अक्षय कुमार म्हणतो, माझं नागरिकत्व हा अराजकीय मुद्दा

मतदानाविषयी जनजागृती करणारा अक्षय कुमार चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी कुठेही दिसला नाही. यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या.

अक्षयनं कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे, अशा चर्चा तेव्हापासूनच सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

एका कार्यक्रमात काही पत्रकारांनी अक्षय कुमारला मतदान न केल्याबद्दल तुमच्यावर टीका केली जात आहे, यावर प्रतिक्रिया द्या असं म्हटल्यावर त्यानं उत्तर देणं टाळलं आहे. यावरूनही सोशल मीडियावर अक्षय कुमारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

पण आता स्वत: अक्षय कुमारने याबाबत मौन सोडलं आहे. त्याने तो कॅनडाचे नागरिक असल्याची जाहीर कबुली ट्विटरवर दिली आहे. तसंच सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेबाबत खेद देखील व्यक्त केलं आहे.

"लोकांना माझ्या नागरिकत्वाबाबत नको तेवढी नकारात्मक उत्सुक्ता का आहे हे कळत नाही. मी कॅनडाचा पासपोर्टधारक आहे. ही गोष्टी मी कधीही नाकारली किंवा लपवली नाही. पण गेल्या सात वर्षांत मी एकदाही कॅनडात गेलो नाही, हेदेखील तितकंच खरं आहे. भारत ही माझी कर्मभूमी आहे. मी इथे काम करतो आणि सर्व करही भरतो."

"एवढ्या वर्षात मला माझं भारताप्रती असलेलं प्रेम कुणाला दाखवण्याची गरज पडली नाही. गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, मला त्याचा खेद आहे. हा मुद्दा खासगी, कायदेशीर आणि अराजकीय आहे. भारताला सक्षम बनवण्यासाठी माझं योगदान सुरूच राहील," असं अक्षय कुमारनं ट्वीट करून म्हटलं आहे.

सोशल मीडियावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?

शारदा रामनाथन म्हणतात, मला ही सुविधा आवडली. जस्टिन ट्रूडो, जर मी कॅनडाची नागरीक झाले आणि तिथे शून्य टॅक्स भरला तर चालेल का?

"देशभक्तीच्या नावाने मी इथे चित्रपटही बनवणार आणि इथला टॅक्सही भरणार, पण भारताचं नागरिकत्त्व स्विकारणार नाही. चांगला अभिनय करता तुम्ही," असं शशांक वशिष्ठ म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)