कोरोना व्हायरस : सेक्स वर्कर्स लॉकडाऊनच्या काळात कशा जगतायत?

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"सोशल डिस्टन्सिंग वगैरे बरोबर आहे, पण आम्ही व्यवसायच करू शकत नाही, ना पैसे कमवू शकत, ना आमच्या पोराबाळांना खाऊ घालू शकत," नाशिकच्या रेखा आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात.

रेखा या स्वतः सेक्सवर्कर आहेत आणि सेक्सवर्कर्ससाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याही.

कोरोनाचा धोका वाढायला लागला, तसं देशभरातल्या रेडलाईट एरियामधल्या वेश्यांनी व्यवसाय बंद केले. अधिकृत लॉकडाऊन जाहीर व्हायच्या आधीच या भागांमधल्या सेक्सवर्कर्सनी स्वयंस्फूर्तीनं गिऱ्हाईकांना यायची बंदी केली होती.

"कर्फ्यू लागायच्या तीन दिवस आधीच आम्ही व्यवसाय बंद केला. कारण आमच्यामुळे इतरांना आजार होऊ नये आणि इतरांमुळे आम्हाला. भीतीचं म्हणाल तर रोजच त्याच्या छायेत जगतो आहोत. आमचीही मुलं-बाळं लहान आहेत आणि पुढे काय होणार हा प्रश्न आमच्याही पुढे आ वासून उभा आहे. पण तरी माझं एकच सांगणं आहे, आम्हाला जर आजार झाला नाही, तर तुम्हालाही काही होणार नाही," रेखा आपल्या भावना व्यक्त करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन करून आता आठवडा उलटला आहे आणि कोव्हिड- 19 च्या भीतीच्या छायेत सगळेच व्यवहार ठप्प आहेत.

शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांचं अतोनात नुकसान होतंय आणि त्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. असाच हातावर पोट असणारा, समाजातला सगळ्यांत दुर्लक्षित आणि उपेक्षित वर्ग म्हणजे सेक्सवर्कर्स.

महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 30 लाख वेश्या आहेत.

या लॉकडाऊनच्या काळात निमुळत्या गल्ल्या, अंधारे जिने आणि अत्यंत लहान घरांमध्ये बांधलं गेलेलं त्यांचं आयुष्य कसं चाललंय हे जाणून घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.

जेवणाची भ्रांत

व्यवसाय बंद असल्यामुळे या वेश्यांच्या हातात पैसा येणं बंद झालं आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे छोटे दुकानदार, दलाल आणि पानपट्टीवाले यांच्याही हातात येणारं उत्पन्नही आटलं आहे.

राणी खाला भिंवडीमध्ये सेक्सवर्कर आहेत, "त्या सांगतात, सध्या दातावर मारायला सुद्धा रूपया हातात शिल्लक नाही. दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत आहे आणि आता जगण्यासाठी सारी भिस्त स्वयंसेवी संस्थांवर आहे."

या रेडलाईट एरियात अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह, टीबीच्या रूग्ण असणाऱ्या सेक्सवर्कर्स आहे, त्यांना दवाखान्यात जाणं मुश्कील झालं आहे, राणी नमूद करतात. "त्यांची नेहमीची औषधं आम्ही आणून देतो. अगदीच कोणाची तब्येत बिघडली तर संस्थेची अँब्युलन्स मदतीला येते."

अनेक स्वयंसेवी संस्था सेक्सवर्करला रोजचं जेवण पुरवतात.

"आम्हाला जितकी मदत मिळेल तितकी कमीच आहे," भिंवडीतल्या रेडलाईट भागात काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या डॉ. स्वाती खान सांगतात.

"कोणत्याही संकटात सगळ्यांत शेवटी मदत मिळणारा बहिष्कृत घटक म्हणजे वेश्या. तरी माझ्या वारागंना भगिनींनी समाजाचा विचार करत सगळ्यांत आधी आपला व्यवसाय बंद केला आणि याच भगिनी एकमेकींना मदत करत आहेत," त्या सांगतात.

भिवंडी शहरात हनुमान टेकडी रेडलाईट एरियात 565 वेश्या आहेत. 20 सेक्सवर्कर्सची टीम या सेक्सवर्कर्सला योग्य ती मदत मिळावी म्हणून स्वयंसेवकांचं काम करत आहेत. यांच्यामार्फत इतर सेक्सवर्कर्सला शिधा, दूध आणि इतर जीवनावश्यक गोष्टी पुरवल्या जातात.

"कोणीही उपाशी मरता कामा नये हा आमचा उद्देश आहे. सध्याचा कोरोना व्हायरसचा जो प्रसार झालाय तो पाहाता आम्हाला पुढच्या निदान 6 महिन्यांची सोय करावी लागेल हे निश्चित. कारण लॉकडाऊन जरी संपला तर सोशल डिस्टंन्सिगच्या नियमामुळे पुढचे काही महिने तरी या सेक्सवर्कर्सला आपला व्यवसाय सुरु करता येणार नाही" डॉ. स्वाती सांगतात.

मालकिणी धावल्या मदतीला

वेश्याव्यवसायात असल्या तरी प्रत्येक सेक्सवर्करची परिस्थिती सारखीच नाही. काही महिलांनी बचत केलीय, काही जवळपास थोडा पैसा बाळगून आहेत तर काही अगदीच कफल्लक आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मदतीची वाट न पाहात सेक्सवर्कर्सनीच आपल्यातल्या हलाखीत जगणाऱ्या महिलांना मदत करायला सुरुवात केली आहे.

"माझ्या घराजवळ एकजण राहाते. तिचं कुटुंब 8 माणसांचं आहे. एकटीसाठी फूड पॅकेटवर अवलंबून राहाता येतं, पण 8 जणांचं पोट कसं भरणार? शेवटी मीच तिला 10 हजार रुपये दिलेत आणि म्हटलं, याचं करून खा. काय करणार, आता आम्हालाच आमच्यासाठी उभं राहावं लागेल," रेखा म्हणतात.

आसावरी देशपांडे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या समन्वयक आहेत. ही संस्था नाशिकमधल्या सेक्सवर्कर्सला जेवण, औषधं आणि इतर जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याचं काम करत आहे.

त्या सांगतात, "सहसा मालकिणी वाईट वागतात असा समज आहे. पोलीस पण सगळ्यांत आधी मालकिणींवर केस दाखल करतात. पण या मालकिणी गुन्हेगार नाहीत, उलट त्यांनीच इतर वेश्यांना मदत करायला सुरुवात केली आहे."

ज्यांच्याकडे राहायला जागा नाही अशा सेक्सवर्कर्सला मालकिणींनी आपल्याकडे भाडं न घेता राहायला जागा दिली आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जात आहे. म्हाताऱ्या वेश्यांची काळजी, तरूण, स्वतःजवळ थोडाफार पैसा असणाऱ्या वेश्या घेत आहेत.

सततची भांडणं आणि मानसिक तणाव

आयुष्यात सगळं अचानक ठप्प झाल्याचा परिणाम या सेक्सवर्कर्सच्या मानसिकतेवरही झाला आहे.

"इथे रोज भांडणं होतात आणि आम्हाला त्यात मध्ये पडावं लागतं. त्या महिलांचाही दोष नाही, त्यांची मानसिकताच तशी झाली आहे आणि आता काम बंद आहे, सगळीच अनिश्चितता आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर 8 दिवसांनी एक दिवस असा आला की एकही भांडण झालं नाही. या महिलांना आता कळालंय की आपल्यालाच एकमेकींना आधार द्यायचा आहे. आता आम्ही यांचं मानसिक आरोग्य नीट राहावं म्हणून प्रयत्न करणार आहोत," डॉ स्वाती सांगतात.

रेडलाईट एरियामधल्या अनेक महिलांची स्वतःची जागा नाहीये. एका खोलीत शेअरिंगमध्येही काहीजणी राहातात. तर काही कॉमन हॉलमध्ये. असं राहणं धोक्याचं नाही का, असं विचारल्यावर रेखा विचारतात, "आम्हाला गावाकडे जाता येत नाही, समाज स्वीकारत नाही, नातेवाईक घरात घेत नाही मग आम्ही जायचं तरी कुठे?"

उत्पन्नाचे इतर स्रोत

या आरोग्य संकटाच्या काळात स्पर्शावर आधारित असणारा हा व्यवसाय पूर्ववत व्हायला अनेक महिने जातील हे दिसतंय. त्यामुळेच वेश्यांना दुसरा काही उत्पन्नाचा स्रोत मिळावा म्हणूनही काही स्वयंसेवी संघटनांनी त्यांना इतर काही कौशल्ये शिकवायला सुरूवात केली आहे.

आसावरी सांगतात, "आम्ही या सेक्सवर्कर्सला व्होकेशनल ट्रेनिंग देत आहोत. त्यांना पेपरबॅग बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आहे. आम्ही मास्क बनवण्याच्या तयारीत आहोत आणि त्यासाठी आम्ही जनकल्याण विभागाशी जोडून घेतलंय. सेक्सवर्कर्सला त्यांच्या घरी जाऊन ट्रेनिंग देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे."

असाच काहीसा अनुभव डॉ स्वाती यांचा आहे. 24 तास या महिला घरात बसून असतात आणि त्यांना काही काम नसतं. हातात येणारा पैसा बंद झाला आहे, त्यामुळे मानसिक तणावही वाढला आहे. यावर मात करण्यासाठी त्यांनी महिलांसाठी इंग्रजी बोलण्यासाठी, तसंच इतर गोष्टी शिकवण्याचे क्लासेस सुरू केले आहेत.

"सोशल डिस्टन्सिग तसंच इतर सगळे नियम पाळून आम्ही एका वेळेस फक्त पाच महिलांसाठी चालणारे हे कोर्सेस सुरू करत आहोत आणि हे त्यांच्या घरातच चालतील त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आमच्याकडे एक मुलगी सुंदर इंग्रजी बोलते, तीच या महिलांना शिकवणार आहे. या सेक्सवर्कर्सला आधीही ट्रेनिंग द्यायचे प्रयत्न केले होते. पण त्यांनी यात कधी रस दाखवला नाही. पण आता हा त्यांच्यासाठी रोजच्या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे," त्या माहिती देतात.

संपूर्ण आयुष्य एका जागी गोठून गेलंय, हातात पैसा नाही, मुलांच्या भवितव्याची चिंता सतावतेय अशात कोणती गोष्ट तुम्हाला धीर देतेय विचारल्यावर रेखा निश्चयी स्वरात म्हणतात, "जिवंत राहायचंय बस ! पुढचं पुढे पाहता येईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)