You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली दंगल: पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीतल्या जाफ्राबाद भागात 24 फेब्रुवारी रोजी हेड कॉन्स्टेबल दीपक यांच्यावर बंदूक रोखणाऱ्या शाहरुख नावाच्या तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांमधील अधिकृत सूत्रांनी शाहरुखच्या अटकेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.
दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारादरम्यान शाहरुखच्या या व्हीडिओ क्लीपची सर्वाधिक चर्चा झाली होती.
या व्हीडिओमध्ये शाहरुख दिवसाढवळ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर बंदूक रोखत असल्याचं दिसतो. शाहरुखच्या मागे मोठा जमाव आहे. हा जमाव दगडफेक करतोय. हा तरुण पोलिसावर बंदूक रोखत पुढे जातोय आणि त्याच्या मागे तरुणांचा मोठा जमावही हातात दगड घेऊन पुढे जाताना दिसतो. तेवढ्यात व्हीडिओमध्ये गोळी झाडल्याचा आवाजही ऐकू येतो.
'द हिंदू' या वृत्तपत्राचे पत्रकार सौरभ त्रिवेदी यांनी हा व्हीडिओ ट्वीट करत लिहिलं आहे, "CAA विरोधी आंदोलक जाफ्राबादमध्ये गोळीबार करत आहेत. या व्यक्तीने पोलिसावर बंदूक रोखलीय. मात्र, तो न घाबरता तिथेच उभा होता."
मात्र, हा तरुण सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) समर्थकांपैकी होता, असंही सांगण्यात आलं. तसंच या तरुणाच्या मागे असलेल्या जमावाच्या हातात भगवे झेंडे होते, असंही सांगितलं जात होतं.
द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार सौरभ त्रिवेदी सोमवारी घटनास्थळी हजर होते.
या व्हीडिओविषयी बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मी मौजपूरहून बाबरपूरकडे जात होतो. तेवढ्यात मला माहिती मिळाली की मौजपूर आणि बाबरपूरच्या सीमेच्या जवळपास वाहनं पेटवण्यात आली आहेत आणि दगडफेक सुरु आहे. दोन्ही बाजूंनी जमाव येत होता. मी जिथे उभा होतो तिथे CAA चे समर्थक उभे होते. तर माझ्या समोरचा जमाव CAA विरोधात निदर्शनं करत होता. त्यातला एक तरुण पुढे आला. त्याच्या हातात बंदूक होती.
मागून जमाव दगडफेक करत होता. त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं. मात्र तो पोलीस कर्मचारी तिथेच उभा होता. यानंतर त्या तरुणाने जवळपास 8 राऊंड फायर केले."
सौरभ पुढे सांगतात, "माझ्या मागे उभा असलेला जमाव 'जय श्री राम'च्या घोषणा देत होता. म्हणजे दोन्ही जमावांच्या मध्ये एक पोलीस कर्मचारी उभा होता. गोळी झाडणारा तरुणी CAA विरोधात निदर्शनं करत होता."
सौरभकडून आम्हाला या घटनेचा चांगल्या क्वालिटीचा व्हीडिओ मिळाला. या व्हीडिओमधल्या ज्या वस्तुंना भगवे झेंडे म्हटलं जात होतं ते झेंडे नसून गाड्यांवर फळं आणि भाज्या ठेवण्यासाठी वापरल्या जाणारे नारंगी रंगाचे बॉक्स होते. निदर्शनं करणारे त्यांचा शिल्ड म्हणून वापर करत होते.
बरेच प्रयत्न करुनही मोहम्मद शाहरुख याच्या कुटुंबीयांशी आम्ही संपर्क साधू शकलो नाही.
मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि घटनेचा व्हीडिओ बघून एक गोष्ट स्पष्ट होते की मोहम्मद शाहरुख CAA समर्थक जमावाचा भाग नव्हता आणि त्याच्या मागे असलेल्या जमावाच्या हातात भगवे झेंडेसुद्धा नव्हते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)