चंद्रकांत पाटील: शिवसेनेत हिंमत असेल तर विधानसभा एकट्याने लढवावी

आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :

1. चंद्रकांत पाटील: शिवसेनेत हिंमत असेल तर विधानसभा एकट्याने लढवावी

शिवसेनेत हिंमत असेल तर पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली तर शिवसेनेने निवडणूक एकटी लढवून दाखवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकांवरुनही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. देशाचं अहित झालं तरी चालेल मात्र भाजप जिंकता कामा नये असे सध्या राजकारण सुरू आहे.

"जसं काय शरद पवार - उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि यांच्यामुळे अरविंद केजरीवाल जिंकले अशा थाटात ते बोलत आहेत," अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2. राज्यात एनपीआर 1 मे पासून लागू होणार

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रात 1 मे ते 15 जून2020 या कालावधीत घरमोजणीबरोबर एनपीआरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून त्याबाबत स्वतंत्र अधिसूचना जाहीर होणार आहे.

रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर हा विभाग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. या विभागाने संपूर्ण देशात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत लोकसंख्या सूची अद्ययावत करण्यासाठी एनपीआरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत 6 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांचा समावेश असलेल्या प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार राज्यात घरयादी व घरमोजणीबरोबर एनपीआरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जनगणना कार्यवाही संचालनालयाचे सहसंचालक वाय. एस. पाटील यांनी दिली. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ

गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याचा आदेश आज काढण्यात आला.

अतिवृष्टीमुळे राज्यात 13 जिलह्यांमधील 2,01,496 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले तर सव्वा लाख शेतकऱ्यांनी 3,77,119 हेक्टर क्षेत्रात पेरणी केली होती त्यापैकी 65,267 क्षेत्राचे नुकसान झाले होते. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले होते. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

4. महागाईचा 6 वर्षांतला उच्चांक

महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी बुधवारी जाहीर झाली आहे. घाऊक बाजारामध्ये महागाईचा दर 7.59 टक्के इतका झाला असून गेल्या सहा वर्षांमधला महागाईचा हा उच्चांक आहे. तसेच सलग सातव्या महिन्यामध्ये महागाईचा दर वाढला आहे.

घाऊक बाजारात डिसेंबर महिन्यात महागाईचा दर 7.35 टक्के इतका होता. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वेग कमी झाल्याचे समोर आले आहे. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन 0.3 टक्क्यांनी घसरले.

गेल्या वर्षी याचकाळात 2.5 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरमध्ये औद्योगिक विकास 0.5 टक्क्यांनी घसरला आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. जहाजामध्ये अडकलेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण

जपानमधील डायमंड प्रिन्सेस क्रूझवर कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या आटवड्यात 3,711 प्रवाशांना घेऊन जाणारे हे जहाज जपानच्या किनाऱ्यावर रोखण्यात आले.

या जहाजावर 1387 भारतीय प्रवासी आहेत. जहाजातील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर जपानने प्रवाशांना उतरण्यास मनाई केली. जहाजातील 174 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 42,708 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)