India Vs New Zealand T20 : रोहित शर्मा, सुपर ओव्हरचा थरार अन् सोशल मीडिया

भारताचा हिटमॅन रोहित शर्माचीच चर्चा कालपासून सगळीकडे आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांचा तिसरा टी-20 सामना, रोहित शर्मा आणि सुपर ओव्हर या तीन गोष्टी गेले दोन दिवस सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळवण्यात आला.

पण हा सामना टाय होऊन सुपर ओव्हरपर्यंत जाऊन पोहोचला. सुपर ओव्हरमध्येही अतिशय रंगतदार स्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारुन रोहित शर्माने भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.

सामन्यात काय घडलं?

न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. रोहित शर्माच्या 65 आणि विराट कोहलीच्या 38 धावांच्या बळावर 20 षटकांत 5 बाद 179 अशी समाधानकारक धावसंख्या भारताने उभारली.

पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सुरूवातीला संयमी आणि विजय टप्प्यात आल्यानंतर केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारत सामना गमावणार, अशी चिन्ह दिसत होती.

न्यूझीलंडला शेवटच्या षटकात 6 चेंडूंत 8 धावा पाहिजे असताना कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमीकडे चेंडू दिला. शमीनेही टिच्चून मारा करताना पहिल्यांदा विलियमसनला बाद केलं. अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना रॉस टेलरलाही शमीने बाद केलं. त्यामुळे सामना टाय झाला.

कशी झाली सुपर ओव्हर?

या सामन्यातली खरी रंगत सुपर ओव्हरमध्ये दिसून आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

कर्णधार केन विलियमसन आणि मार्टिन गप्टील फलंदाजीसाठी मैदानात आले. तर चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती होता.

पहिल्या दोन चेंडूवर बुमराहने प्रत्येकी एक धाव दिली. पण त्यानंतर तिसऱ्या चेंटूवर विलियमसनने शॉर्ट लेगच्या दिशेने एक षटकार खेचला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवरही विलियमसनला चौकार मारण्यात यश आलं.

पण त्यानंतर पाचव्या चेंडूवर शॉट खेळताना विलियमसनने चेंडू हुकल्यामुळे त्यांना केवळ एक बाय धाव मिळाली. सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर मार्टिन गप्टीलने सुद्धा चौकार मारल्यामुळे न्यूझीलंडची सुपर ओव्हरमधली धावसंख्या बिनबाद 17 इतकी बनली.

भारताकडून सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. तर गोलंदाजीची जबाबदारी टीम साऊथीकडे होती.

पहिल्या चेंडूवरच रोहित शर्माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क न झाल्यामुळे त्याला फक्त दोन धावा घेता आल्या. यावेळी रोहित शर्मा धावबाद होण्याची शक्यतासुद्धा होती. पण थ्रो घेताना यष्टीरक्षकाने चूक केली. त्यामुळे रोहितला जीवदान मिळालं.

दुसऱ्या चेंडूवर रोहितला केवळ एकच धाव घेता आली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला आलेल्या राहुलने चौकार खेचून धावांचं अंतर कमी केलं. पण चौथ्या चेंडूवर त्याला एकच धाव काढता आल्यामुळे 4 चेंडूंवर 8 धावा अशी भारताची धावसंख्या होती.

आता भारताला शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावांची गरज होती. स्ट्राईकवर रोहित शर्मा होता. या दोन्ही चेंडूंना सीमापार टोलवल्याशिवाय भारताला सामना जिंकणं शक्य नव्हतं. त्यामुळे प्रेक्षकांचा श्वास रोखला होता.

पण रोहित शर्मा पुढच्या चेंडूसाठी तयारच होता. सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचला.

आता शेवटच्या चेंडूवर चार धावांची भारताला गरज होती. पण करो या मरो स्थितीत रोहित शर्माने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली.

शेवटचा चेंडू लाँग-ऑफच्या दिशेने हवेत फटकावून रोहित शर्माने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सोशल मीडियावर रोहितचं कौतुक

भारताने या थरारक विजयानंतर सोशल मीडियावर चर्चा होणार नाही तरच नवल. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर रोहितच्या कामगिरीचं कौतुक झालं.

अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या.

माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'ऐसा लगता है अपुनीच भगवान है.' रोहित शर्माच अशा प्रकारची कामगिरी करू शकतो.

हा विजय अतुलनीय असल्याचं मत माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केलं.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हेसुद्धा भारतीय संघाचं कौतुक करायला विसरले नाहीत. हा विजय अविश्वसनीय असल्याचं बच्चन म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)