You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली हिंसाचार: 'आमची चूक एकच होती, आम्ही जन्मानं मुस्लीम आहोत'
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कुठल्याही दंगलीत प्रामुख्यानं महिला आणि लहान मुलंच बळी ठरतात, हे दिल्लीत झालेल्या भयंकर धार्मिक दंगलीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं.
ईशान्य दिल्लीत घडलेल्या हिंसाचारात 40 हून अधिक जणांचा जीव गेला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हिंदूही आहेत आणि मुस्लीमही. हजारो मुस्लीम महिला आणि मुलं बेघर झाली. त्यांचं भविष्यच अंधारमय झालंय.
दंगलग्रस्त भागातल्या मुस्लीम महिला आणि मुलांना इंदिरा विहारमधल्या एका सभागृहात आश्रय देण्यात आला होता. त्याला मी भेट दिली.
इंदिरा विहारमधल्या एका सभागृहात अनेक महिला आणि लहान मुलं बसली होती. कुणी जमिनीवर, तर कुणी चटईवर. काही महिलांच्या कुशीत चिमुकली मुलं होती, तर चालता-फिरता येणारी चिमुकली मुलं सभागृहात फिरत होती, खेळत होती.
ज्या ठिकाणी या महिला आणि मुलं जमली होती, ते सभागृह एका मुस्लीम व्यापाऱ्याच्या मालकीचं होतं. मात्र, त्या सभागृहात दंगलीमुळं विस्थापित झालेल्यांनी आश्रय घेतला होता.
हिंदू जमावानं हल्ला केल्यानंतर शिव विहारमधून आपलं घरदार सोडून पळून आलेले सर्वजण या सभागृहात आश्रयाला आले. दंगलीचा सर्वाधिक फटका या शिव विहार परिसरालाच बसला आहे.
शिव विहार हा कामगार वस्ती असलेला भाग. दुर्गंधीयुक्त नाल्याच्या काही अंतरावर अत्यंत अरूंद भागात शिव विहार वसलं आहे. शे-दोनशे मीटरवर पुन्हा एक तसंच नालं आहे आणि तिथं चमन पार्क आणि इंदिरा विहार नावाचा मुस्लीमबहुल भाग आहे.
हिंदूबहुल आणि मुस्लीमबहुल भागांना फक्त एक रस्ता विभागतो. अन्यथा, गेल्या अनेक दशकांपासून इथले हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदानं नांदत होते. मात्र, दिल्लीतल्या या दंगलीनंतर सगळं बदललंय.
नसरीन अन्सारी या दंगलीनंतर शिव विहारमधलं आपलं राहतं घर सोडून इथं आल्या. त्या सांगतात, "बुधवारी (25 फेब्रुवारी) दुपारी हे सगळं सुरू झालं. यावेळी आमच्या भागात महिलाच आपापल्या घरी होत्या. कारण घरातली पुरूषमंडळी इज्तिमासाठी दिल्लीतल्या दुसऱ्या भागात गेले होते."
नसरीन सांगतात, "आम्ही 50-60 जणांचा जमाव पाहिला. ते कोण होते माहित नाही. कारण आम्ही त्यांना याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या जमावानं आम्हाला सांगितलं की, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आलोय, त्यामुळं तुम्ही घरातच राहा."
नसरीन आणि तिच्यासारख्याच इतर महिलांनी ज्यावेळी घरातल्या खिडक्यांमधून, टेरेसवरून जे पाहिलं, त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की, हा जमाव आपलं संरक्षण करण्यासाठी आला नाहीये.
खिडकीतून बनवलेला एक व्हीडिओ नसरीननं मला दाखवला. काही पुरुषांचा तो जमाव होता, प्रत्येकानं डोक्यात हेल्मेट घातला होता आणि हातात लाकडाच्या काठ्या होत्या, असं त्या व्हीडिओत दिसत होतं.
नसरीन सांगतात, कुणी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत होतं, तर कुणी हनुमान चालीसा गात होतं.
नसरीन यांची आई नूर जहाँ अन्सारी यांना त्यांच्या मुस्लीम शेजाऱ्यानं येऊन सांगितलं की, तुमच्या घराला आग लागलीय.
"आम्ही आमच्या घराच्या खिडकीतून दुसऱ्या मुस्लीम शेजाऱ्याचं घर आणि मेडिकलचं दुकान जळताना पाहू शकत होतो."
हल्लेखोरांनी विजेचं ट्रॉन्सफॉर्मर तोडून टाकलं. त्यामुळं संध्याकाळनंतर सर्वत्र काळोख झाला.
"त्यानंतर, आमच्या चहूबाजूंनी आग लावण्यात आली, पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, गॅस सिलेंडर फेकले गेले, मुसलमानांच्या मालकीची दुकानं आणि घरं जाळण्यात आली. हिंदू घरं मात्र जशीच्या तशी होती. त्यांना काहीच केलं गेलं नाही," असं ती सांगते.
"आमच्याबाबत असं काहीतरी होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आमची चूक एकच होती, ती म्हणजे आम्ही जन्मानं मुस्लीम आहोत," असं नसरीन म्हणते.
नसरीनच्या माहितीनुसार, त्यांनी पोलिसांना शेकडो फोन लावले. पोलिसांनी फोनवर बोलताना प्रत्येकवेळी एवढंच सांगितलं की, पुढच्या पाच मिनिटांत आम्ही घटनास्थळी येतोय.
नसरीन सांगते, "एक क्षण तर असा आला की, आम्ही नातेवाईकांना फोन करून सांगितलं की, आम्ही आता काही जगत नाही."
अखेर 12 तासांनी म्हणजे पहाटे 3 वाजता काही मुस्लीम लोकांसोबत पोलीस चमन पार्क आणि इंदिरा विहार भागात पोहोचले.
"जीव वाचवण्यासाठी आम्ही तिथून पळालो. फक्त नेसत्या कपड्यानिशी निघालो. पायात चप्पल घालण्यासही वेळ घालवला नाही. तसेच पळालो," असं नसीर सांगते.
इंदिरा विहारमधल्या या सभागृहात बसलेल्या इतर महिलांचेही त्या रात्रीचे अनुभव थोड्याफार प्रमाणात असेच होते.
19 वर्षांच्या शिरा मलिकच्या कुटुंबांना त्या रात्री शेजाऱ्यांच्या घरात आसरा घेतला होता. "आम्ही भयंकररीत्या अडकलो होतो. दगड आणि पेट्रोल बॉम्ब आमच्या घरावर फेकले जात होते," असं शिरा मलिक सांगते.
शिरा सांगते, "अनेक महिलांवर तर लैंगिक अत्याचार झाले असते. इथवर घटना घडल्या होत्या. काही महिलांचे स्कार्फ फाडले गेले, महिलांच्या अंगावरून कपडे ओढले गेले."
आपल्या घरात घुसणाऱ्या हल्लेखोरांनी कपडे फाडल्याचं सांगत एका वर्षाच्या बाळाची आई असणारी महिला रडत होती.
तर दुसरी तिशीतली महिला सांगत होती की, हिंदू शेजाऱ्यानं मदत केल्यानंच आज मी जिवंत आहे. शेजाऱ्यानं हल्लेखोरांना सांगितलं की, "ती आमच्यातलीच एक आहे. इथं कुणीच मुस्लीम नाहीय. हल्लेखोर परतल्यानंतर मग माझी सुटका झाली."
23 फेब्रुवारीला म्हणजे रविवारी संध्याकाळी CAA विरोधी आणि CAA समर्थकांमध्ये वाद झाला आणि तिथूनच या सर्व हिंसाचाराला सुरूवात झाली. हे सर्व शिव विहारपासून काही किलोमीटरवर घडलं.
काही तासातच या वादाचा जवळील शिव विहार आणि चमन पार्कला फटका बसला.
शिव विहार आणि चमन पार्कमध्ये मी फिरले. तिथं अजूनही भयंकर दंगलीच्या खाणाखुणा दिसतात. सर्व विस्कळीत झालेलं, उद्ध्वस्त झालेलं.
विटा आणि दगड सर्वत्र फेकलेले दिसतात, गाड्यांची जाळपोळ, दुकानं आणि घरं जाळलेली दिसतात.
शिव विहारमध्ये नाल्याकडे तोंड असलेली मशीदही जाळपोळीचा निशाणा बनली.
इंदिरा विहारमधल्या सभागृहात बसलेल्या महिला हतबलतेनं म्हणतात, "माहित नाही, आम्ही पुन्हा आमच्या घरी परतू शकू की नाही"
याच सभागृहात बसलेल्या शबाना रेहमान यांना त्यांचा चिमुकला मुलगा सारखा विचारत राहतो, आपण घरी कधी जाणार आहोत?
"माझं घर तर पूर्णपणे जाळलंय. आता आम्ही जाणार कुठं? माझ्या मुलांचं भविष्य काय? आमची सर्व कागदपत्रं जळली आहेत." असं म्हणत शबाना रडू लागली.
अनेक दशकांपासून शिव विहारमध्ये उभं असलेलं शबानाचं घर या सभागृहापासून काही अंतरावरच आहे. मात्र, तिथं जाणंही मुश्कील होऊन बसलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)