दिल्लीत पुन्हा केजरीवालच; नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जींकडून अभिनंदन

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगानं 70 जागांपैकी 61 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. या 61 पैकी 54 जागांवर 'आप'ने विजय मिळवला आहे. भाजपला 7 जागांवर यश मिळालं आहे. उरलेल्या 9 जागांवर मतमोजणी सुरू असून 8 जागांवर 'आप'ला आघाडी मिळाली आहे. एका जागेवर भाजप आघाडीवर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल यांचं अभिनंदन करताना म्हटलं, "दिल्लीच्या जनतेनं आपला कौल दिला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतो. मी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचं अभिनंदन करतो. भाजप एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत जनतेच्या समस्या कायम मांडत राहील."

दिल्लीमधील निकाल स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. "दिल्लीकरांनी मला मुलगा मानलं आणि तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला. ज्यांना स्वस्त वीज मिळाली, शिक्षण मिळालं, चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या, अशा प्रत्येक दिल्लीकराचा हा विजय आहे," असं केजरीवाल यांनी म्हटलं.

"दिल्लीकरांचे आभार मानताना केजरीवाल यांनी अजून एकाचे आवर्जून आभार मानले. आज मंगळवार आहे. हनुमानाचा वार आहे. हुनमानजींचेही या विजयासाठी आभार," असं केजरीवाल यांनी म्हटलं.

केजरीवाल यांनी प्रचाराच्या काळात हनुमान मंदिराला दिलेली भेट, हनुमान चालिसा आणि त्यावर भाजप नेत्यांनी केलेली टीका काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. त्याच अनुषंगानं केजरीवाल यांनी न विसरता हनुमानाचे आभार मानले.

"दिल्लीत एका नवीन राजकारणाची सुरुवात झाली आहे, जो देशासाठी शुभ संकेत आहे. हेच राजकारण आपल्या देशाला एकविसाव्या शतरात घेऊन जाईल," असंही केजरीवालांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंकडून केजरीवालांचं अभिनंदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. "दिल्लीतील जनतेने देशात 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' चालणार असल्याचं दाखवून दिलं आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

"अरविंद केजरीवाल यांची दहशतवाद्यांशी तुलना करून, स्थानिक प्रश्नांवरून दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा केजरीवालांचा पराभव करता आला नाही. दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे राहिली. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

या पराभवाचं मला आश्चर्य वाटत नाही आणि हे होणारच होतं. ही पराभवाची मालिका आहे आणि आता ही थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या विजयानंतर व्यक्त केली.

"दिल्लीमध्ये भाजपकडून धार्मिक कटुता कशी वाढेल याची काळजी जाणीवपूर्वक घेतली. सत्तेतले लोक 'यांना गोळी घालू' अशी भाषा जाहीरपूर्वक करत होते. हा सगळा मर्यादा सोडून भूमिका घेण्याचा प्रयत्न होता. दिल्लीकरांना हे मान्य झालं नाही," असंही शरद पवार यांनी म्हटलं.

या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केलं आहे. भाजप ही देशावरील आपत्ती आहे आणि सगळ्यांनी मिळून ती दूर करायला हवी, अशी भावना सर्व विरोधकांमध्ये वाढीस लागताना दिसत आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर भाजपचा पराभव होईल.

भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी म्हटलं, "आम्ही अजून कष्ट करू जेणेकरून पुढच्या विधानसभा निवडणुकीत आमची कामगिरी सुधारता येईल. जर ही निवडणूक शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यावर झाली असती तर शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया पटपडगंजमधून पिछाडीवर नसते."

तर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीमधल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. "दिल्लीचा जो काही निकाल लागला आहे, त्यासाठी मी जबाबदार आहे."

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी दिल्लीतल्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, "भारत आणि पाकिस्तानदरम्यान मॅच सुरू होती. भारत जिंकला आहे."

काँग्रेसकडूनही 'आप'चे अभिनंदन

काँग्रेसचे लोकसभा गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी आपचं अभिनंदन केलं आहे. "सर्वांना माहीत होतं की आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्तेत येईल. काँग्रेसचा पराभव दुःखद आहे. आम आदमी पक्षाचा विजय हे भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाला प्रत्युत्तर आहे," असं मत चौधरी यांनी व्यक्त केलं.

भाजपच्या अहंकाराला जनतेनी नाकारलं असं मत शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केलं.

गेल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला 67 जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. भाजपने 13 ठिकाणी आघाडी घेतली आहे. काँग्रेस एकाही ठिकाणी आघाडीवर नाही.

निकाल काही आला तरी त्याला मीच जबाबदार आहे असं भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीचा प्रमुख होण्याच्या नात्याने पराभवाची जबाबदारी माझीच असेल असं मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.

सुरुवातीचे कल आपच्या बाजूने आहेत याबाबत बीबीसीचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर यांनी विश्लेषण केलं आहे. ते सांगतात, "हा सुरुवातीचा कल आहे. तरी तो अपेक्षेनुसारच आहे. आप ला 50 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा होतीच. जरी 53 किंवा 57 असे आकडे येत असले तरी माझ्या माहितीनुसार ते भाजपला अगदी एक आकडी संख्येवर थांबवतील असं त्यांना वाटत होतं.ते होताना दिसत नाहीये."

पुढे खांडेकर सांगतात, "गेल्या वेळी आप ला 67 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सध्या त्यांना 14 जागांचं नुकसान झालं आहे. हा विजय चांगला आहे. मात्र आप ला जी अपेक्षा होती की भाजपला अगदी एक आकडी जागा मिळतील तसं निदान आता तरी होताना दिसत नाहीये. पण अजुनही आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. काँग्रेसची कामगिरी कशी आहे यावरही पुढची आकडेवारी अवलंबून आहे."

या आकडेवारीच्या खाली तुम्हाला सर्व ताजे अपडेट पाहता येतील.

पाहा क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स

18:15 : ममता बॅनर्जींकडून अभिनंदन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून अरविंद केजरीवालांचं अभिनंदन केलं.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, "विखारी भाषण करून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्यांनी या निकालातून धडा घ्यायला हवा होता. कारण जे आपली आश्वासनं पूर्ण करतात, त्यांनाच यश मिळतं."

18.05: राहुल गांधींनी केलं केजरीवालांचं अभिनंदन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांचं तसंच आम आदमी पक्षाचं अभिनंदन केलं.

17.36 : केजरीवालांनी घेतलं हनुमानाचं दर्शन

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या. आपचे नेते मनीष सिसोदियाही केजरीवाल यांच्या सोबत होते.

14.55 : पटपडगंजमधून मनीष सिसोदिया विजयी

पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया विजयी झाले आहेत.

मतमोजणीच्या सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री सिसोदिया पिछाडीवर होते. मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि ती टिकवून ठेवत विजय मिळविला.

13.39 :'प्रादेशिक पक्षांनी एकत्र काम करण्याची गरज'

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपच्या अहंकाराला आपने प्रत्युत्तर दिल्याची टीका त्यांनी केली. प्रादेशिक पक्षांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

"दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपने 240 खासदार, 70 मंत्री, 40 स्टार कॅंपेनर्स यांना कामाला जुंपलं. त्यांनी 10,000हून अधिक रॅलीज घेतल्या पण लोकांना ध्रुवीकरणाऐवजी विकासाला पसंती दिली.

"भाजपला ही जाणीव व्हावी की त्यांचं द्वेषाचं राजकारण जनतेनी नाकारलं आहे. विशेषतः युवा वर्गाने," असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

13.17: ममता बॅनर्जी यांनी केजरीवाल यांना दिल्या शुभेच्छा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभेत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल ममता बॅनर्जींनी केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे.

केवळ विकासाचं राजकारण कामाला आलं. जनतेनं सीएए, एनआरसी आणि एनपीआरला नाकारलं आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

13.15 : 'भारताचा अंतरात्मा वाचवण्यासाठी दिल्लीकरांचे आभार'

भारताचा अंतरात्मा वाचवण्यासाठी दिल्ली ज्याप्रमाणे उभी राहिली आहे ते उल्लेखनीय आहे. दिल्लीकरांनो तुमचे आभार असं ट्वीट पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

दुपारी 1.05 : 'द्वेषाच्या राजकारणापासून दूर राहा'

जनतेनी द्वेषाच्या राजकारणापासून दूर राहावं असं बॉलिवुड अभिनेते जावेद जाफरी यांना वाटतं. त्यांनी एक ट्वीट टाकलं आहे. 'अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' या म्हणीला त्यांनी हलकसं ट्विस्ट करत "अॅन आप'ल अ डे कीप्स हेटरेड अवे' असं म्हटलं आहे.

12. 51: भारत जिंकला - आप नेता संजय सिंह

आम आदमी पार्टीने उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले या निकालाने हे दाखवून दिलं आहे की "भारत जिंकला आहे. भाजप निवडणूक प्रचारात म्हणत होतं की ही निवडणूक भारत-पाकिस्तान मॅचसारखी आहे. तुम्हीच बघून घ्या निकाल काय आला. भारत जिंकला."

दुपारी 12.45 वा. 'काँग्रेसला आत्मपरीक्षणाची नाही तर कृतीची गरज'

आमचा दिल्लीत पुन्हा दारुण पराभव झाला आहे. आता बस झालं आत्मपरीक्षण. अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिली आहे. वरिष्ठ स्तरावर लवकर निर्णय न घेणं, रणनितीचा अभाव, राज्य स्तरावर समन्वयाचा अभाव आणि जनतेशी तुटलेली नाळ हे आपल्या पराभवाला कारणीभूत आहे असं शर्मिष्ठा मुखर्जींनी म्हटलं.

दुपारी 12.19 वा. CAA मुळे भाजप हरतंय असं म्हणणं चुकीचं - मुनगंटीवार

भारतीय जनता पार्टी हरण्याचं कारण हे CAA किंवा इतर कायदे नाहीत असं मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. भाजपची मतांची टक्केवारी वाढली आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

तुम्ही CAA च्या नावाने मतं मागता मग CAA मुळे तुम्ही दिल्लीत हारलात असं कबूल का करत नाहीत असा सवाल मुनगंटीवार यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला.

आमची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्ही वाढल्या आहेत. काँग्रेसला दिल्लीत दारुण पराभव झाल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

दुपारी 12.06 वा. आपची टक्केवारी भाजपपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त

आम आदमी पक्षाला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 53.01 टक्के आहे तर भाजपला दिल्लीतल्या 39.2 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.

दुपारी 12.04 वा. आपची 57 जागांवर आघाडी

आम आदमी पार्टी सध्या 57 जागांवर पुढे आहे. भारतीय जनता पार्टी 13 जागांवर पुढे आहे. मॉडेल टाउन येथून भाजपचे कपिल मिश्रा चार हजार मतांनी मागे आहेत. ओखला मतदारसंघातही भाजपची पिछेहाट सुरू आहे. या ठिकाणी अमानतुल्लाह खान 65 हजार मतांनी पुढे आहेत.

सकाळी 11.54 वा. आम आदमी पार्टीचा जल्लोष

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष केला. बीबीसी मराठीने कार्यकर्त्यांसोबत फेसबुक लाइव्ह केलं आहे. लोकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच आमचा विजय झाला असं मत आपच्या महिला कार्यकर्तीने व्यक्त केलं.

मुंबईच्या कार्यालयातही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सकाळी 11.45 वा. मतदानाची टक्केवारी वाढली: भाजप

गेल्या वेळी आमच्या मतदानाची टक्केवारी कमी होती. मतांचं अंतरही अधिक होती पण यावेळी आमची मतदानाची टक्केवारी वाढली आणि जागाही आता वाढतील, असं भाजप नेते श्याम जाजू यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या गेल्यावेळी शून्य जागा होत्या आणि आता देखील शून्य जागा आहेत असं जाजू म्हणाले.

सकाळी 11.40 वा. भाजपच्या अहंकाराला जनतेनं नाकारलं: शिवसेना

भरती आहोटी हा राजकारणाचा भाग आहे पण सदा सर्वदा आम्हीच राज्य करू असा भाजपला अहंकार होता त्याला जनतेनं नाकारलं आहे असं मत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केलं.

दिल्लीच्या लोकांनी विकासाला मत दिलं आहे. आपने केलेल्या विकासावर दिल्लीकरांनी मतदान केलं. इतर प्रयोग फसले आहेत असं परब म्हणाले.

येत्या काळात शिवसेना केंद्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल का असं विचारलं असता अनिल परब म्हणाले की येत्या काळात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका राहील. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जनतेला पर्याय दिला, तसाच दिल्लीतही भाजपला नाकारुन जनतेनी केजरीवाल यांनाच पुन्हा पसंती दिली आहे असं परब म्हणाले.

सकाळी 11.36 वा. भाजप कार्यालयाबाहेर शुकशुकाट

आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर सध्या जल्लोष सुरू आहे तर भाजपच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट आहे.

सकाळी 11.06 वा. भाजपच्या ध्रुवीकरणाला आपचं चोख प्रत्युत्तर - काँग्रेस

काँग्रेसचे लोकसभा गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी आपचं अभिनंदन केलं आहे. सर्वांना माहीत होतं की आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्तेत येईल. काँग्रेसचा पराभव दुःखद आहे. आम आदमी पक्षाचा विजय हे भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाला प्रत्युत्तर आहे असं मत चौधरी यांनी व्यक्त केलं.

सकाळी 11.03 वा. आप 52 तर भाजप 18

निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सध्या आप 52 ठिकाणी आघाडीवर आहे तर भाजप 18 ठिकाणी आघाडीवर आहे.

सकाळी 11.01 वा. मनिष सिसोदिया 1500 मतांनी मागे

पटपडगंज मतदारसंघातून मनिष सिसोदिया फक्त 74 मतांनी पुढे आहेत. भाजपचे रवी नेगी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सकाळी 10.57 वा. आपचा जल्लोष सुरू

आपच्या कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत. ते जल्लोष करत आहेत. सौ सवाल एक जवाब अरविंद केजरीवाल असे पोस्टर्स झळकवले जात आहेत.

सकाळी 10.44 वा. आप उमेदवार आतिशीची पिछेहाट

निवडणूक आयोगाच्या कलानुसार आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी या 190 मतांनी मागे आहेत. भाजपचे धर्मवीर सिंह हे पुढे आहेत.

सकाळी 10.41 वा. मी माझा पराभव स्वीकारतो - काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा

निकाल पूर्ण येण्याधीच काँग्रेसचे विकासपुरीतले उमेदवार मुकेश शर्मा यांनी आपला पराभव मान्य केला आहे. भविष्यात दिल्लीच्या विकासासाठी आपण काम करत राहू असं मुकेश शर्मा म्हणाले.

सकाळी 10.29 वा. पराभवाची जबाबदारी माझीच - मनोज तिवारी

निकाल काही आला तरी त्याला मीच जबाबदार आहे असं भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीचा प्रमुख होण्याच्या नात्याने पराभवाची जबाबदारी माझीच असेल असं मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.

सकाळी 10.27 वा. अरविंद केजरीवाल 4 हजार मतांनी पुढे

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून 4 हजार मतांनी पुढे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे सुनील यादव हे उमेदवार आहेत.

सकाळी 10.22 वा. भाजपने पराभव स्वीकारला का?

विजयामुळे आम्ही गर्विष्ठ होत नाही तसेच पराभवामुळे खचून जात नाही असं भाजपच्या कार्यालयात असे पोस्टर लागले आहेत. या पोस्टरमुळे भाजपने पराभव स्वीकारला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळी 10.03 - आपची जल्लोषाची तयारी सुरू

आपच्या दिल्लीतील राऊज एव्हेन्यू या ठिकाणी असलेल्या मुख्यालयात जल्लोषाची तयारी सुरू आहे. निकालानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

सकाळी - 9. 59 वा. काँग्रेस कुठेही आघाडीवर नाही

काँग्रेसचे दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष सुभाष चोपडा म्हणाले होते यावेळी काँग्रेसची कामगिरी उल्लेखनीय राहील. पण अद्याप एकाही जागेवर काँग्रेसची आघाडी नाही.

चोपडा म्हणाले होते आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत भरपूर मेहनत घेतली आहे. यावेळी आमच्या चांगल्या जागा येतील.

सकाळी 9. 48 वा. घाई करू नका - अमित मालवीय

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपच्या मुसंडीवर प्रतिक्रिया दिली आहे. आताच घाई करू नका. दिल्ली निवडणुका संपल्या असं गृहीत धरू नका.

सकाळी 9.31 वा. निवडणूक आयोगानुसार कल येण्यास सुरुवात

निवडणूक आयोगाचे अधिकृत कल येत आहेत.त्यानुसार आम आदमी पार्टी 7 ठिकाणी तर भाजप 6 ठिकाणी आघाडीवर आहे.

सकाळी 9.10 वा. खरे कल 10 नंतरच कळतील - निवडणूक अधिकारी

मतमोजणीचे एकूण 13 राउंड होणार आहेत. खरे कल हे 10 वाजेनंतरच कळतील. सध्या पोस्टल बॅलेट सुरू आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी दिली.

सकाळी 9. 05 वा. थोडा वेळ थांबा आम्ही आमचा दणदणीत विजय होईल

सध्या आप 56 ठिकाणी तर भाजप 14 ठिकाणी आघाडीवर आहे. आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह म्हणाले की थोडा वेळ थांबा आमचा दणदणीत विजय होणार आहे. आपच्या गेल्या निवडणुकीत 67 जागा होत्या. त्या कमी होऊन 56 वर जाण्याची शक्यता आहे.

सकाळी 8. 47 वा. सुरुवातीच्या कलानुसार आप'ची जोरदार मुसंडी

सुरुवातीच्या कलानुसार आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. सध्या आप 55 ठिकाणी आघाडीवर आहे तर भाजप 14 ठिकाणी आघाडीवर आहे.

सकाळी 8.34 वा. - आप 43 तर भाजपची 13 ठिकाणी आघाडीवर

दिल्लीतील गोल मार्केट येथील मतमोजणी केंद्रावरील मतमोजणीचं दृश्य.

सकाळी 8 वा: मतमोजणीला सुरुवात

दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 32 ठिकाणी आप आघाडीवर आहे तर 10 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. दिल्लीतील महाराणी बाग केंद्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये एकूण 21 मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली.

सकाळी 7.58 वा. आप कार्यलयाबाहेर जमू लागली गर्दी

आम आदमी पक्षाबाहेर कार्यकर्ते जमा होऊ लागले आहेत. 2024 ची निवडणूक मोदी विरुद्ध केजरीवाल अशी होईल अशी आशा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

सकाळी 7.39 वा. आम्ही सत्तेत पुन्हा येऊ

आम्ही पाच वर्ष लोकांसाठी काम केलं आहे. त्यामुळे आम्ही नक्की निवडून येऊत असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

सकाळी 7.39 वा. मनिष सिसोदिया मतमोजणीसाठी तयार

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांनी आपल्या घरून देवाची प्रार्थना करून बाहेर पडल्याचं एएनआयने सांगितलं. तर आम आदमी पार्टीला यश मिळावं म्हणून कानपूरमध्ये प्रार्थना करण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

सकाळी 7.35 वा. 'भाजपच्या 55 जागा येतील'

दिल्ली भाजप प्रमुख मनोज तिवारी म्हणाले की "मी बिल्कुल नर्व्हस नाही. मला हा आत्मविश्वास आहे की आम्ही निवडून येऊ. आम्ही सत्तेत येऊ. जर आमच्या 55 जागा आल्या तर कुणाला आश्चर्य वाटायचं कारण नाही असं ते म्हणाले."

दिल्लीमध्ये 62.59 टक्के मतदान

दिल्लीमध्ये शनिवारी (8 फेब्रुवारी) विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान झालं. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एकूण 62.59 टक्के मतदान झालं.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा झालेल्या मतदानाची आकडेवारी कमी आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 65.63 टक्के मतदान झालं, तर 2015 साली झालेल्या निवडणुकीत 67.12 टक्के मतदान झालं. त्यातुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी किंचित घसरली.

एक्झिट पोलमध्ये आपला कौल

जवळपास सर्वच माध्यम समूहांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल, असं म्हटलं आहे. 70 जागा असलेल्या दिल्लीत बहुमतासाठी 36 जागा जिंकणे आवश्यक आहे.

एबीपी न्यूज आणि सी वोटर्सच्या एक्झिट पोलमध्ये 'आप'ला 49 ते 63 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टाइम्स नाउ आणि इप्सॉसच्या एक्झिट पोलनुसार 'आप'ला 47 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्ष आणि सिसेरोच्या एक्झिट पोलमध्ये 'आप'ला 54 जागा देण्यात आल्या आहेत.

रिपब्लिक टीव्ही आणि 'जन की बात'च्या एक्झिट पोलमध्ये 'आप'ला 48 ते 61 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)