You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Delhi Election Results: भाजपला दिल्लीत धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा झाला का?
दिल्लीच्या निवडणुकांचे कल स्पष्ट होऊ लागले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार आपचं सरकार पुन्हा एकदा दिल्लीत येणार आहे. मात्र त्यांच्या जागा 2015पेक्षा कमी झाल्या आहेत.
या बदलाचा अर्थ काय? कोणत्या मुद्द्यांवरून लोकांनी हा कौल दिला आहे? आणि या सगळ्यात काँग्रेस कुठेय?
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी यावरच बीबीसीचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर यांच्याशी बातचीत केली.
आम आदमी पार्टीचा विजय होताना दिसतोय तो कशामुळे आहे? तीन गोष्टी चर्चेत होत्या: एक म्हणजे त्यांनी केलेली कामं - ते शाळा हॉस्पिटलविषयी सांगत होते. दुसरं म्हणजे त्यांनी फुकट दिलेल्या गोष्टी, आणि तिसरं म्हणजे अरविंद केजरीवांलांनी अत्यंत काळजीपूर्वक खेळलेलं राजकारण. तर यापैकी हा कशाचा विजय आहे?
मला वाटतं या तिन्ही गोष्टींचा विजय आहे. सुरुवातीचा कल अपेक्षेनुसारच आहे. आम आदमी पार्टीला 50 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा होतीच.
जरी 53 किंवा 57 असे आकडे येत असले तरी माझ्या माहितीनुसार ते भाजपला अगदी एक आकडी संख्येवर थांबवतील असं त्यांना वाटत होतं. ते होताना दिसत नाहीये.
गेल्या वेळी 'आप'ला 67 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सध्या त्यांना 14 जागांचं नुकसान झालं आहे.
हा विजय चांगला आहे. मात्र 'आप'ला जी अपेक्षा होती की भाजपला अगदी एक आकडी जागा मिळतील, तसं निदान आता तरी होताना दिसत नाहीये. पण अजूनही आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. काँग्रेसची कामगिरी कशी आहे, यावरही पुढची आकडेवारी अवलंबून आहे.
'आप'चं नशीब, हे काँग्रेसच्या हातात आहे. भाजपला 15-16 जागा मिळाल्या तरी त्यांच्यासाठी ते समाधानकारक असेल, कारण त्यांनाही कदाचित एक आकडी जागा मिळतील, असं त्यांना वाटत होतं.
भाजपने अनेकदा दावा केला होता की आम्हाला 45 ते 48 जागा मिळतील. आज सकाळी मनोज तिवारीही बोलत होते. त्यांना तो आत्मविश्वास दाखवावा लागला. ते स्वाभाविकही आहे.मात्र भाजपने जो प्रचार केला त्यात त्यांनी उघड उघड ध्रुवीकरणाचं राजकारण उघड-उघड केलं.त्या राजकारणाचा या मतमोजणीवर परिणाम दिसतोय का?
मला वाटतं भाजपने शाहीनबाग किंवा तत्सम मुद्दे आणले नसते तर त्यांना एक आकडी जागाच मिळाल्या असत्या. यामुळे दोन गोष्टी झाल्या. आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी मला जी माहिती दिली त्यानुसार त्यांनी मुद्दाम हे मुद्दे समोर केले. कारण आधी भाजपचे कार्यकर्ते अगदी मरगळलेले होते.
मात्र या मुद्द्यांमुळे त्यांच्या प्रचाराला उर्जा मिळाली. त्यामुळे त्यांना मतंही मिळाली. जर त्यांना या दोन आकडी जागा मिळाल्या याचा अर्थ त्यांना या ध्रुवीकरणाचा फायदा मिळाला.
पण भाजप जिंकू शकत नाहीये. ध्रुवीकरणाचं राजकारण एका मर्यादेपर्यंत चाललं. भाजपने नरेंद्र मोदींचा चेहरा वापरला, अमित शाहांनी प्रचार केला. नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभा निवडणुकीचा प्रचार करतात तेव्हा त्यांना जोरदार मतं मिळतात पण जेव्हा राज्याचा प्रचार करतात, तिथे त्यांची जादू चालताना दिसत नाही. मोदींचा ब्रँड विधानसभेला का चालत नाही?
आपण महाराष्ट्रात पाहिलं की युतीच्या जागा जरी जास्त आल्या तरी त्यांना बहुमत मिळालं नाही. 2018 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांचा पराभव झाला तेव्हा लोकांना वाटलं की आता देशाचं वातावरण बदललं आहे. मात्र चार महिन्यानंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्या राज्यात भाजपला बहुतांश जागांवर विजय मिळाला.
त्यांना 2014 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. मग हरियाणातही त्यांचं सरकार आलं. मात्र त्यांना जागा कमी मिळाल्या. झारखंडमध्येही त्यांना पराभव पत्करावा लागला.
दिल्लीमध्येही जागा वाढल्यात, मात्र त्यांना विजय मिळालेला नाही. मला वाटतं लोक दोन वेगवेगळं मतदान करतात. लोकसभेच्या वेळी ओडिशामध्ये मात्र बिजू पटनायकांचं सरकार आलं, आंध्र प्रदेशमध्येही तीच परिस्थिती आहे.
2014 मध्येही केंद्रात भाजपचं सरकार येऊनही दिल्लीत त्यांचा पराभव झालाच होता. बिहारमध्येही त्यांचा पराभव झाला होता. नितीश कुमार आणि भाजप एकत्र जाणार हेही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तिथे काय होतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. दिल्लीतल्या निवडणुकीची चर्चा जास्त आहे. मात्र तसं पहायला गेलं तर ते पूर्ण राज्य नाही, लोकसभेतही सातच जागा आहेत.
अरविंद केजरीवाल यांचं राजकारण तुम्ही जवळून पाहात आहात. मागच्या वेळी ते एखाद्या हट्टी लहान मुलासारखे वागत होते. पण आताचा त्यांचा प्रचार अतिशय सकारात्मक होता. सर्वधर्म समभाव जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे त्यांचं राजकारण काय होतं? आता ते निवडणूक जिंकताना दिसत आहेत. त्यामुळे आता ते पुढे काय करतील असं तुम्हाला वाटतं?
माझं मत असं आहे की अरविंद केजरीवालांनी मवाळ हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली आहे. हे त्यांच्या आंदोलनातही वारंवार दिसून आलं आहे. मोदींवर थेट हल्ला करणं ही त्यांची एक राजकीय चूक झाली, असं म्हणायला हरकत नाही.
2017 मध्ये पंजाबमध्ये त्यांच्या जागा कमी झाल्या. मात्र त्यांना नंतर जाणीव झाली की मोदींची लोकप्रियता प्रचंड आहे, त्यामुळे त्यांच्यावर उगारलेल्या दगडाने आपल्यालाच जखम होत आहे. त्यामुळे यावेळी प्रचारात त्यांनी मोदींवर कुठेही हल्ला केला नाही.
दुसरं म्हणजे, शाहीनबागच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असं त्यांनी प्रचारात स्पष्ट केलं. हे खरंतर धाडसी पाऊल होतं, कारण त्यामुळे त्यांची मुस्लीम मतं गमावण्याचा धोका होता. मात्र तरीही त्यांनी पाठिंबा दिला नाही.
तसंच त्यांनी हनुमान चालिसा म्हटली त्यामुळे हिंदुत्वाची कास त्यांनी फारशी सोडली नाही. पुढे काय करतील या मुद्द्यावर मला असं वाटतं की राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. ते
आणि प्रशांत किशोर मिळून मोदींना टक्कर देण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली त्यांच्या हातात आहे, त्यांच्याकडे वेळही आहे.
केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात गेले तर ते काम मनीष सिसोदियांकडे येतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फारसा करिश्मा नाही. तसं पाहिलं तर मनीष सिसोदिया हे केजरीवालांचे हनुमान आहेत तर अमित शहा हे मोदींचे. या दोघांनी प्रचाराचं रण यावेळी गाजवलं. त्यांच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता?
राष्ट्रीय राजकारणात येण्याच्या आधी नरेंद्र मोदी अगदी शेवटपर्यंत मुख्यमंत्रिपदावर कार्यरत होते. आता अरविंद केजरीवालांना जर राष्ट्रीय राजकारणात जायचं असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची चूक करतील, असं मला वाटत नाही. अशी चर्चा पंजाबच्या वेळी झाली होती. यावेळी ते शक्य आहे, असं मला वाटत नाही.
मोदींनी अमित शहांना पुढे करून प्रचार केला. मनीष सिसोदियांची भूमिका तितकीशी महत्त्वाची होती, असं मला वाटत नाही, कारण प्रचाराचा चेहरा अरविंद केजरीवालच होते. ते सिसोदियांना पुढे करतील, असं वाटलं होतं. मात्र सिसोदियांचा चेहराही आता मागे गेला होता.
या निकालांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का?
मला असं वाटत नाही. लोकांना लगेच हा राष्ट्रवादाचा पराभव आहे, किंवा ध्रुवीकरणाचं राजकारण चालत नाही असं सांगण्याचा मोह होतो. मात्र एक लक्षात घ्यायला हवं की ही दिल्लीची निवडणूक आहे. एक्झिट पोलचे निकाल पाहिले तर आता लोकसभेची निवडणूक झाली तर सर्व जागा भाजपला मिळतील, असं त्यात सांगितलं गेलं.
त्यामुळे आताच काही सांगणं तसं कठीण आहे. फक्त मोदींचा किमान राज्यात पराभव होऊ शकतो, असा विरोधकांना विश्वास वाटेल.
फक्त कसोटी असेल ती बिहारमध्ये. बिहारमध्ये भाजप आणि जदयू सोबत आहे. मला अजूनही असं वाटतं की बंगालचं उद्दिष्ट भाजपसमोर आहे. त्यांनी त्रिपुरामध्ये डाव्यांचा पराभव केला. त्यामुळे तिथे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)