You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Jamia CAA Protests: दिल्ली पोलीसने विनापरवानगी जामिया विद्यापीठ आवारात घुसणं कितपत योग्य?
- Author, अभिजीत कांबळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर या कारवाईची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. पोलिसांच्या याच कारवाईनंतर देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलनं सुरू झाली.
पण नेमकं झालं काय?
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी पोलिसाच्या विनापरवानगी घुसण्यावर जोरदार आक्षेप घेतलाय. पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात दिल्ली पोलिसांविरोधात FIR दाखल करणार असल्याचं म्हटलंय.
नजमा अख्तर म्हणाल्या, "जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील व्यक्तींकडून कोणत्याही आंदोलनाची हाक दिली नव्हती. विद्यापीठाच्या आजूबाजूला ज्या कॉलनी आहेत, तेथून आंदोलनाची हाक दिली गेली होती. त्या लोकांनी मोर्चा काढला होता, त्यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलीस पाठलाग करत असताना काही आंदोलक विद्यापीठाच्या आवारात आले. त्यांच्या मागे मग पोलीस लायब्ररीपर्यंत पोहोचले.
"पोलिसांनी तिथे बसलेल्या विद्यार्थ्यांनाही बेदम मारहाण केली. जर पोलिसांनी विद्यापीठाला कळवलं असतं तर प्रॉक्टर पोलिसांसोबत आले असते. कोण बाहेरचे आहेत आणि कोण विद्यार्थी आहेत, हे प्रॉक्टर पोलिसांना सांगू शकले असते."
"दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात विनापरवानगी घुसणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आम्ही याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. सगळ्या विद्यापीठांमध्ये असा नियम बनणार आहे का की पोलीस असेच कुठेही विनापरवानगी घुसतील? बाहेर हजारो लोक रस्त्यावर होते आणि तुम्ही हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांसाठी आवारात घुसला?"
दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?
दिल्ली पोलिसांना कुलगुरूंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विचारलं असता त्यांनी परवानगीबाबत कोणतंही भाष्य न करता आम्ही जमावाच्या मागे विद्यापीठाच्या आवारात गेल्याचा खुलासा केला आहे.
एका पत्रकार परिषदेत उत्तर देताना दिल्ली पोलिसांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एम. एस. रंधावा यांनी म्हटलं, "आम्ही हिंसक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ते विद्यापीठाच्या आत गेले. आम्ही त्यांच्या मागे गेलो, तेव्हा त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. आम्ही याची सखोल चौकशी करत आहोत."
'जामिया'च्या कुलगुरू आणि दिल्ली पोलिसांनी मांडलेल्या बाजूच्या पार्श्वभूमीवर आम्ही शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त पोलीस अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांची मतं जाणून घेतली.
परवानगी घेऊनच पोलिसांनी विद्यापीठात प्रवेश करणं अपेक्षित
गेल्या काही वर्षांतील अपवाद वगळता देशभरात क्वचितच पोलीस विद्यापीठाच्या आवारात गेले आहेत. अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा कधी पोलीस विद्यापीठाच्या आवारात आले आहेत, तेव्हा कुलगुरूंना किंवा विद्यापीठ प्रशासनाला विचारूनच आवारात आले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सांगितलं, की दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आता-आता कुठे पोलिसांनी प्रवेश केला.
"JNUमध्ये चाळीस वर्षं पोलीस आतमध्ये आले नव्हते. पोलीस आले तर गेटवर उभे राहायचे. आता गेल्या काही वर्षांत पोलिसांनी JNUमध्ये प्रवेश केला. विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश करताना विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेण्याची पद्धत आहे.
"अर्थात, विद्यापीठात एखादा मोठा गुन्हेगारी स्वरूपाचा हल्ला झाला किंवा मोठी आग लागली तर पोलीस थेट येऊ शकतात. पण सर्वसाधारणपणे पोलिसांनी परवानगी घेऊनच विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करणं अपेक्षित आहे," असं थोरात यांनी सांगितलं.
पोलिसांच्या दृष्टीनं नेमकी काय पद्धत आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस दलात महासंचालक पदावर काम केलेल्या निवृत्त IPS अधिकारी मीरन बोरवणवकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, की विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करताना पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेण्याची किंवा त्यांना माहिती देण्याची पद्धत आहे.
"कोणत्याही विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्यासाठी पोलिसांना कुलगुरू किंवा रजिस्ट्रारची परवानगी घेणं गरजेचं आहे. पण जर एखाद्या गंभीर गुन्ह्यात पोलीस कुणाचा पाठलाग करत असतील तर अशा वेळी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेण्याची गरज पडत नाही. पण इतर वेळी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेऊनच पोलीस आत प्रवेश करतात.
"जर एखाद्या वेळी विद्यार्थी निदर्शनं करत असतील तर अशा वेळी विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीनेच पोलीस आवारात प्रवेश करतात. विद्यार्थ्यांसोबत कोणत्याही संघर्षाची वेळ येऊ नये म्हणूनच पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते," असं बोरवणकर यांनी सांगितलं.
"कुणाचा पाठलाग करताना तुम्ही विनापरवानगी विद्यापीठाच्या आवारात गेलात तर त्यासाठी सबळ कारणही असायला हवं. परवानगी न घेता आवारात येणं त्या विशिष्ट प्रसंगात गरजेचं का होतं, याचं व्यवस्थित स्पष्टीकरण पोलिसांना देता यायला हवं," असं बोरवणकर यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह
ह्युमन राईट्स लॉ नेटवर्कचे संस्थापक आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ कायदेतज्ज्ञ कॉलीन गोन्साल्विस यांनी पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी म्हटलं, की जामिया मिलिया आणि अलिगढ विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कुलगुरूंची परवानगी न घेता विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला.
"जर पोलीस एखाद्या जागेवर छापा घालत असतील तर त्या जागेच्या मालकाची परवानगी घेणं किंवा त्याला कळवणं गरजेचंच असतं. जर विद्यापीठाच्या आवाराचे प्रमुख कुलगुरू असतील तर त्यांच्या आवारात कारवाई करताना त्यांना कळवायलाच हवं," असं कॉलीन गोन्साल्विस यांचं म्हणणं आहे.
पोलीस विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्याचे जे अपवादात्मक प्रसंग घडले आहेत, त्यातील एक प्रसंग पंजाब विद्यापीठातील आहे. एप्रिल 2017 साली चंदीगढस्थित पंजाब विद्यापीठात पोलीस आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. या विद्यापीठाच्या आवारात पोलीस येण्याची ही पहिलीच वेळ होती. फी-वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी कुलगुरूंनीच पोलिसांना पाचारण केलं होतं.
चंदिगढमधील वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अर्जुन शेवराँ यांनी हे प्रकरण जवळून पाहिलं होतं. ते सांगतात, "जेव्हा-जेव्हा पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला आहे, तेव्हा काही ना काही अनुचित प्रकार घडलेलाच आपण पाहिला आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटतात. म्हणूनच केंद्रीय विद्यापीठांमध्ये स्वत:ची सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे कुलगुरू किंवा विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेऊनच पोलिसांनी प्रवेश करणं अपेक्षित आहे. शैक्षणिक स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी पोलिसांना विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांपासून दूर ठेवणं गरजेचं असतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)