कोरोना व्हायरस आणि दारू विक्री : ‘लॉकडाऊनमध्ये मिळे ना दारू, सांगा आता मी काय करू!’

    • Author, स्वामीनाथन नटराजन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या या काळात येणाऱ्या तणावाशी झगडत आपण असे किती दिवस घरात बसून काढणार आहोत?

हा प्रश्न सध्या संपूर्ण पृथ्वीवरच्या किमान 25 टक्के लोकसंख्येला सध्या सतावतोय. अनेक लोकांना मद्याचा भरलेला प्याला या एकांतावासावरचं उत्तर वाटतं.

नील्सन या कंपनीच्या सर्व्हेप्रमाणे, गेल्या वर्षीच्या तुलनेत अमेरिकेत यंदा 21 मार्चपर्यंतच्या एका आठवड्यांत दारूचा खप 55 टक्क्यांनी वाढला. याचप्रमाणे युके आणि फ्रान्समध्येही दारूच्या विक्रीत वाढ झालीये.

या वाढत्या आकड्यांमुळे दारूत शांतता शोधणाऱ्यांच्या आजारपणात वाढ होण्याची भीती व्यक्त होतेय. आधीच रोगामुळे ओढवलेल्या या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात येणारा तणाव कसा हाताळायला हवा, याचे स्पष्ट निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेत.

यात स्वतःच्याच भावविश्वात रममाण होऊन दारू पिणे, धुम्रपान करणे हे चुकीचं असल्यचं मत WHOने नोंदवलंय.

पूर्ण बंदी

तर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यांतल्या भारत, दक्षिण आफ्रिकासारख्या काही देशांमध्ये गर्दी टाळण्यासाठी दारूच्या विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आलीये. आसाम सरकारने आता कुठे जाऊन अंशतः विक्री सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र मद्यविक्री सुरू करण्याचा आता तरी काही विचार नसल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे केरळमध्ये राहणाऱ्या रथीश सुकुमारन यांच्यासारख्या लोकापुढे चांगलंच आव्हान निर्माण झालंय.

रथीश सांगतात, "मी दारू नियमित घेतो. पण आता दारू प्यायचीच नाही आणि घरातून बाहेर पडायचंच नाही. यामुळे माझी पंचाईत झाली आहे."

फिल्म आणि टीव्ही क्षेत्रात काम करणारे हे 47 वर्षीय लेखक मात्र स्वतःला अजिबात दारू पिणारा समजत नाहीत. पण ते सांगतात, "मी दारू खरंच प्यायची इच्छा होतेय."

दारू सोडण्याची अपूर्व संधी

देशातल्या या तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे नेहमीच्या दारू पिण्यावर किंती अवलंबून असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळे हे दारू पिणं आता कमी करायचं त्यांनी ठरवलंय. रथीश केरळची राजधानी थिरुअनंतपुरममध्ये राहतात. इथली जीवनावश्यक वस्तंची दुकानं वगळता इतर दुकानं बंद आहेत. संपूर्ण देशातही हेच चित्र आहे.

त्यामुळे आता दारूशिवाय जीवन व्यतित करणं हा रथीश यांच्यासाठी नवा अनुभव आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून दारूचं सेवन करताहेत. "आठवड्यांत रोज मी सूर्यास्तानंतर दारू प्यायचो. पण सुट्टीच्या दिवशी मात्र मी दुपारूच बसायचो."

वारंवार प्रवास करावा लागल्याने गेल्या सहा महिन्यांत त्यांनी अगदी दररोज दारू घेतली आहे.

"माझं रोजचं दारू पिणं हे सोबतच्या लोकांवर अवलंबून असतं. सामान्यतः मी सहा-सात ग्लास घेतोच. पण कधी तरी एक किंवा दोन ग्लासमध्येही आटपतं."

त्यांच्या पत्नीला त्यांचं मद्यपान आवडत नाही आणि त्या पतीला घरात पार्ट्यांचं आयोजन करूही देत नाहीत. त्यामुळे रथीश हे आपल्या मित्रांसह जवळच्या पब किंवा बारमध्ये जातात.

आत्मपरीक्षा

भारतात दारू विक्रीसाठी काही ठराविक दुकानंच असतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा केल्यानंतर रथीशच्या मित्रांनी वाईन शॉपकडे धाव घेतली.

मात्र रथीश यांनी स्वतःवर नियंत्रण किती काळ ठेवता येतं, याची परीक्षा पाहायचं ठरवलं. "लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर आमच्या भागातली दारू विक्रीची दुकानं सुरू होती. पण मी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला."

मात्र या लॉकडाऊनच्या पहिल्या सात दिवसांनंतर रथीशना त्यांची क्षमता कुठपर्यंत आहे, हे कळून चुकलं.

"मी जवळपास 20 जणांकडे मदत मागितली. मला दारूची खूपंच जास्त तलफ आली होती. पण मला कुठूनच काही मिळालं नाही," रथीश यांनी सांगितलं.

पण रथीश यांना आलेले हे अनुभव दारू सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगभरातल्या इतरांनाही आलेले आहेत.

युकेमध्ये सरकारने दारूची दुकानं बंद केलेली नाहीत. उलट त्यांनी दारूचं जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नाव टाकलंय. त्यामुळे दारूची दुकानं बिनधोक सुरू आहेत.

पण दुसरीकडे दारू सोडवण्यासाठी ज्यांना समुपदेशनाची नितांत गरज आहे, अशांना या गरजेची पूर्तता लॉकडाऊनच्या काळात करता येत नाहीये.

'अल्कोहोलीक अनॉनिमस' ही सामाजिक संस्था लोकांची दारू सोडवण्यासाठी मदत करतो. त्यांनी लॉकडाऊनमुळे अशा लोकांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतलाय.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच युकेमध्ये संस्थेच्या हेल्पलाईनवर येणाऱ्या फोनचं प्रमाण 22 टक्क्यांनी वाढलं. तर चॅट सर्व्हिसेसही तिपटीने वाढल्या.

अशांतता आणि चिडचिड

इथे रथीश मात्र काहीसे गडबडलेत. त्यांनी आपल्या दारू सोडलेल्या मित्रांशी यानिमित्तानं गप्पा मारायला सुरुवात केली. दारू पिण्याची तीव्र इच्छा होणं हे खूप सामान्य असल्याचं त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं. मित्रांच्या या शब्दांमुळे रथीश यांना काहीसा दिलासा मिळाला.

रथीश सांगतात, "माझ्या शरीराला दारूची खूप गरज आहे, असं मला वाटत होतं. मी कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मी सिनेमाही पाहायचं ठरवलं. पण कशानेच फरक पडत नव्हता. मी जेवढा दूर जायचा प्रयत्न करायचो, तितकाच मला त्रास व्हायचा."

ते पुढे सांगतात, "मला रात्रभर झोप नाही लागायची. मी मानसिकदृष्ट्या चिडचिडा व्हायचो. रात्र संपतच नाही, असं वाटायचं. सकाळ होत असल्याचं दृश्य दिसू लागलं की मला हायसं वाटायचं."

त्यांचे काही मित्र सोशल मीडियावर दारूच्या पार्ट्या करत असतानाचे फोटो टाकायचे. रथीश लगेचच त्यांना आपल्या भावना तिथेच कमेंट करून कळवून टाकायचे.

"मी मित्रांना फोटोखाली कमेंटमध्ये शिव्या द्यायचो. मी त्यांना सांगायचो की आता तुमच्यावर एक मोठी वीज येऊन पडेल."

दारू सोडतानाची लक्षणं ही भयंकर असू शकतात. अंग थरथरणं, चिडचिडेपणा आणि आक्रस्ताळेपणा ही लक्षणं दिसून येतात.

रथीश म्हणतात, "लोकं उतावीळ का होतात, हे मी समजू शकतो. कारण दारू प्यायची इच्छा ही खूपंच तीव्र असते."

डॉक्टर विरुद्ध सरकार

केरळच्या स्थानिक माध्यमांनी काही लोकांनी लॉकडाऊननंतर आत्महत्या केल्याचं वृत्त दिलंय. दारू प्यायला न मिळाल्याने या लोकांनी आत्महत्या केल्याचा दावा माध्यमांनी केलाय.

गव्हर्मेंट मेडीकल ऑफीसर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एस. विजयक्रिष्णन या घटनेबद्दल सांगतात, "मृतदेहांच्या पंचनाम्यावरूनच मृत्यूचं खरं कारण कळून येईल."

माध्यमांमधल्या या आत्महत्यांच्या बातम्यांनंतर केरळ सरकारने ज्यांना दारू न प्यायल्याने मानसिक त्रास होत आहे अशांना दारू प्रिस्क्रिप्शनवर लिहून देण्याचे आदेश दिले.

यावर विजयक्रिष्णन बीबीसीसोबत बोलताना म्हणाले, "सरकारच्या या आदेशानंतर अनेक लोक डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी स्वतःला दारू प्रिस्क्राईब करून देण्याची मागणी केली. तर काहींनी असं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं नाही तर आत्महत्या करू, अशी धमकीही डॉक्टरांना दिली. कोरोना व्हायरसशी एकीकडे लढा देत असताना या आदेशाने नवीनच समस्या उभी केली."

आरोग्य क्षेत्रातली तत्त्व

आरोग्य क्षेत्रातल्या डॉक्टरांनी अशी परमिट लिहून द्यायला स्पष्ट नकार दिला आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी केरळ हायकोर्टाकडून सरकारच्या या आदेशावर स्थगिती आणली.

दारूचं व्यसन ही एक प्रकारची व्याधीच आहे. त्यामुळे लोकांना दारू प्यायची परमिट देऊन आरोग्य क्षेत्रातल्या मूळ तत्त्वांच्या विरोधात भूमिका घेतल्यासारखं असल्याचं डॉक्टरांचं मत पडलं.

याबद्दल रथीश सांगतात, "या समस्येवर तोडगा काय काढायचा हे मला तरी उमगलेलं नाही."

दारूची दुकानं पुन्हा उघडावी लागल्याने मोठ्या गर्दीला निमंत्रण दिल्यासारखं होईल आणि जागतिक आरोग्य संकटाच्या मूळ नियमालाच हरताळ फासला जाईल.

ऑनलाईन खरेदी हा एक पर्याय असला तरी रथीश यांचं म्हणणं आहे की, "अनेक लोकांकडे इंटरनेटची उपलब्धता नाही. त्यामुळे हा फक्त श्रीमंतांसाठीचाच पर्याय राहील."

पुन्हा पहिल्याकडे...

सगळे पर्याय संपल्यानंतर रथीश यांनी पुन्हा आपल्या पहिल्या धेय्याकडे जायचं ठरवलं. ते म्हणतात, "मी आता या दिवसांचा सकारात्मकपणे वापर करण्याचं ठरवलंय. मी माझं दारू पिणं आता किती कमी करता येईल याकडेच लक्ष देतोय."

त्यांच्या लॉकडाऊनमधल्या आत्मपरिक्षणानंतर आता रथीश या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. ते म्हणतात, "आता इथून पुढे दारू उपलब्ध जरी असली तरी मी तिच्याशिवाय राहू शकतो."

पण रथीश यांना त्यांच्या मित्रांना न भेटणं आता सतावतंय. "बराच काळ चालणाऱ्या गप्पा त्यात राजकारण, क्रिकेट, सिनेमा आणि काय नाही असे सगळेच विषय मला आठवू लागलेत. पण, जेवढे माझे मित्र होतील तेवढी मी दारू पिईन. त्यामुळे आता मला ठरवावं लागेल की, मला सर्वाधिक मित्रांची आठवण आली की दारूची", रथीश त्यांना आठवलेलं सांगत होते.

रथीश यांच्यात झालेले हे बदल आता इथून पुढेही कायम राहतील अशी त्यांना आशा आहे.

ते म्हणतात, "मला इथून पुढे माझ्या मित्रांसोबत जायचंय आणि त्यांना कंपनी द्यायची आहे. मी मात्र पिणार नाही. अखेरीस तलफ येणं, वारंवार इच्छा होणं हे त्यांना रोखल्यावरच अधिक चांगलं वाटतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)