कडकनाथ कोंबडी घोटाळा कसा झाला, आता पुढे काय होणार?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू होऊन अनेक महिने होऊन गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून, विशेषत: सांगली, कोल्हापूरमधून कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्त हाका यायला लागूनही आता बरेच दिवस झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याला राजकीय रंगही मिळाला, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर सरकार बदललं. दरम्यानच्या काळात पोलिसांनीही काही कारवाई केली.

काही अटका झाल्या, काहींच्या ताब्यासाठी न्यायालयात जावं लागलं. वेळ जातो तशी चर्चा कमी होत जाते. पण जी घरं, जे संसार कडकनाथच्या या उद्योगात होरपळले ते अजूनही तसेच आहेत. या घोटाळ्याच्या व्याप्तीची शक्यता वाढते आहे, पण सरकारही अधिक शेतकरी त्यात अडकू नयेत म्हणून काही करत असल्याची चिन्हं नाहीत.

काही वर्षांपासून कडकनाथ हा एक चांगला पशुसंवर्धनाचा व्यवसाय म्हणून सुरू झाला. गेल्या साधारण पाच वर्षांच्या कालावधीत कडकनाथ कोंबड्यांचा बोलबाला झाला. सगळ्यांच्या, विशेषत: मांसाहारींच्या तोंडी हे नाव यायला लागलं.

महाराष्ट्रभरात कडकनाथ चिकन मिळणाऱ्या हॉटेल्सबाहेर बोर्ड दिसायला लागले. त्यासोबतच या काळ्या रंगाच्या कोंबड्याच्या मांसाच्या आणि अंड्याच्या औषधी गुणधर्माचे दावेही चर्चिले जाऊ लागले. या कोंबड्यांच्या व्यवसायाच्या यशस्वितेच्या कहाण्याही केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांतूनही समोर आल्या.

गुजरात सरकारनं तर ज्या घरांमध्ये, विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम, कुपोषित मुलं आहेत तिथं कडकनाथ कोंबड्या वाटण्याची योजनाही आखली. पण दुसरीकडे कोंबड्यांच्या या जातीचं जेव्हा चांगलं नाव झालं, तेव्हा त्यातून चेन मार्केटिंग करत मोठा नफा कमावण्याचे उद्योगही झाले आणि तिथं गणित फसलं.

सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यात या कोंबड्यांच्या व्यवसायानं महाभारत घडवलं. पश्चिम महाराष्ट्रात फिरतांना प्रत्येक गावागणिक लोक भेटतात आणि असं वाटतं की जणू प्रत्येक गावच या घोटाळ्याचं शिकार बनलं आहे. कडकनाथ कोंबडी घोट्याळ्यात पश्चिम महाराष्ट्रातली गावंच्या गावं अडकली आहेत. लोकांच्या आयुष्याची कमाई गेली आहे, भविष्याची तरतूद गेली आहे.

पाच लाखांची गुंतवणूक

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहादुरवाडीत चंद्रकांत खोत यांचा 12 एकरवर ऊस आहे. वडिलोपार्जित जमिन आहे. त्यांचं शिक्षण चांगलं झालं, प्रगतिशील शेतकरी झाले. वडिलोपार्जित शेती करण्यासोबतच जोडधंदा करावा म्हणून त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसायही सुरू केला. गेल्या वर्षी त्यांनी कडकनाथच्या एका खाजगी कंपनीनं सुरू केलेल्या योजनेबद्दल ऐकलं आणि त्यात पाच लाखांची गुंतवणूक केली. साडेतीनशे कोंबड्या त्यांच्या शेतावरच्या शेडमध्ये आणल्या. आता त्यातल्या आठ दहा शिल्लक आहेत. काही मेल्या आणि बऱ्याचशा विकल्या. ज्या योजनेत पैसा गुंतवला होता, त्यातनं एकही रुपया मिळाला नाही.

"ते औषधी आहे, ते साखरेच्या पेशंटना जातंय, बीपीला जातं, अंडं देशाबाहेर जातं असं आम्हाला सांगितलं. त्यांनी काय केलं की आमच्याकडनं अंडी घ्यायची, हॅचरीमध्ये पाठवायची, ती उबवून दुसऱ्या कस्टमरला पाठवायची. म्हणजे आम्हाला लुटायचं आणि त्यांचं लुटलेलं आम्हाला द्यायचं," चंद्रकांत खोत सांगतात.

या पट्ट्यात 'महारयत अॅग्रो' नावाच्या कंपनीच्या योजनेत अडकलेले शेतकरी आहेत. मागच्या दोन-अडीच वर्षांत या कंपनीनं बहुतांशी सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या हजारो शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात पैसे गुंतवायला लावले. केलेल्या गुंतवणूकीवर जवळपास 300 टक्के फायद्याचं अमिष दाखवलं. अडीच लाखांच्या गुंतवणुकीवर सात लाख मिळतील असे करार केले.

इस्लामपूरमध्ये या कंपनीचं मुख्य कार्यालय होतं आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस होतं. कंपनी सुरुवातीला कोंबड्या देईल, त्यांच्यासाठी खाद्यही पुरवेल आणि नंतर कालांतरानं अंडी आणि कोंबड्या विकत घेईल. सुरुवातीच्या काळात अनेकांना लाखो रूपये फायदा झाल्याचं सगळ्यांनी बघितलं.

साठ रुपयापर्यंत अंडं जातंय, पाचशेपेक्षा जास्तीला कोंबडी जाते असं सांगितल्यावर लोकांनी आणखी पैसे घातले. जाहिरात होत होती. गावातल्या गावात लोक एकमेकांचं बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते. कर्ज काढून, नातेवाईकांकडे पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं या साखळीत उतरत होती.

विलास रामचंद्र यादव हे बावची गावचे शेतकरी. वय साठीच्या पार झालं, रानातलं काम फारसं होईना तेव्हा सैन्यात असणाऱ्या आपल्या मुलाला त्यांनी या व्यवसायात पैसे गुंतवायला लावले. त्यांना वाटलं की गावाकडे ते या कोंबड्यांकडे पाहू शकतील. पोल्ट्री शेड भाड्यानं घेऊन कोंबड्या त्यात ठेवल्या. पण लवकरचं त्यांचं गणित डळमळलं.

"आमच्या युनिटला 10 महिने पूर्ण झाले आणि मला फसवणूक झाल्याचं समजलं. या महिन्यात पेमेंट देऊ, पुढच्या महिन्यात पेमेंट देऊ असं म्हणून कंपनीनं तीन महिने टोलवलं. शेवटी आम्ही 15-20 शेतकरी कंपनीत गेलो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की खाद्य काही नाही, तुमचं तुम्ही बघा, इथं कोणी नाही," यादव सांगतात.

सुरुवातीला कोंबड्यांचं खाद्य मिळालं. नंतर ते थांबलं तेव्हा अनेकांनी पदरमोड करून कोंबड्यांना जगवलं. पण कोंबड्याच इतक्या होत्या की ते फार काळ खर्च करू शकले नाहीत. काही कोंबड्या मेल्या, काही मिळेल त्या भावाला विकल्या.

कणेगांवला ओंकार पवार भेटतो. तो कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो. "पण सध्या मंदीचं वातावरण आहे, बेरोजगारी आहे. पुढे जाऊन त्यात पडण्यापेक्षा व्यवसाय करावा म्हणून वडिलांच्या मागे लागून हट्टानं यात पैसे गुंतवले. माझ्यासारखी यंग जनरेशनच या योजनेत सत्तर टक्के आहे. पण त्यांनी आमची स्वप्नंच संपवली," ओंकार त्याच्या शेतातल्या शेडमध्ये उभा राहून आम्हाला सांगतो.

त्यानं जवळपास 9 लाख रुपये या व्यवसायात गुंतवायला वडिलांना भाग पाडलं होतं. आता त्याला प्रश्न हा पडला आहे की पुढे सुद्धा मला व्यवसायच करायचा आहे हे वडिलांना कसं सांगू?

या कडकनाथच्या योजनेत केवळ सधन शेतकऱ्यांनीच पैसे गुंतवले नाहीत, तर स्वत:ची जमिनही नसणाऱ्या फासेपारधी समाजातल्या लोकांनीही नात्यागोत्यातून पैसे जमवून व्यवसाय सुरू केला.

गोटखिंडमध्ये अंकुशा काळेंचा परिवार आम्हाला भेटतो. गायरानाजवळ कच्च्या घरात ते राहतात. त्याला लागूनच कोंबड्यांच्या शेड त्यांनी उभारल्यात ज्या आता रिकाम्या आहे.

अंकुशा काळेंचे डोळे आम्ही निघेस्तोवर पाण्यानं गळायचे थांबत नाहीत. ते रडत रडत त्यांची कहाणी सांगत राहतात. "सगळ्या गावानं केलं म्हणतांना मीही हे केलं. पण सगळं आता गेलं. आता गावातून घरोघरी फिरून धान्य आणतोय जेवायला. लोक आता घरी येऊ नको म्हणतात. समोर उभं करत नाहीत," काळे सांगतात.

"माझ्या चार मुली हॉस्टेलला पाठवल्या आहेत जेवण नाही घरात म्हणून. सगळ्या कोंबड्या विकल्या. कोंबड्या तर आम्ही कापून सुद्धा खाल्ल्या नाहीत. तसली कोंबडी आम्हाला नको आहे. खाद्यं नाही म्हणून मेल्या कोंबड्या सगळ्याच. शाळेतनं मागूनसुद्धा दोन दोन पाट्या भात आम्ही आणून टाकला. कोण रोज रोज देणार भात आम्हाला?" अंकुशा काळेंची सून लांजी काळे आम्हाला म्हणतात.

सातारा, सांगली, कोल्हापूरच्या गावागावांतून अशा कहाण्या ऐकायला येतात. गेल्या काही दिवसांत कडकनाथ घोटाळ्यात पैसे गेलेल्या काहींनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या आहेत. पण पोलिसांकडे अद्याप तशी नोंद नाही.

केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही, तर पुणे, मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांतून कडकनाथच्या या घोटाळ्याच्या तक्रारी येताहेत. राज्याबाहेरही तो पसरला असल्याचं आता समोर येतंय. या सगळ्या शेतकऱ्यांनी आता एक संघर्ष समितीही स्थापन केली आहे. या समितीकडे आता इतर राज्यांतूनही तक्रारी येताहेत.

"सात राज्यांमधले जवळपास साडेआठ हजार शेतकरी याच्यामध्ये गुंतले असल्याची शक्यता आहे. आता ज्या काही कंप्लेंट येताहेत आणि लोकांचा आमच्या मिटिंगमध्ये सहभाग बघता साडेआठ हजार लोक आहेत आणि साडे सहाशे कोटींचा हा घोटाळा सात राज्यांमध्ये पसरलेला आहे."

'कडकनाथ कोंबडीपालक संघर्ष समिती'चे दिग्विजय पाटील सांगतात. या समितीनं सांगलीपासून मुंबईत आझाद मैदानापर्यंत, सगळीकडे आंदोलनं केली आहेत.

सदाभाऊ खोतांनी आरोप फेटाळले

कडकनाथ घोटाळ्यावरून पश्चिम महाराष्ट्रात राजकारणही तापलं. ज्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे ती माजी कृषी राज्यमंत्री आणि 'रयत क्रांती संघटने'चे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित आहे असे आरोप झाले. पण सदाभाऊ खोत त्यांना 'बीबीसी मराठी'नं याबद्दल विचारल्यावर त्यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

"यामध्ये काही शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली. आम्ही हा उद्योग करू का, म्हणून आम्हाला कुणी विचारायला आलेलं नव्हतं. किंवा कोणी हा उद्योग केला त्यांनीही तो पाहायला आम्हाला कधी बोलावलं नाही. हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा आमच्या संघटनेच्या आणि त्या कंपनीच्या नावामध्ये आम्हाला साम्य आढळून आलं. त्या व्यक्तीनं अशा पाच सहा कंपन्या काढलेल्या होत्या. आता एखाद्या नावात साम्य असेल आणि त्याची भागिदारीच त्यात आहे असं कोणी म्हणायला लागलं असेल, तर आमच्या नावात साम्य असलेल्या अनेकांन उद्योग उभे केले आहेत. त्यात आमची भागिदारी असली पाहिजे," सदाभाऊ खोत म्हणाले.

आतापर्यंत कुणा-कुणाविरोधात तक्रार दाखल?

'महारयत अॅग्रो'च्या संचालकांसह आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चार जणांना अटकही झाली आहे. सांगली पोलीस तपास करताहेत.

पण पोलिसांच्या तपासात ही केवळ एकटीच कंपनी या कडकनाथच्या चेन मार्केटिंगच्या व्यवसायात नाही आहे असंही समोर येतं आहे. कडकनाथच्या फायद्याच्या अमिषानं गंडा घालणाऱ्या इतरही कंपन्या आता प्रकाशात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

"सांगली जिल्ह्यात तासगाव पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची आणखी एक केस दाखल झाली आहे. ती केस एका वेगळ्या कंपनीची आहे. एका वेगळ्या कंपनीनं कडकनाथ कोंबड्यांचा बिझनेस सुरू केला. सारख्याच पद्धतीनं त्यांनीही लोकांची फसवणूक केलेली आहे. अशा प्रकारच्या अधिक कंपन्या महाराष्ट्रामध्ये असू शकतात. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तशा तक्रारी आलेल्या आहेत," असं या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारे सांगलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सांगतात.

आता यासारख्या अजून कोणत्या कंपन्या असे उद्योग करताहेत हे शोधणं पोलिसांसमोर आव्हान आहे. केवळ सांगलीच नाही, तर महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत तिथलेही पोलीस तपास करताहेत.

एकीकडे हा फसवणुकीचा सारा प्रकार आहे, पण दुसरीकडे आता हाही प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे की कडकनाथ आणि त्याच्या व्यवसायाबद्दल जे जे सांगितलं गेलं त्यात तथ्य किती आहे.

यशस्वी झालेली उदाहरणंही आहेत, पण या प्रकारच्या हजारोंच्या झालेल्या फसवणुकीला काय म्हणायचं? दीपक चव्हाण हे पोल्ट्री अभ्यासक आहेत आणि या क्षेत्रातल्या अनेक व्यावसायिकांचे ते सल्लागार आहेत. त्यांना आम्ही याबद्दल विचारलं.

"हे जसं सांगितलं तसं कधीच होणार नव्हतं. चेनचा फुगा फुटतोच. चेन सिस्टिम कशा काम करतात हे आपण पाहतोच. त्याची एक ग्लोबल किंवा डोमेस्टिक एक सिस्टिम असते, त्याच्या वेगवेगळ्या मोडस ओपरेंडीज आहेत, क्रिमिनल माईंड्स, स्मार्ट लोक बरोबर याच्यामध्ये वेळोवेळी ट्रेंड ओळखत असतात.

कधी ससे, कधी कोंबडी, कधी इमू. यांना फॉरमॅट्स हवे असतात फक्त. ते लोक बरोबर या फॉरमॅटमध्ये एण्ट्री करतात आणि चेन सिस्टीम जेव्हा तळाला जाते तेव्हा ती सर्वस्वी फेल जाते. तेच कडकनाथमध्ये झालं. ही चेन सिस्टिम फेल जाणार का होती, तर त्याला जो मूलभूत आधार लागतो डिमांडचा, संघटित बाजाराचा, शास्त्रशुद्ध पोल्ट्रीचा, तो नव्हता.

कारण ज्या प्रमाणात या चेननं त्याचा व्हॉल्यूम निर्माण केला होता किंवा त्याचा प्रचार केला होता, तो पचवू शकेल असा बाजारच आपल्याकडे अस्तित्वात नाही. हे लोक तर केवळ चेन मार्केटिंगपुरते संघटित होते. अॅग्रिमेंट करत होते. पण फॉरवर्ड लिंकेजमध्ये यांना काहीही अनुभव नाही. हे उत्पादन कुठं नेऊन टाकणार? त्यामुळे हे फेल जाणार हे त्यावेळेलाही स्पष्ट होतं,"दीपक चव्हाण सांगतात.

एका बाजूला या व्यवसायात पैसे गुंतवून अडकलेले हजारो संसार आहेत, दुसऱ्या बाजूला अजूनही पूर्ण न झालेला आणि सर्व सूत्रधारांपर्यंत न पोहोचलेला तपास आहे.

सोबतच एकच नाही तर अशा अनेक कंपन्या यात असल्याची शक्यता आहे आणि कडकनाथसाठी संघटित बाजार आपल्याकडे नसल्याचा तज्ञांचा सल्ला आहे.

सरकार आणि प्रशासनाला मोठ्या पातळीवर कडकनाथच्या प्रकरणात लक्ष घालावं लागण्याचं चित्रं आहे. पण त्याचं गांभीर्य अद्याप सरकारला आलेलं नसल्याचंही दिसतं आहे. ते लवकर समजावं या आशेनं हजारो डोळे नव्या सरकारच्या दिशेनं पाहताहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)