You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली दंगल : हिंसा भडकावण्यासाठी मुसलमानांना पैसे वाटण्यात आले? - बीबीसी फॅक्ट चेक
- Author, कीर्ति दुबे
- Role, फॅक्ट चेक टीम, बीबीसी
दिल्लीच्या ईशान्य भागात हिंसाचार कमी झाल्यानंतर अनेक व्हीडिओ शेअर केले जात आहेत. अशाच एका व्हीडिओत दावा केला जात आहे की दंगल भडकावण्यासाठी मुसलमानांना पैसे देण्यात आले होते. हे खरं आहे का?
30 सेकंदाचा हा व्हीडिओ एका घराच्या छतावर शूट करण्यात आला आहे.
व्हीडिओत असं दिसतंय की रांगेत उभ्या असलेल्या महिलांना पैशाचं वाटप सुरू आहे. या रांगेत लहान मुलंही आहेत.
मनदीप टोकस नावाच्या युझरने हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्याने हा दावा केला आहे की हा व्हीडिओ ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारापूर्वीचा आहे. युझरच्या म्हणण्यानुसार मुसलमानांना हिंसा भडकावण्यासाठी पैसे देण्यात आले होते.
32 हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. पाच लाख लोकांनी हा व्हीडिओ पाहिला आहे. याशिवाय अन्य काही नेटिझन्सनी याच दाव्यासह हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. चार हजार लोकांनी तो शेअर केला आहे.
बीबीसीने या व्हीडिओची सत्यासत्यता पडताळली. खरंच हिंसा भडकवण्यासाठी पैसे देण्यात आले का याचा आम्ही शोध घेतला.
आम्ही हा व्हीडिओ काळजीपूर्वक ऐकला तेव्हा त्यात एक आवाज ऐकू आला- अल्ला इन्हे खूब देगा. त्याचा अर्थ आहे, अन्य माणसांना मदत करणाऱ्या माणसाला देवही मदत करेल.
बघताना व्हीडिओतलं ठिकाण ईशान्य दिल्लीतलंच वाटत होतं. शहानिशा करण्यासाठी आम्ही हिंसाग्रस्त भागात पोहोचलो. अनेक ठिकाणी पालथी घातल्यानंतर आम्ही न्यू मुस्तफाबादमधल्या बाबूनगर नावाच्या भागात येऊन पोहोचलो. बाबूनगरच्या गल्ली क्रमांक 4 मध्ये राहणाऱ्या माणसांना आम्ही हा व्हीडिओ दाखवला तेव्हा त्यांनी हा व्हीडिओ तिथलाच असल्याचं सांगितलं.
बाबूनगरमध्ये शिव विहारमधील अनेक मुसलमान आश्रय घेऊन राहत आहेत. काही दर्गे आणि घरांना निवारा कॅम्पमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे.
इथेच राहणाऱ्या हाशीम यांनी बीबीसीला सांगितलं की, मदत म्हणून शंभर, पन्नास रुपये देण्यात आल्याचं आम्हाला समजलं. या गल्लीबरोबरीने दुसऱ्या भागातही खायलाप्यायला देण्यात आलं.
आवश्यकता असणाऱ्यांना पैसेही देण्यात आले. बाहेरून आलेली काही माणसं ही मदत पुरवत आहेत. ती पंजाबी माणसं आहेत. रविवार, शनिवार आणि गेल्या तीन चार दिवसांपासून ही मदत येते आहे.
सकाळी, दुपारी-दिवसातल्या कोणत्याही वेळी ही मदत करण्यात येते. मदत मिळू लागली आहे हे कळताच महिला आणि लहान मुलं रांगेत उभी राहतात. खाण्याचं सामानही वाटण्यात येत आहे. ज्याला जे करता येणं शक्य आहे तो ते करतो आहे.
याच गल्लीत आम्ही पुढे गेलो तेव्हा मोठ्या भांड्यांमध्ये जेवण तयार होत होतं. मोहम्मद रफीक मंसूरी या भागात राहायला आलेल्या लोकांना जेवण पुरवतात.
ते म्हणाले, मदत म्हणून लोक तांदूळ देत आहेत. तुघलकाबादहून लोक तांदूळ देऊन गेले. दिल्लीच्या अन्य काही भागातून 10-20 किलो तांदूळ देण्यात आला आहे. आपलं घरदार सोडून आलेल्या लोकांना जेवायला मिळेल ही त्यामागची भावना आहे. अनेक छोटी मुलं आहेत.
आम्ही केलेल्या पडताळणीत हे आढळलं की दिल्लीत हिंसा भडकावण्यासाठी पैसे देण्यात आलेले नाहीत. उलट हिंसाचारात घरदार गमावलेल्या लोकांना मदत म्हणून पैसे देण्यात आले.
हा व्हीडिओ शिवपुरीतून जीव वाचवण्यासाठी पळालेल्या आणि आता बाबूनगरमध्ये राहायला आलेल्या लोकांचा आहे. त्यांना खाणंपिणं आणि कपडे देण्यात येत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)