अक्षय कुमारची तंबाखूच्या जाहिरातीतून माघार, माफी मागत म्हटलं...

अभिनेता अक्षय कुमारने तंबाखूच्या जाहिरातीतून माघार घेतली आहे. ट्विटरवरून त्याने ही घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विमलच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला होता.

आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय, "मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या प्रतिक्रियांचा माझ्यावर परिणाम झाला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणारही नाही.

"विमल इलायची बरोबर केलेल्या जाहिरातीनंतर तुम्ही व्यक्त केलेल्या तुमच्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे नम्रतेने मी माझे पाऊल मागे घेतो. मी ठरवलं आहे की जाहिरातीसाठी घेतलेल्या सर्व मानधनाचा वापर मी सकारात्मक कार्यासाठी, समाजहितासाठी करेन."

"मात्र माझ्या माफीनाम्यानंतरही, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत विमल इलायची हा तंबाखू ब्रँड या जाहिरातीचा वापर सुरू ठेवेल. पण मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी माझ्या पुढील जाहिराती काळजीपूर्वक निवडेन. त्या बदल्यात मला तुम्हा सर्वांकडून तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मिळतील, अशी अपेक्षा आहे," असंही त्याने लिहिलंय.

शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता अक्षयकुमार विमल इलायचीच्या जाहिरातीत झळकल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सिगारेट सोडण्यास प्रोत्साहन देणारा खिलाडी अक्षय आता गुटख्याच्या ब्रँडची जाहिरात करतो हे त्याच्या चाहत्यांना आवडलेलं नाही.

जाहिरातीत नेमकं काय दाखवलंय ?

विमल पान मसाल्याची जाहिरात जेव्हा सुरू होते तेव्हा अजय देवगण आणि शाहरूख खान एका कारमधून जात असल्याचे दिसते.

अजय कार चालवत असतो तर शाहरुख त्याच्या शेजारी बसलेला असतो.

तेव्हा शाहरुख बोलतो, "चल बघुया हा नवीन खेळाडू कोण आहे?" त्यानंतर व्हिडिओमध्ये अक्षय येतो, जो तलवारीने 'विमल इलायची' पान मसालाचं पाकीट कापतो. त्यानंतर अक्षय बोलतो, "बोलो जुबां केसरी."

मीम्सचा पाऊस

चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनेकदा सिनेमा हॉलमध्ये अक्षय कुमारची सॅनिटरी पॅडसंबंधी जाहिरात दिसते. यामध्ये तो एका व्यक्तीला सिगरेट पासून होणाऱ्या नुकसानीविषयी सांगताना दिसतो.

त्याचप्रमाणे अक्षयचे आणखी बरेच व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये तो अल्कोहोल आणि सिगारेटसारख्या आरोग्यास हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याविषयी बोलताना दिसतो. यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

हिरोगिरी फु- फु करण्यात नाही (सिगरेट पिण्यात) तर थु थू करण्यात आहे असं एका युझरने म्हटलं आहे.

अक्षय कुमार कायमच राष्ट्रहिताची भूमिका घेऊन भावनिक मेसेज देण्याचा प्रयत्न विविध माध्यमांद्वारे करत असतो. त्यामुळे सोशल मीडिया युझर्सना त्याने पान मसाल्याची जाहिरात करणं अजिबात रुचलेलं नाही.

अक्षय कुमारचे हेच जुने व्हिडिओ शेअर करून लोकांनी त्याला ट्रोल केलय. अक्षय कुमारने पद्मश्री पुरस्कार परत करावा अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)