Natasha Stanovich : हार्दिक पंड्याच्या सर्बियन गर्लफ्रेंडचं बॉलिवूड कनेक्शन

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघातील ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने चाहत्यांना आपल्या एन्गेजमेंटची गुड न्यूज दिली आहे.

सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक एन्गेज्ड झाले असून, स्वत: हार्दिकनेच याबाबत इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

दुबईत एका स्पीडबोटीवर हार्दिकने नताशाला प्रपोज केलं. "मै तेरा, तु मेरी, सारा हिंदुस्तान," असं हार्दिकनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.

नताशानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हार्दिकनं केलेल्या प्रपोजलचा व्हीडिओ शेअर केला आहे. तिनं हार्दिकसोबतचे काही फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून 'Forever Yes' असं म्हटलं आहे.

कोण आहे नताशा?

मूळची सर्बियाची असलेली नताशा ही मॉडेल आणि डान्सर आहे. ती भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्येच सक्रिय आहे. ती सध्या मुंबईतच राहते.

27 वर्षीय नताशानं आपल्या करिअरची सुरुवात 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' या चित्रपटातून केली. या चित्रपटात नताशानं एक आयटम साँग केलं होतं. त्यानंतर नताशानं अॅक्शन जॅक्सन, फुकरे रिटर्न्स, डॅडी, झीरो आणि यासारख्या चित्रपटातूनही लहानमोठ्या भूमिका केल्या.

इम्रान हाश्मी आणि ऋषी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'द बॉडी' या चित्रपटातही नताशाची भूमिका होती.

2014 मध्ये 'बिग बॉस'मध्ये नताशा सहभागी झाली होती. 2019 साली 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये नताशा तिचा एक्स-बॉयफ्रेंड अॅली गोनीसोबत सहभागी झाली होती.

विराट कोहलीनं दिल्या शुभेच्छा

हार्दिकनं इन्स्टाग्रामवर आपल्या एन्गेजमेंटची पोस्ट टाकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सर्वात पहिल्यांदा हार्दिकला त्याचा संघातला सहकारी कुलदीप यादवनं शुभेच्छा दिल्या.

'लख, लख वधाइयां,' या शब्दांत त्यानं हार्दिकचं अभिनंदन केलं.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनंही हार्दिकच्या पोस्टनंतर त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

26 वर्षीय हार्दिक पंड्या सध्या कमरेला झालेल्या दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहे. त्यामुळेच बांग्लादेश आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक टीममधून बाहेर आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही हार्दिक भारतीय संघामध्ये नसेल. मात्र, बीसीसीआयनं न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्यांना इंडिया-ए टीममध्ये सहभागी करून घेतलं आहे.

हार्दिकनं आपला शेवटचा सामना सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. हा टी-20 सामना होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)