कोरोना व्हायरस: मुंबई शहरात आज अचानक 59 नवे रुग्ण कसे आढळले?

मंगळवारी संध्याकाळी आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 230वरून एका झटक्यात 302 वर गेला आहे. यात सर्वाधिक 59 रुग्णांची नोंद ही एकट्या मुंबईत झाली आहे.

त्याखालोखाल 13 रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर 5 रुग्ण पुण्याचे, 3 नगरचे आणि 2 बुलढाणा येथील आहेत. त्यामुळे एका दिवसातच राज्यात 82 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्राचे कोरोनाची लागण झालेल्यांचे आकडे सुरुवातीपासून सातत्याने वाढत आहेत, मात्र असं काय झालं की एका दिवसात 82 रुग्ण आढळले?

तर हे आकडे एका दिवसात वाढलेले नसून, त्यात गेल्या पाच दिवसांत राज्यातील खाजगी प्रयोगशाळांमध्ये निदान झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. खासगी प्रयोगशाळांतील अहवालांचे मूल्यमापन करुन मगच त्यांचा अंतिम अहवालात समावेश केला जात असल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचे प्रवक्ता अनुप यादव यांनी दिलं आहे.

सध्या राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक 151, पुणे शहर आणि ग्रामीण मिळून 48, मुंबई वगळता ठाणे मंडळातील महापालिकांमध्ये 36 आणि सांगलीत 25 रुग्ण आढळून आले आहेत.

मंगळवारी दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत, राज्यात आतापर्यंत 6,323 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 5,911 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, असं सांगितलं होतं.

मात्र त्यानंतर अचानक वाढलेले हे नवे रुग्ण खाजगी लॅबमधून आलेल्या रिपोर्टमुळे आहेत, असं आता स्पष्ट झालं आहे. सरकारच्या एका ताज्या प्रसिद्धिपत्रकानुसार, ICMRच्या अनुमतीने सध्या राज्यात 10 शासकीय आणि 13 खाजगी अशा एकूण 23 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत.

सध्या राज्यातले आकडे असे आहेत -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)