कोरोना व्हायरस: औरंगाबादच्या प्राध्यापिकेने केली कोव्हिडवर यशस्वी मात

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यासह देशभरात वाढतो आहे. मात्र त्याचवेळी औरंगाबादमधील एका प्राध्यापिकेने वैद्यकीय मदतीच्या साह्याने आजारावर यशस्वीपणे मात केली आहे.

औरंगाबादमधील एक प्राध्यापिका काही दिवसांपूर्वी रशियाला गेल्या होत्या. तिथून कझाकस्तानमार्गे दिल्ली आणि पुढे औरंगाबाद असा परतीचा प्रवास करत 3 मार्चला त्या भारतात परतल्या. त्यानंतर त्या 4 मार्चला त्या पुन्हा महाविद्यालयीन कामात रुजू झाल्या.

सुरुवातीला कोणतीही लक्षणं नसल्यामुळे त्यांना आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशयही आला नाही. प्रवासातही त्यांनी पुरेशी काळजी घेतलेली असल्यामुळे आपल्याला कोरोना होऊ शकत नाही, असं त्यांना वाटलं.

पण 7 मार्चला त्यांना ताप आणि खोकला येण्यास सुरुवात झाली. पण सुरुवातीला काही अँटीबायोटीक गोळ्या आणि इतर प्राथमिक उपचार त्यांनी केला. पण काही वेळ बरं वाटून पुन्हा हीच लक्षणं पुढे कायम होती. पुढच्या दोन तीन दिवसांत रात्री अचानक थंडी वाजून येणं, अस्वस्थ वाटणं, श्वास घेण्यास अडचणी अशी लक्षणं दिसून आल्या, असं प्राध्यापिकेने सांगितलं.

त्यानंतर 13 तारखेला त्यांची तपासणी औरंगाबादमधील सेठ नंदलाल धूत रुग्णालयात करण्यात आली. त्यांचं सीटी स्कॅन आणि रक्त तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

कॉलेजच्या कामात सहभाग

सदरहू रुग्ण औरंगाबादच्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करतात. सध्या परीक्षांचा हंगाम असल्यामुळे कामावर परतताच प्राध्यापिकेने अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेतल्याचं समोर आलं होतं.

परतल्यानंतर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. प्राध्यापिकेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर येताच औरंगाबादमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.

याविषयीच्या उलटसुलट बातम्या आणि चर्चा महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर होत असल्यामुळे प्राध्यापिकेमुळे इतर कुणाला संसर्ग तर झाला नसेल, याबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या.

आरोग्य प्रशासनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन प्राध्यापिकेच्या संपर्कातील विद्यार्थी आणि इतर व्यक्तींची तपासणी केली. यामध्ये इतर व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झालं.

मानसिक तणावात

प्राध्यापिकेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं कळताच त्यांना सुरुवातीला याचा धक्का बसला होता.

त्या सांगतात, मला कोरोना व्हायरसची लागण होईल, असं कधीच वाटलं नव्हतं. रशियाहून परतताना संसर्ग कुठेही झालेला असू शकते. मी प्रवास केला होता. त्यामुळे मला लागण झाली हे मी मान्य करू शकते.

बहुतेक देवानेच मला यासाठी निवडलेलं असू शकतं. पण माझ्यामुळे इतरांना का त्रास होत आहे, याबाबत मला अस्वस्थ वाटत होतं.

माझ्यामुळे किती लोकांना संसर्ग झाला असेल, त्यांची काय चूक होती, ही गोष्ट सतावत होती, असं त्या सांगतात.

पण डॉक्टरांनी त्यांची समजूत काढली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना धीर दिला. त्याशिवाय विद्यार्थी तसंच इतर आप्तस्वकीयांनी त्यांचं मनोबल वाढवलं. त्यामुळेच त्यांना कोरोना व्हायरसशी लढण्याचं धैर्य प्राप्त झालं, असं त्या सांगतात.

'आयसोलेशन' महत्त्वाचं

औरंगाबादमधल्या या प्राध्यापिकेने कोरोनाशी यशस्वी दोन हात केल्याने राज्यातल्या नागरिकांमध्ये आशादायी चित्र निर्माण झालं आहे. इथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचं कौतुक होतं आहे.

बऱ्या झालेल्या प्राध्यापिकेवर उपचार करण्याचा अनुभव जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने डॉ. हिमांशू गुप्ता यांच्याशी बातचीत केली.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 'आयसोलेशन' हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.

डॉ. गुप्ता सांगतात, जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहून आमच्या हॉस्पिटलने त्याची पूर्वतयारी केली होती. 1 मार्चलाच हॉस्पिटलमध्येच एक आयसोलेशन कक्ष बनवण्यात आला होता.

हा कक्ष मुख्य रुग्णालयापासून वेगळ्या ठिकाणी होता. याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी, पिण्याचं पाणी व स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात आली होती.

13 मार्चला प्राध्यापिका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची रवानगी आयसोलेशन कक्षात करण्यात आली. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

त्यांना WHO-ICMRच्या निर्देशानुसार अँटी रेट्रो व्हायरल औषधं देण्यात आली. दोन ते तीन दिवसांच्या औषधोपचारानंतर त्यांनी चांगला प्रतिसाद दाखवला. पाच ते सहा दिवसांत त्यांची प्रकृती चांगलीच सुधारली.

त्यानंतर पुन्हा दोनवेळा त्यांची तपासणी करण्यात आली. यात त्या कोरोना व्हायरस निगेटिव्ह असल्याचं आढळलं आहे.

परदेश प्रवासाचा इतिहास असल्याचं आढळल्यानंतर प्राध्यापिकेला योग्यवेळी आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं. त्यामुळेच त्यांच्यापासून इतरांना होऊ शकणारा संसर्ग टाळता आल्याचं औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी सांगतात.

डॉ. कुलकर्णी यांच्या मते, "कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असलेली प्राध्यापिका निगेटिव्ह होण्यामागे संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग यांची मेहनत होती. त्यांनी योग्यवेळी योग्य पावले उचलली.

याच प्रकारे नागरिकांनीही हे गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. अनेक लोक परदेश प्रवासावरून आले तरी ते लपवत आहेत. पण असं करू नये. अशा व्यक्तींनी स्वतःहून स्वतःला वेगळं ठेवलं पाहिजे. तरच प्रसार टाळता येईल."

डिस्चार्जनंतरही विशेष देखभालाची गरज

प्राध्यापिकेची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच सुधारत आहे. येत्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो, असं डॉ. गुप्ता सांगतात.

प्राध्यापक कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची सध्या कोणतीही शक्यता नाही. तरीही दक्षता म्हणून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे, असं डॉ. गुप्ता सांगतात.

पुढच्या 10 ते 15 दिवसांत त्यांनी घरातच राहावं, कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. यादरम्यान त्यांची तब्येत तसंच कोरोनाच्या लक्षणांचा अभ्यास करण्यात येईल.

खरं तर कोरोना निगेटिव्ह झालेल्या रुग्णापासून इतरांना काहीच धोका नाही. पण पुन्हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना पुन्हा कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते.

शिवाय सध्याच्या वातावरणात कोरोनाचा प्रसार टाळणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्हाला संसर्ग नसला तरी येणारा काही काळ तुम्ही गर्दीपासून दूर राहणं आवश्यक आहे.

दरम्यान WHOने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेले एकूण 2 लाख 67 हजार 13 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी जगभरात 11 हजारांपेक्षा जास्त तर भारतात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

पण WHOची आकडेवारी पाहिल्यास अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याचंही दिसून येईल. याचाच अर्थ तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाली तरी घाबरण्याचं कारण नाही.

जगभरात आतापर्यंत आढळून आलेल्या साथीच्या रोगांमध्ये कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हीड-19चा मृत्यूदर तुलनेने कमी म्हणजेच 3 टक्के इतका आहे.

भारतात आतापर्यंत 300 च्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अशा स्थितीत राज्यातील औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण उपचारानंतर निगेटिव्ह झाल्याचं आढळून आल्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)