You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : 'हातावर पोट घेऊन आलो होतो, आता जीव वाचवायची वेळ आलीय'
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी
पाठीवर गाठोडं बांधून कुटुंबकबिला बरोबर घेऊन गावी निघालेले स्थलांतरितांचे तांडे तुम्ही पाहिलेत का?
28 वर्षांचे प्रेमचंद पाठीवर एक गाठोडं लटकवून उत्तरप्रदेशच्या रामपूरजवळ दिसले. ते चालतच बरेलीच्या दिशेने जात आहेत. या हायवेवर ते काय एकटे नाहीत. त्यांच्यासारखे शेकडो लोक संपूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता. त्यांच्यापासून काही अंतरावरच चालत असलेल्या तिघांनीही आपली बॅग पाठीवर लटकवली आहे. एक मोठी बॅग आलटून-पालटून दोघे पकडत आहेत.
तोंडावर मास्क लावलेले प्रेमचंद दिल्लीत एका ठिकाणी ते हंगामी स्वरूपाची नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचं कार्यालय बंद झालं. त्यामुळे नोकरीही गेली. जमा केलेल्या पैशातून दोन-चार दिवस पोट भरणंसुद्धा कठीण होतं. म्हणूनच ते गावाच्या दिशेने निघाले. पण गावी जाण्याचा हा निर्णय एव्हरेस्ट पर्वत चढण्यापेक्षाही अवघड ठरणार, हे बहुतेक त्यांना माहीत नव्हतं.
प्रेमचंद सांगतात, रेल्वे, बस सगळं काही बंद आहे. पायीच ते दिल्लीच्या आनंद विहार आंतरराज्य बस स्टँडला आले. तिथून एखादं वाहन मिळेल, असं वाटलं. पण जाण्याची कोणतीच सोय झाली नाही. त्यावेळी काही लोक चालत जाताना दिसले. त्यांच्या सोबतच पुढे निघालो. बॅगेत बिस्किटं वगैरे ठेवलेली आहेत. त्यानेच पोट भरत आहे. तीन दिवस चालत चालत इथंपर्यंत पोहोचलो आहोत. पुढेसुद्धा वाहन मिळालं नाही तरी हरकत नाही. असंच चालत राहीन. वाचलो तर घरापर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर जे व्हायचं ते होणारंच आहे.
हे सांगताना प्रेमचंदच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुढे चालू लागले.पोलीस आणि प्रशासनाला त्यांनी मदत का नाही मागितली, या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, आमचं नशीब चांगलं म्हणून 200 किलोमीटर चालूनसुद्धा पोलिसांचा मार नाही खाल्ला. मदतीचं जाऊ द्या. इथं सोबत चालत असलेल्या कित्येक लोकांनी त्यांचा मार खाल्ला आहे.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
प्रेमचंद यांचं घर फैजाबाद म्हणजेच अयोध्यामध्ये आहे. त्यांना फक्त इतकंच माहिती की हा रस्ता बरेलीला जातो. तिथून पुढे लखनऊ आणि पुढे फैजाबाद. म्हणजेच त्यांच्या घरापासून ते अजूनही 350 किलोमीटर दूर आहेत.
याच रस्त्याने इतर लोकसुद्धा आपल्या इच्छित स्थळी चालले आहेत. काहींना फक्त बरेलीपर्यंतच जायचं आहे. थकलेले असूनही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्यांचं गाव आता जवळ आलं आहे.
दीनानाथ त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत दिल्लीच्या मंडावलीवरून पायीच निघाले होते. त्यांना पीलिभितला जायचं आहे. सोबत थोडंफार खाण्यासाठी घेतलं होतं. रस्त्यात जाताना इतर वस्तूसुद्धा मिळाल्या. सुदैवाने त्यांना थोड्या थोड्या अंतरापर्यंत वाहनंही मिळत गेली. पण या दरम्यान त्यांनी 100 किलोमीटरचा प्रवास चालतच केला.
जनता कर्फ्यू ज्यादिवशी लावण्यात आला. त्या दिवसापासून अशी दृश्यं दिसत आहेत. खरंतर, सगळी कार्यालयं, मॉल आणि इतर आस्थापना त्याआधीच बंद करण्यात आल्या होत्या. तिथं काम करणाऱ्या सगळ्या मजुरांना सुट्टी देण्यात आली.
याशिवाय बांधकाम व्यवसायात मोठ्या संख्येने असलेल्या मजूरांनाही घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. इथं त्यांच्याकडे ना राहण्यासाठी जागा आहे, ना उपजीविकेसाठीचे पैसे.
गुरुवारीसुद्धा दिल्लीहून बरेली, रामपूर, मुरादाबाद आणि लखनौच्या दिशेने मोठ्या संख्येने लोक चालत जाताना दिसले.
दिलावर दिल्लीहून पायी लखीमपूर खीरीला जात होते. आपल्याजवळचे सगळे पैसे संपल्याचं त्यांनी रडतच सांगितलं.
अशा स्थितीत त्यांना एखादं वाहन मिळालं तरी भाडं देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
हीच परिस्थिती देशातील अनेक महामार्गांवर दिसून येईल. तिथं चालणाऱ्य लोकांची गर्दी पाहायला मिळेल. फरीदाबादहून बदायूंला जात असलेल्या तिघांशी स्थानिक पत्रकार बीपी गौतम यांनी चर्चा केली. त्यांना पोलिसांनी त्रास दिला नाही पण सीमा पार करण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये घेतल्याचं तिघांनी सांगितलं.
बाहेर राहत असलेल्या मजुरांची ही बिकट परिस्थिती पाहून गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही सूचना प्रशासनाला दिल्या. अशा प्रवाशांची जेवणाची सोय करावी, त्यांना शक्य ती मदत करावी, अशी सूचना त्यांनी केली.
डायल 112 या क्रमांकावर फोन करून आवश्यक ती मदत मागू शकता, असंही सरकारने सांगितलं. पण रस्त्यावरून चालत जात असलेल्या या मजुरांकडे मोबाईल फोनही नाही. ज्यांच्याकडे फोन आहे, त्याची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली आहे.
डायल 112 चे एडीजी असीम अरूण सांगतात, असे अनेक लोक हायवेवर आहेत, हे आम्हाला माहीत आहे. मदत हवी असल्यास त्यांनी आम्हाला कळवावे. आम्ही व्हॉट्सअप नंबरसुद्धा चालू केला आहे. तिथंही तुम्ही कळवू शकता. शक्य ती सगळी मदत करण्यात येईल. अशी मदत करणं सुरूच आहे.
112 क्रमांकावर फोन लागत नाही आणि लागला तरी कार्यवाही होत नाही, अशी लोकांची तक्रार आहे. पण कामाचा ताण भरपूर असल्यामुळे फोन लागत नसल्याचं अरूण सांगतात. मात्र फोन आल्यानंतर कार्यवाही होत नाही, हा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना पोलीस काठीचा प्रसाद देत असल्याचे किंवा त्यांना इतर शिक्षा देत असलेले अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बदायूंमध्ये आपल्याच घरी जाणाऱ्या लोकांना पोलिसांनी बेडूकउड्या मारायला लावल्या होत्या. हा व्हीडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यावर टीकासुद्धा झाली. पण संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही.
उत्तर प्रदेश पोलिसांतील एक वरीष्ठ अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात, खरंतर लोकांना वाटतं आपल्या प्रत्येक समस्येवरचा उपाय पोलिसांकडे आहे. सरकारमधल्या बड्या अधिकाऱ्यांनाही वाटतं की प्रत्येक निर्णय लागू करण्याची जबाबदारीसुद्धा पोलिसांकडेच आहे.
पोलीस ठिकठिकाणी गरजू लोकांची मदत करत आहेत. पण मदत मागत असलेल्या लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. मंगळवारी एका व्यक्तीचा कॉल आला. तीन दिवसांपासून उपाशी असल्याचं त्याने सांगितलं. धान्य पाठवा नाहीतर आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिली.
आता सांगा, अशा स्थितीत पोलीस काय करू शकतात.
हे अधिकारी सांगतात, पहिल्यांदा सांगितलं की कोणताच व्यक्ती बाहेर पडू शकणार नाही. जो जिथे आहे, तिथेच थांबेल. पण नंतर अंशतः सूट दिली गेली. पोलिसांनी सुरुवातीला रस्त्यावर येणाऱ्या लोकांवर कारवाई केली. पण आता घरी जात असलेल्या लोकांना मारलं जात नाही. पण फक्त मौजमजा म्हणून घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना काठीचा प्रसाद खावाच लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)