लाझ्मा थेरपीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी केंद्रीय संस्थांकडे मागितली. त्यानंतर आता महाराष्ट्रानेही ही प्रक्रिया सुरू केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि विविध राज्यांच्या आरोग्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांनी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतल्या नायर रुग्णालयाला यासाठी परवानगी दिली आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना बी.एल.वाय नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी म्हटलं, "कन्व्हलसेंट प्लाझ्मा थेरपीची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी कोव्हिडवर मात केलेल्या रुग्णांकडून रक्त घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाकडून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना संपर्क करण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण यासाठी पुढाकार घेत आहेत."
केरळच्या टास्क फोर्सचे सदस्य आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. अनुप कुमार सांगतात, की एका डोनरच्या माध्यमातून चार कोव्हिड-19 रुग्ण बरे होऊ शकतात.
जगातही प्लाझ्मा थेरपीचा वापर
भारताआधी जगात अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर होतोय. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच पेशंट्सची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीचने उपचार केल्यानंतर 12 दिवसांमध्ये ते पेशंट्स बरे झाले.
'द शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटल'ने 27 मार्चला एक पेपर प्रसिद्ध केला होता. त्यात सांगितलं, की प्लाझ्मा थेरपीद्वारे 36 ते 73 वयोगटातील पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. त्याकरता शिस्तबद्ध पद्धतीने क्लिनिकल ट्रायल घेतल्या जातात.
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार करण्यात आले. ते आता ठणठणीत आहेत.
घोडं कुठे अडलंय?
आतापर्यंत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून म्हणजे ICMRकडून केरळ राज्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांची मंजुरी आवश्यक आहे. सर्व लोकांवर या पद्धतीने उपचार सुरू करण्याआधी प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनिकल ट्रायल्स घ्याव्या लागतील. यासाठी वेळ कमी आहे कारण कोरोना रुग्णांची संख्या देशभरात वाढतेच आहे.
प्लाझ्मादान करणाऱ्या व्यक्तीसाठी 4 अटी आहेत-
- डोनर म्हणजे दाता रुग्णाने कोव्हिड-19 शी यशस्वी लढा दिलेला पाहिजे.
- दाता पूर्णपणे बरा झाल्याच्या 14 दिवसांनंतरच त्याचं रक्त घेता येतं. त्याचे कोरोनाचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतं.
- प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीने गेल्या तीन महिन्यात परदेश प्रवास केलेला असू नये.
- त्या व्यक्तीला ताप किंवा श्वसनाशी संबंधित विकार असू नयेत.
या थेरपीने उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये होणार असल्याने त्यासाठी दोन ते तीन हजार रुपये एवढा खर्च येईल, असं डॉ. अनुप कुमार यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वीही प्लाझ्मा थेरपीचा वापर
संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. सार्स, मर्स तसंच H1N1 या साथीच्या रोगांवेळीही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला गेला होता.
पहिल्या महायुद्धात 1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू पासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.
इबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोलाने थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने प्लाझ्मा थेरपीबाबत मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली.
कोरोना विषाणूवर लस निघालेली नाही. त्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त काळ लागू शकतो. कोविडवर औषध नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीकडून अनेक शास्त्रज्ञ आणि सरकारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)