You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bapu Nadkarni: सलग 21 मेडन ओव्हर टाकणाऱ्या माजी फिरकीपटूचं निधन
भारताचे माजी फिरकीपटू बापू नाडकर्णी यांचं मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
ते आपल्या अनोख्या फिरकी शैलीसाठी प्रसिद्ध होते आणि एका कसोटी सामन्यात सलग 21 मेडन अर्थात निर्धाव ओव्हर्स टाकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
रमेश गंगाराम नाडकर्णी असं पूर्ण नाव असलेल्या बापूंचा जन्म 4 एप्रिल 1933 ला नाशिकमध्ये झाला. पुणे विद्यापीठाकडून रोहिंग्टन बारिया ट्रॉफीच्या निमित्ताने त्यांनी 1950-51 क्रिकेटविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर महाराष्ट्रातर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी प्रवेश केला. 1956 मध्ये त्यांनी भारतीय संघात प्रवेश केला.
त्यांनी भारतातर्फे 41 कसोटी सामने खेळले. त्यांनी अवघ्या 1.67च्या इकॉनॉमीने रन्स देत एकूण 88 विकेट्स घेतल्या. त्यांच्या गोलंदाजीवर धावा करताना फलंदाजांना घाम फुटायचा.
1960-61मध्ये पाकिस्तान भारत दौऱ्यावर असताना कानपूरच्या सामन्यात त्यांनी 32 षटकांत फक्त 23 धावा दिल्या होत्या. त्यापैकी 24 षटकं निर्धाव (मेडन) होती. म्हणजे त्यांच्या नावापुढे 32-24-23-0 असे आकडे होते.
पुढे दिल्लीत झालेल्या सामन्यात त्यांनी 34 षटकांपैकी 24 ओव्हर मेडन टाकले आणि 24 रन देत एक विकेटही घेतली. मात्र मद्रासमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी 32 ओव्हर्सपैकी 27 ओव्हर मेडन टाकत एक विक्रम रचला. (32-27-5-0) हे आकडे आणि बापूंचा हा अचाट विक्रम आजही अबाधित आहे.
सर्व स्तरांतून श्रद्धांजली
त्यांच्या निधनाने तमाम क्रिकेट विश्वात दु:ख व्यक्त केलं जात आहे. भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी तसंच राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने त्यांना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलंय. "बापू नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. त्यांच्या 21 मेडन ओव्हरच्या विक्रमाच्या गोष्टी ऐकून मी मोठा झालो आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे."
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही बापूंना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणतात, "साठच्या दशकात ACC सिमेंटच्या क्रिकेट संघात बापू नाडकर्णींसह अर्धा डझन कसोटी क्रिकेटपटू होते. तर SBIच्या संघात अर्धा डझन. सिमेंट आणि बँ51159208 किंग या दोन संघांमध्ये भारतीय क्रिकेट टीम सुरक्षित होती.
"नाडकर्णींनी तर एकदा सलग 21 मेडन ओव्हर्स टाकले होते. आणि त्याच चिकाटीने बॅटिंगही करायचे. त्यांच्यासाठी 'खडूस' हा शब्द पुरेसा आहे."
"ते मुंबईतील 50 आणि 60च्या दशकातील पिढ्यांचे प्रतिनिधी होते. त्यातले सगळे महान क्रिकेटपटू आता आपल्यात नाहीत," असंही देसाई म्हणाले.
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही नाडकर्णींना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय, "बापू गेल्याची दु:खद बातमी कळली. मुंबई आणि भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा खांब निखळला. त्यांच्या पिढीत असलेल्या अनेक विनयशील लोकांपैकी ते एक होते. माझी आणि त्यांची ओळख असल्याचा अभिमान आहे."
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितलं की "उत्तम गोलंदाजीबरोबर ते उत्तम फलंदाजीही करत. ते उत्तम फील्डरही होते. तसंच व्यक्ती म्हणून महानच होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नाडकर्णींना श्रद्धांजली वाहिली आहे. "कसोटीत सलग 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम अद्यापही कुणी मोडलेला नाही. नव्या पिढीतल्या लोकांनाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वातल्या जादुई गोलंदाजीचं पर्व संपलं," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसंच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून बापू नाडकर्णींना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)