अक्षय कुमारवर जेव्हा मराठा शासकांचा अवमान केल्याचा आरोप झाला होता...

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याने केलेल्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. यावेळी त्याने तंबाखूची जाहिरात केली आणि तिच्यातून माघारही घेतली आहे.

पण, अक्षय कुमार आपल्या जाहिरातीमुळे पहिल्यांदाच वादात सापडला असं नाहीये.

2020 मध्ये तो एका जाहिरातीमुळे वादात अडकला होता. निरमा वॉशिंग पावडरची ही जाहिरात होती. या जाहिरातीत अक्षय कुमारने एका मराठा राजाची भूमिका केली होती.

या जाहिरातीमुळे शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याचं म्हणत अक्षय कुमारविरोधात मुंबईच्या वरळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचीही त्यावेळी चर्चा होती.

काय होतं या जाहिरातीत?

जाहिरातीत मराठा राजा असलेला अक्षय कुमार युद्ध जिंकून आपल्या सैनिकांसह महालात प्रवेश करतो. त्यावेळी त्या सगळ्यांचे कपडे मळलेले असतात.

हे बघून एक महिला म्हणते युद्ध जिंकलात पण कपडे तर आम्हालाच धुवावे लागतात. यावर अक्षय कुमार म्हणतो, "महाराज और उसकी सेना दुश्मन को धोना जानती है और अपने कपडे भी." यानंतर महाराजांसह सर्व सैनिक निरमा वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुतात.

महाराजांना अशापद्धतीने चित्रित करण्यात आल्याने सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ट्वीटरवर #BoycottNirma हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला होतं.

त्यावेळी आलेल्या काही प्रतिक्रिया अशा होत्या...

शिवप्रेमी असाल तरी ही अॅड हेटफुल म्हणून रिपोर्ट करा. मावळ्यांचा अपमान खपवून घेऊ नका.

हर्षद ढमाळेंनी लिहिलं होतं, "बॉलीवुड कायम आमच्या इतिहासाला, आमच्या संस्कृतीलाच लक्ष्य का करतात? मग ते केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असो. दबंग 3 मध्ये साधुंची थट्टा आणि आता निरमामध्ये मराठा सरदारांची थट्टा उडवण्यात आली आहे."

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "मराठा सरदार स्वराज्यासाठी लढले, त्यांची नक्कल करणं अपमान आहे. निरमा आणि अक्षय कुमार यांनी सार्वजनिक माफी मागावी आणी ही जाहिरात ताबडतोब मागे घ्यावी."

गोविंद चोडणकर यांनी म्हटलं, "मराठा सरदार देशाचा अभिमान आहेत. त्यांची मस्करी करण्याचा निरमाला अधिकार नाही. निरमा आणि अक्षय कुमार यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे."

भारत प्रभू म्हणाले, "निरमा हिंदूंमध्ये एक विश्वासार्ह ब्रान्ड आणि घरोघरी पोचलेलं नाव आहे. भारतातल्या सुरुवातीच्या कंपन्यांपैकी ही एक आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, आता हीच कंपनी भारतीय जनतेप्रति कृतघ्नपणे वागून धार्मिक भावना दुखावत आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे - #BoycottNirma"

तर एका ट्विटर युजरनं म्हटलं होतं, जेव्हा एखाद्याला विनोद, विडंबन, व्यंग, बुफनेरी, कॉमेडी, यातले सूक्ष्म फरत माहिती नसतात तेव्हा अशा प्रकारच्या विचित्र जाहिराती येतात आणि त्याचा त्रास होतो.

आताचा वाद काय?

गेल्या काही दिवसांपासून विमलच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला होता.

विमल पान मसाल्याची जाहिरात जेव्हा सुरू होते तेव्हा अजय देवगण आणि शाहरूख खान एका कारमधून जात असल्याचे दिसते.

अजय कार चालवत असतो तर शाहरुख त्याच्या शेजारी बसलेला असतो.

तेव्हा शाहरुख बोलतो, "चल बघुया हा नवीन खेळाडू कोण आहे?" त्यानंतर व्हिडिओमध्ये अक्षय येतो, जो तलवारीने 'विमल इलायची' पान मसालाचं पाकीट कापतो. त्यानंतर अक्षय बोलतो, "बोलो जुबां केसरी."

या जाहिरातीवर अनेकांनी टीका केल्यानंतर अक्षयनं माफी मागत तिच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)