CAA : मंगळुरूमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

CAA म्हणजेच नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन पेटलं आहे. सुरुवातीला आसाम आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचं लोण देशभर पसरलं आहे.

9 वाजून 40 मिनिटं : मंगळुरूमध्ये दोन जणांचा मृत्यू

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या मेंगळुरूमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातून पोलिसांनी 1200 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

दुसरीकडे गाझियाबादमध्ये गुरूवारी रात्री 10 वाजल्यापासून 24 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, लखनौमध्येही नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या एका आंदोलकाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

8 वाजता : 'भारतात मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचा प्रयत्न'

नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर पाकिस्तानने टीका केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी या कायद्यावर टीका करताना म्हटलं, की भारतात 20 कोटी मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा कायदा मानण्यास नकार दिला असल्याचंही कुरैशी यांनी म्हटलं.

कुरैशींनी म्हटलं, "या नव्या कायद्याच्या विरोधात भारतात अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. भारतातील विरोधी पक्षही या कायद्याच्या विरोधात आहेत. भारत या आंदोलनांवरून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही पाकिस्तानी नागरिकांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो, की आम्हाला शांतता हवी आहे. मात्र हा आमचा कमकुवतपणा नाहीये. आमचं सैन्यही प्रतिकार करायला सज्ज आहे."

6 वाजून 56 मिनिटं : अभाविपचा CAA च्या समर्थनासाठी मोर्चा

पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने मशाल मोर्चा काढला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा मोर्चा काढण्यात आला.

ABVP कडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ,राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार तसंच काँग्रेसच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

6 वाजून 35 मिनिटं : ऑगस्ट क्रांती मैदानावर बॉलिवुडमधले चेहरे

ऑगस्ट क्रांती मैदानावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बॉलिवूडमधले अनेक चेहरेही उपस्थित होते.

फरहान अख्तर, सुशांत सिंह, नंदिता दास, अनुराग कश्यप, हुमा कुरेशी, स्वरा भास्कर, राज बब्बर, राकेश ओमप्रकाश मेहरा हे ऑगस्ट क्रांती मैदानावर उपस्थित होते.

5 वाजून 59 मिनिटं : आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार नको

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान लखनौमध्ये जाळपोळ झाली आहे. आंदोलनाला लागेल्या या हिंसक वळणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, की निषेधाच्या नावाखाली कोणताही हिंसाचार खपवून घेतली जाणार नाही.

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

5 वाजून 54 मिनिटंः अफवा पसरवली तर कारवाई...

CAA म्हणजेच नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल.

5 वाजून 22 मिनिटं : मनमोहन सिंह यांच्या जुन्या व्हीडिओचा भाजपला आधार

मनमोहन सिंह यांचा एक जुना व्हीडिओ पोस्ट करून भाजपनं काँग्रेसच्या CAA संबंधीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मनमोहन सिंह यांचा एक जुना व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट करुन लिहिलं आहे, "काँग्रेसचा ढोंगीपणा पहा...18 डिसेंबर 2003...मनमोहन सिंह बांग्लादेश आणि पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचारावर भाष्य केलं. मनमोहन सिंह यांच्या वक्तव्याची तुलना काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेशी करा. क्लासिक उदाहरण आहे- आज काय आहे आणि काल काय होतं.

4 वाजून 50 मिनिटं : मुंबईमधल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर CAA च्या विरोधात अनेक संघटनांचे लोक एकत्र जमले आहेत.

4 वाजून 44 मिनिटंः लखनौमध्ये हिंसक वळण

नवीन नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात लखनौमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. लखनौमधील हजरतगंज इथं हिंसाचार झाला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं लखनौच्या एसएसपींनी सांगितलं. काही ठिकाणी जमाव हिंसक झाला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 40-50 लोकांना अटक करण्यात आल्याचंही एसएसपींनी सांगितलं.

4 वाजून 19 मिनिटं : इतिहासकार रामचंद्र गुहा यांची सुटका. बंगळुरूमध्ये निदर्शनासाठी बाहेर निघालेल्या रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं होतं.

3 वाजून 50 मिनिटं : चेतन भगतची मोदी सरकारवर टीका

लेखक चेतन भगत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC यांचा एकत्र विचार केल्यास यामुळे भेदभाव होण्याची शक्यता आहे. त्यांनी यासंदर्भात एक संभाषणाचा नमुना ट्वीट केला आहे.

NRC : तुम्ही भारतीय आहात, हे सगळ्यांना सिद्ध करावं लागणार आहे.

बिगरमुस्लीम : सर, माझ्याकडे कागदपत्रं नाहीत.

सरकार :ठीक आहे. काही प्रश्न नाही. CAA तुमच्या मदतीला येईल. तुम्ही भारतीय आहात.

मुस्लीम : सर, माझ्याकडे कोणतच कागदपत्रं नाहीत.

सरकार : हे खूपच गंभीर आहे, याचा अर्थ तुम्ही भारतीय नाही. बाहेर जा.

3 वाजून 32 मिनिटं : कन्हैय्या कुमारची टीका

विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी ट्वीट करत या कायद्याला विरोध केला आहे.

त्यांनी म्हटलं, "या कायद्याअंतर्गत नागरिकता सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं दाखवावी लागणार आहेत. हे फक्त मुस्लिमांपुरतं मर्यादित नाही, तर देशातल्या बहुसंख्य गरिबांकडे कागदपत्र नसतात. दलित, महादलित यांच्याकडे जमिनीची कागदं नसतात. स्थलांतरित कामगारांकडे कागदपत्रं नसतात."

CAA चा विरोध करण्यासाठी लाल किल्ल्यासमोर लोक जमत आहेत. पोलिसांनी स्वराज्य पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांना ताब्यात घेतलं आहे.

तर, बंगळुरूमध्ये निदर्शनासाठी बाहेर निघालेल्या रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी आता त्यांची सुटका केली आहे.

गुहा यांच्याविरोधातील कारवाईचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी निषेध केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून सांगितलं की सरकार, विद्यार्थ्यांना घाबरलं आहे. हे सरकार एक इतिहासकार मीडियाशी बोलतो, गांधींचा बॅनर हातात धरतो, याला घबरलं आहे. राम गुहा यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा मी निषेध करते.

इतिहासकार रामचंद्र गुहा आणि योगेंद्र यादव यांना CAAचा विरोध करत असताना ताब्यात घेण्यात आल्याच्या कारवाईचा ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनीही विरोध केला आहे.

ते आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, "सत्याग्रहाचा लढा देणाऱ्यांना ताब्यात घेण्याचं जे मूर्खपणाचं पाऊल सरकारने उचललं आहे, त्यावर मी टाळ्या वाजवतो."

कर्नाटकमध्ये संचारबंदी

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असूनही डाव्या पक्षांनी तिथे निषेध आंदोलन केलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

हैदराबाद, चेन्नई आणि चंदीगढमध्येही निषेध मोर्चे निघाल्याचं वृत्त आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांनी आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलेलं आहे.

या कायद्याच्या विरोधात देशभरामध्ये निदर्शनं केली जाणार असल्याचं सीपीएम, सीपीआय, सीपीआय(एमएल), फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपीने ने संयुक्त पत्रकाद्वारे सांगितलंय.

अनेक विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा घोषित केलेला आहे.

कोलकाता येथे सामान्य लोक तसेच चित्रपट सृष्टीतील लोकांनी CAA विरोधात निदर्शनं केली. या निदर्शनात चित्रपट दिग्दर्शक अपर्णा सेनही सहभागी झाल्या.

आसाम येथे काँग्रेसने CAA विरोधात निदर्शनं केली. गुवाहाटी येथे हरिश रावत आणि रिपुन बोरा हे निदर्शनाचं नेतृत्व करत आहेत.

जामियातील विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

जामियामध्ये 15 डिसेंबरला पोलिसांच्या कारवाईदरम्यान मिनहाजुद्दीन यांच्या डोळ्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे आपल्याला डाव्या डोळ्याने काहीच दिसत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 26 वर्षीय मिनहाजुद्दीन कायद्याचं शिक्षण घेत आहेत. पण पोलिसांनी मारहाणीचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

क्रिकेटपू हरभजन सिंगने मिनहाजुद्दीनबद्दल ट्वीट केलं आहे.

'अर्थव्यवस्थेचं अपयश झाकण्याचा प्रयत्न'

देश विरोधी असलेला हा कायदा रद्द झाला पाहिजे, असं माजी विद्यार्थी नेता आणि भाकप नेता कन्हैय्या कुमार याने म्हटलं आहे. "हे लोक गरिबांना पुन्हा एकदा रांगेत उभं करून त्यांना त्रास देऊ इच्छितात. हे सर्व मुद्दे देशाच्या डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला लपवण्याचा प्रयत्न आहे."

दिल्लीतील इंटरनेट सेवा काही काळासाठी खंडित

दिल्लीतील अनेक भागातील दूरसंचार सेवेवरही परिणाम झाला आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर दिल्लीतील काही भागात इंटरनेट सेवा खंडित केल्याचं एअरटेल आणि व्होडाफोनने म्हटलं होतं. मात्र काही वेळाने एअरटेलच्या ग्राहक सेवा विभागाने हे सर्व ट्वीट डिलीट केले.

दिल्लीतील 19 मेट्रो स्टेशन बंद

दिल्लीतील जवळपास 17 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. मेट्रो स्टेशन्सचे एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बाराखंबा, वसंत विहार, मंडी हाउस, केंद्रीय सचिवालय, पटेल चौक, कोल कल्याण मार्ग, उद्योग भवन, आईटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. या स्टेशनांवर मेट्रो गाड्या थांबणार नाहीत.

दिल्लीतील अनेक भागांमध्ये विरोधी प्रदर्शन करण्यात येत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

'लोकांना चिरडण्याचा प्रयत्न कराल तर त्यांचा आवाज दृढ होईल'

त्या म्हणतात, "धाकदपटशाहीने लोकांची मुस्कटदाबी करता येत नाही. प्रत्येकवेळी वर्चस्व गाजवण्यासाठी आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी बळाचा वापर केला जातो. ज्या ज्या वेळी तुम्ही मारहाण कराल, दडपशाही कराल, ज्या ज्या वेळी तुम्ही लोकांना चिरडण्याचा प्रयत्न कराल, ते अधिक भक्कमपणे उभे होतील, त्यांचा संकल्प अधिक दृढ होईल आणि त्यांचा आवाज अधिक दृढ होईल."

"आमची स्वतंत्रता चळवळ याचा पुरावा आहे. आमची राज्यघटना याची हमी देते आणि आमचे लोक याचा आत्मा आहे."

अभिनेत्री शबाना आजमी यांनी कैफी आजमी यांचा एक शेर म्हटला आहे. "आज की रात बहुत गर्म हवा चलती है

आज की रात न फुटपाथ पर नींद आएगी

सब उठो, मैं भी उठूं, तुम भी उठो, तुम भी उठो

कोई खिड़की इसी दीवार में खुल जाएगी"

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन बघता भगवान दास रोड दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. लोकांना पर्यायी मार्ग घ्यावा, असं आवाहन दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

जनपथ मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत एकूण 19 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)