You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA: Jamia विद्यापीठ हिंसाचारात दिल्ली पोलीस म्हणतात गोळीबार केला नाही, मात्र तिघांना लागल्या 'गोळ्या'
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत.
सध्या दिल्लीच्या जाफ्राबाद भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पेटला आहे. आंदोलकांनी दगडफेक केली असून काही बसेसची तोडफोड केल्याचं ANI वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. त्याला उत्तर देत पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचंही ANIने सांगितलं आहे.
त्यामुळे दिल्लीत सध्या तणाव कायम आहे.
दरम्यान, रविवारी जामिया मिलिया विद्यापीठामध्ये झालेल्या हिंसक झटापटींमध्ये आपल्याला गोळी लागल्याचा दावा तीन जणांनी केलाय. पण आपण आंदोलकांवर गोळीबार केलाच नाही, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. मात्र अश्रुधुराची नळकांडी (कॅनिस्टर) लागल्याने हे लोक जखमी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
यापैकी एकाचे मेडिकल रिपोर्ट बीबीसीने पाहिले. या व्यक्तीच्या मांडीतून 'foreign body' (शरीराबाहेरील वस्तू) काढण्यात आल्याचं डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या जवळ असलेल्या सराय जुलेना आणि मथुरा रोड भागामध्ये रविवारी संध्याकाळी आंदोलन करण्यात आलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील या आंदोलनादरम्यान अनेक बसेस पेटवून देण्यात आल्या.
ही आग विझवण्यासाठी आलेलं अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. दिल्लीच्या सराय जुलेना आणि मथुरा रोडवर आंदोलक आणि पोलिसांदरम्यान झटापट झाली. जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांसोबतच स्थानिक लोकही सराय जुलेनाजवळ निदर्शनं करत होते.
रविवारी झालेल्या हिंसाचारामध्ये किमान तीन लोकांना पोलिसांच्या गोळ्या लागल्याचं वृत्त आहे.
जामियाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिसांचारात 'गोळ्या' लागलेल्या दोघांवर दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं PTI वृत्तसंस्थेने सूत्रांचा दाखला देत म्हटलंय. पण पोलिसांनी ही गोष्ट फेटाळून लावली आहे.
मोहम्मद तमीन या तिसऱ्या जखमी व्यक्तीचे मेडिकल रिपोर्ट्स बीबीसीने पाहिले. आपण आंदोलन करत नव्हतो, फक्त त्यावेळी तिथून जात होतो, असं तमीन यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी आपल्या डाव्या पायावर गोळी झाडल्याचा त्यांचा दावा आहे. ऑपरेशननंतर त्यांच्या शरीरातून 'foreign body' काढण्यात आल्याचं रिपोर्ट्समधून स्पष्ट होतं.
तमीन यांनी काय सांगितलं?
"रविवारी साधारण चार वाजताच्या सुमारास मी घरातून निघालो. जामिया रोड ब्लॉक होता म्हणून मी न्यू फ्रेंड्स कॉलनीच्या दुसऱ्या रस्त्याने सिग्नलपाशी पोहोचलो. आंदोलकही डायव्हर्ट होऊन तिथपर्यंत आलेले होते. त्यांनी तिथे जमत निदर्शनं करायला सुरुवात केली.
"मी सिग्नलपाशी माझ्या बाईकवर होतो. अचानक दिल्ली पोलिस आले, लाठीचार्ज झाला. सगळे विद्यार्थी पळू लागले. गोंधळ उडाला. पुढचा रस्ता बंद असल्याने मी युटर्न घेतला, तेवढ्यात मला एका मुलाचा धक्का लागला आणि मी खाली पडलो. माझी बाईकही पडली. मी उठून उभा राहिलो तर समोरून दिल्ली पोलिसांचे तीन शिपाई आले. त्यांनी मोटरसायकलचं हेल्मेट घातलं होतं. मी समोर पाहिलं तर त्यांनी बंदूक काढून माझ्यावर गोळी झाडली!"
"माझ्या डाव्या मांडीवर गोळी लागली आणि मी कोसळलो. गोळी झाडल्याचा आवाज आल्याने काही विद्यार्थी परत आले. याला गोळी लागली आहे, हॉस्पिटलला न्यायला हवं म्हणू लागले. त्यांना पाहून पोलीस तिथून पळून गेले. तिथून दोन विद्यार्थ्यांनी मला हॉस्पिटलला नेलं आणि एकाने माझा व्हिडिओ बनवून व्हायरल केला, कारण कुणीच मला मदत करत नव्हतं.
"नंतर हॉस्पिटलने माझ्याकडे लक्ष दिलं. मी पाच वाजल्यापासून हॉस्पिटलमध्ये होतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता माझं ऑपरेशन झालं. मला कोणत्या प्रकारची गोळी लागली होती, हे मी डॉक्टरांना विचारलं, पण आता आपण याविषयी सांगू शकत नाही, बुलेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, दोन दिवसांनी याविषयी समजू शकेल, असं डॉक्टर्सनी सांगितलं.
"पण समोरून माझ्यावर गोळी झाडण्यात आल्याचं मला माहीत असताना, मला इतर कोणत्यातरी गोष्टीने जखम झाल्याचं मी कसं मान्य करू? सुमारे 100 मीटरच्या अंतरावरून रिव्हॉल्व्हरने गोळी झाडण्यात आली."
"'मी आंदोलक नाही, सर. मी कामासाठी निजामुद्दिनला जातोय', असं मी त्यांना सांगितलंही. पण माझं काहीही न ऐकता त्यांनी गोळी झाडली."
"जर ती गोळी थोडी वर लागली असती, तर माझ्या कुटुंबाकडे कुणी पाहिलं असतं? माझं कुटुंब माझ्या कमाईवर चालतं. मी घरातला मोठा मुलगा आहे. मला वडील नाहीत."
दिल्ली पोलीस काय म्हणतात?
दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी सांगितलं, "आमच्याकडून फायरिंग करण्यात आलं नाही. कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 39 लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे."
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओची तपासणी करण्यात येत असून लवकरच याविषयीची माहिती समजेल, असंही त्यांनी म्हटलंय. दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे.
ते म्हणाले, "सोशल मीडियावर गोळीबाराचे काही व्हिडिओ फिरत आहेत. अजिबात गोळीबार झालेला नाही. त्यावेळी तिथे असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांकडे हत्यारच नव्हती. आम्ही किमान बळाचा वापर केला आहे."
पंतप्रधान काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केलंय, "वाद, चर्चा आणि असंतोष हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणं आणि सामान्य जनजीवन विस्कळीत करणं लोकशाहीत बसत नाही."
हा शांतता बाळगण्याचा आणि एकता दाखवण्याचा काळ असल्याचं त्यांनी लिहिलंय. "अशावेळी कोणत्याही प्रकारच्या अफवा आणि असत्याला बळी पडू नये, असं मी आवाहन करतो. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, 2019 हा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. राजकीय पक्षांनी आणि खासदारांनी मोठ्या संख्येने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. हा कायदा भारताच्या बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या जुन्या संस्कृतीचा संदेश देतो."
सोनिया गांधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
सोनिया गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेण्याची विनंती राष्ट्रपतींना केल्याची माहिती या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
"ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि अजून चिघळू शकते. मोदी सरकारकडून विरोधाचा सूर दाबण्याचा प्रयत्न नेहमीच केला जात असून लोकशाहीमध्ये ही गोष्ट स्वीकार्य नाही," असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)