You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA आणि बॉलिवुड: आयुषमान खुराना, रितेश देशमुख, रेणुका शहाणे यांच्यासह अनेकांचे ट्वीट
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि त्यावरून दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराविरोधात देशभर आंदोलनं होताना दिसत आहेत. त्याचे पडसाद फिल्म इंडस्ट्रीमध्येही उमटले आहेत.
अभिनेता रितेश देशमुखनं सोशल मीडियावर एका निवेदनाद्वारे आपण शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे. "आपला देश महान आहे, कारण इथे प्रत्येकाचा आवाज ऐकला जातो, मग ती एक व्यक्ती असो किंवा हजारो लोक."
"मी कुठल्याच हिंसाचाराचं समर्थन करत नाही. आमच्या पोलीस दलाचा आम्हाला अभिमान होता आणि आहे. पण त्यांनी या परिस्थितीत थोडी सावधगिरी बाळगून, करुणा दाखवून काम करायला हवं होतं. आपल्या विद्यार्थ्यांबरोबर अशी वागणूक योग्य नाही."
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटवर दिलेली प्रतिक्रिया अनेक कलाकारांसह हजारो लोकांनी रिट्वीट केली आहे.
मोदींनी सर्वांना शांतता राखण्याचं आणि अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर रेणुका यांनी म्हटलं आहे, की "सर, तुम्ही कृपया तुमच्या IT सेलचे ट्विटर हँडल चालवणाऱ्यांनाही त्यापासून दूर राहायला सांगा. ते सर्वाधिक अफवा आणि गैरसमज पसरवत असतात, जे बंधुभाव, शांतता आणि एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमचा IT सेल खरी 'तुकडे-तुकडे गँग' आहे. त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा."
स्वतःला आलेल्या अनुभवांतून हे विधान केल्याचं रेणुका यांनी बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांच्याशी बोलताना सांगितलं. तसंच अशी आंदोलनं दडपण्याचा प्रकार नेहमीच होत असतो, याकडे लक्ष वेधलं आहे.
"2012 सालीही आपण अशाच गोष्टी पाहिल्या होत्या. फार पाठी जायला नको. शांततापूर्ण आंदोलनाविरुद्ध हिंसा वापरणं ही खूप पूर्वीपासून सत्ताधाऱ्यांची भूमिका राहिली आहे. पोलिसांवर टीका होतीये, पण ते अनेकदा फक्त आदेशाचं पालन करत असतात. तो आदेश कोण देतं? कुठल्याही पक्षाचं सरकार असो, ते अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देताना दिसलं आहे. आंदोलन करताना कुणालाही तो धोका स्वीकारावा लागतोच."
आंदोलनात कलाकारांचा सहभाग
या आंदोलनाबाबत कुठलाही मोठा स्टार का बोलत नाहीये, असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. यावरूनच मंगळवारी संध्याकाळी ट्विटरवर #ShameOnBollywood असा ट्रेंड होता.
पंतप्रधान मोदींनी सिनेकलाकारांसोबत घेतलेला एक जुना सेल्फी अभिनेत्री शायोनी गुप्ता हिने ट्वीट करत कलाकारांना बोलण्याचं आवाहन केलं आहे.
"जामिया आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या वतीने मी विनंती करते, की तुमच्यापैकी किमान एकाने तरी पोलिसांच्या अत्याचाराविरोधात, विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराविरोधात बोलायला हवं. बोलण्याची हीच वेळ आहे - हो? नाही? कदाचित?"
तिने या ट्वीटमध्ये रणवीर सिंग, करण जोहर, आयुषमान खुराना आणि राजकुमार राव यांना टॅग केलं आहे.
त्यानंतर काही तासांनी आयुषमान खुरानाने घडलेल्या घटनेनं आपण व्यथित झाल्याचं सांगत निषेध व्यक्त केला आहे. "निषेध व्यक्त करणं हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे. पण आंदोलनानं हिंसक वळण घेतलं तर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं. त्यानं काही साध्य होत नाही. माझ्या देशवासियांनो, ही गांधींची भूमी आहे. अहिंसा हा व्यक्त होण्याचा मार्ग आहे आणि असायला हवा. लोकशाहीवर विश्वास ठेवा."
तर हुमा कुरेशी, परिणिती चोप्रा, राजकुमार राव, अभय देओल यांनीही दिल्लीतील घटनाक्रमाचा निषेध केला आहे.
काही कलाकार फक्त सोशल मीडियावरून व्यक्त झालेले नाहीत तर आंदोलकांच्या समर्थनासाठी रस्त्यावरही उतरले आहेत.
मूळची आसामची असलेली अभिनेत्री आणि मॉडेल दिपानिता शर्मानं रविवारी (16 डिसेंबर) मुंबईतील निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. "आपण देशासोबत" असल्याचं तिनं ट्विटरवर म्हटलं आहे.
निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्टही यांनीही रविवारी (16 डिसेंबर) दादरमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत निदर्शनात सहभाग घेतला होता.
त्यांनी नीलेश जैन यांच्या एका विधानाचा उल्लेख आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. "असा एक तराजू बनायला हवा, ज्यात माणुसकी आणि सत्ता मोजता येईल."
अभिनेत्री पूजा भट्ट यांनीही दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध केला आहे. "जेव्हा आवाज उठवायला हवा तेव्हा शांत राहणारी माणसं भित्री बनतात. भारत जळतो आहे. यापुढे कोणी शांत राहू शकणार नाही."
आपली राजकीय मतं थेट मांडण्यासाठी ओळखली जाणारी स्वरा भास्कर या आंदोलनाविषयी ट्विटरवर सातत्यानं लिहिते आहे.
रविवारी दिल्लीतल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं तेव्हा स्वरानं म्हटलं होतं, "दिल्लीत जामियामध्ये अश्रूधुराचा वापर झाल्याची, हिंसाचाराची माहिती मिळतीये. हे धक्कादायक आहे. विद्यार्थ्यांना असं गुन्हेगारांसारखं का वागवलं जातंय? वसतीगृहांत अश्रूधुराचा वापर का होतो आहे? दिल्ली पोलीस, हे काय सुरू आहे? धक्कादायक आणि लज्जास्पद. "
मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत.
"एखादा अन्याय रोखण्याची क्षमता कधीकधी आपल्यात नसू शकते. पण विरोध करण्यात आपण कधीच कसूर करू नये," असं मनोज वाजपेयीनं म्हटलं आहे आणि लोकशाही मार्गानं निषेध व्यक्त करण्याच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचं समर्थन केलं आहे.
अक्षयकुमारनं मागितली माफी
ही आंदोलनं आणि निदर्शनं होत असतानाच अभिनेता अक्षयकुमार त्याच्या एका प्रतिक्रियेमुळं चर्चेत आहे. दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांना मारत असल्याचं दाखवणाऱ्या एका व्हीडिओला अक्षय कुमारनं 'लाईक' केलं होतं. त्यावरून लोकांनी अक्षय कुमारला ट्रोल केलं.
त्यानंतर अक्षयनं ट्विटरवर माफी मागत आपली बाजू मांडली. "जामिया मिलियातल्या विद्यार्थ्यांचा व्हीडिओ मी चुकून लाईक केला होता. मी स्क्रोल करत असताना चुकून बटण दाबलं गेलं. याची जाणीव होताच मी अनलाईक केलं आहे. मी अशा कुठल्याच वागणुकीचं समर्थन करत नाही."
'मराठी कलाकार गप्प का?'
आसामचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक जहनू बरुआ यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला होता आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीतून माघार घेतली होती.
दरम्यान, बॉलिवुडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी मात्र याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसंच मराठीतले कलाकार गप्प का, असाही प्रश्न राजकीय भाष्यकार राजू परुळेकर यांनी विचारला जातो आहे.
स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यांनी एका ट्वीटमध्ये सर्व गप्प सिनेकलाकारांवर खोचक टीका केली आहे. "आज करमणूक क्षेत्रातले बहुतांश लोक तुमच्या पाठीशी नसतील, त्याबद्दल खरंच वाईट वाटतं. पण एक दिवस ते तुमच्यावर सिनेमा बनवून भरघोस पैसा कमावतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)