You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार म्हणतात राज ठाकरे यांची भाषणं म्हणजे मनोरंजन
"भाजप हे देशावरचं संकट आहे असं सर्व राजकीय पक्षांचं मत आहे. ही आपत्ती घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं ही लोकांची भावना आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पवार बोलत होते.
"राजधानी दिल्लीत धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न फसला. भाजपचा धार्मिक कटूता पसरवण्याचा प्रयत्न फसला आहे," असं पवार यांनी म्हटलं आहे.
यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे यांच्याबाबत विचारलं.
राज ठाकरेंनी नागरिकत्व दुरुस्ती दुरुस्ती कायदा आणि एनआरसी यांच्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर ते म्हणाले, "काही लोक भाषणं ऐकायला तर काही फक्त भाषणं बघायला येतात. त्यामुळे राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही."
तसंच राज ठाकरे यांची भाषणं म्हणजे मनोरंजन असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय.
"दिल्लीच्या निकालामुळे आश्चर्य वाटलं नाही. आपचा विजय होईल असे कौल होते. जाणीवपूर्वक धार्मिक कटूता निर्माण करण्याचा प्रयत्न फसला" असं पवार म्हणाले.
भाजपच्या अहंकाराचा पराभव आहे. भाजपच्या पराभवाचा मालिका आता थांबणार नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता. भारतात घुसलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात हा मोर्चा असल्याचं मनसेनं सांगितलं होतं.
त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते, "यापुढे दगडाला दगडाने उत्तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. एकोप्याने रहा."
CAA-NRC च्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चांना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत यावेळी आव्हान दिलं होतं.
हिंदू जिमखान्यापासून आझाद मैदान असा महामोर्चा पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केलं होतं.
कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी काढलेल्या महामोर्चाचं कौतुक केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)