कोरोना व्हायरस: 'जयपूर कॉकटेल' हा कोरोनावर इलाज ठरू शकतो का?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसचा भारतात झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 200च्या वर गेली आहे तर महाराष्ट्रात हा आकडा 52च्यावर आहे.

त्यामुळेच 31 मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरंनी महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरं - मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पण हे सगळं सुरू असताना जयपूरमधल्या डॉक्टरांनी दावा केला की त्यांनी HIVची औषधं देऊन कोरोनाची बाधा झालेले पेशंट्स बरे केले. या औषधाला माध्यमांनी 'जयपूर कॉकटेल'असं नाव दिलं आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हेच औषध महाराष्ट्रातल्याही काही पेशंट्सना दिलं जातंय.

HIVचं औषध कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी वापरण्यात येत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण या औषधामुळे प्रश्न सुटतील का?

कोरोनाच्या रुग्णांना HIVचं औषध?

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 आजारावर अजून कोणतंही औषध नाही. त्यामुळेच जगभरात मृतांचा आकडा आता 10,000ला टेकू लागला आहे, तर बाधितांची संख्या 2 लाख 34 हजारच्या पुढे गेली आहे.

पण ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यातल्या फक्त 2-3 टक्के लोकांचाच मृत्यू झालाय. म्हणजे हजारो लोक बरे होऊन घरी जातायत.

महाराष्ट्रातल्या रुग्णांवर उपचार कसे होत आहे, असं विचारला असता आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात, की कोरोनाची लस अद्याप उपलब्ध नाही त्यामुळे सध्या फक्त रुग्णांची लक्षणं तपासून त्यांच्यावर इलाज केला जात आहे.

याच पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांना जयपूरच्या प्रयोगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की "महाराष्ट्रातल्या 3 कोरोना रुग्णांवर अॅंटी-रेट्रोव्हायरल ड्रग्स म्हणजेच देण्यात आल्या आहेत."

यालाच 'जयपूर कॉकटेल' असं म्हणतात.

जयपूर कॉकटेल काय आहे?

जयपूरमधल्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये 4 कोरोना बाधित रुग्णांना HIVसाठी देण्यात येणारी औषधी दिली गेली. लोपिनाविर आणि रिटोनाविर ही औषधं एकाच वेळी HIV पॉझिटिव्ह रुग्णाला दिली जातात. रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता अबाधित राहावी म्हणून हे औषध कामी येतं. याच औषधाचा वापर कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी करण्यात आला.

पण एका आजाराची, म्हणजेच HIVची औषधं अशी दुसऱ्या आजारावरील उपचारासाठी देता येतात का? तर नाही, असं औषध सरसकट देता येत नाही. यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चची (ICMR) परवानगी लागते.

या औषधीचा वापर कसा करावा, हे सांगण्यासाठी ICMR ने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी काही अटी घालून दिल्या आहेत.

काय आहेत या अटी?

  • पेशंट 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्यास
  • पेशंटला मधुमेह, हृदयरोग, ब्लडप्रेशनरचा त्रास असल्यास
  • श्वसनाची गती प्रतिमिनिट 22 हून कमी असल्यास
  • एक्स-रे चाचणीत फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन दिसल्यास
  • या अटींची पूर्तता केल्यावर रुग्णांना या औषधी देता येतात.

जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भंडारी यांनी बीबीसी हिंदीला माहिती देताना सांगितलं की ज्या रुग्णाची स्थिती अतिगंभीर असेल त्यालाच ही औषधं देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. SARS च्या वेळी देखील हीच औषधं देण्यात आली होती असं भंडारी सांगतात.

जयपूरमध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या राबवण्यात आल्यानंतर देशभरातून फोन येत असल्याचंही डॉ. भंडारी म्हणाले.

पण या उपचार पद्धतीवर मर्यादा आहेत, असं ICMRने स्पष्ट केलंय.

कोरोनाच्या औषधाचं काम कुठवर?

कोरोना विषाणूच्या रुग्णांवर इलाज व्हावा, यासाठी औषध शोधलं जात आहे तसंच त्याची लसही शोधली जात आहे. औषधांसाठी जे संशोधन होतं त्याला कोट्यवधी डॉलर्सचा खर्च येतो आणि हा खर्च अनेकदा औषधी कंपन्या करतात.

एखाद्या नवीन रोगावर नवं औषध कंपनीला सापडलं तर ते त्यातून बक्कळ पैसे कमावतात. पण औषध शोधायला वेळ लागतो आणि तोवर साथ निघून गेलेली असते. त्यानंतर औषध सापडलं तरी ते विकत घेणारे लोक नसतात. त्यामुळे कोव्हिड-19सारखे साथीचे रोग या कंपन्यांना फारसा पैसा कमावून देत नाहीत.

अमेरिकेतले बायोटेक्नोलोजीले गुंतवणूकदार ब्रॅड लॉनकार सांगतात की "सार्वजनिक आरोग्यावर संकट आणणारे जे रोग असतात, त्यांच्याविरोधात लस किंवा उपचार विकसित करणं कठीण असतं. त्यासाठी खूप पैसा आणि वेळ लागतो."

13 वर्षांपूर्वी सार्सची साथ आली होती, पण अजूनही त्यावर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडेलेलं नाही.

म्हणूनच कोविड-19च्या उपचारांवर काम करण्यासाठी आता CEPI नावाची स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे. यात नॉर्वे सरकार, भारत सरकार, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि वेलकम ट्रस्ट यांनी यासाठीचा निधी उभारला आहे. GSK नावाची फार्मा कंपनी CEPIसोबत काम करून कोविडचं औषध जेव्हा तयार होईल तेव्हा बाजारात आणेल. पण त्यासाठी अनेक महिने किंवा वर्षं लागू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)