CAA: सना गांगुलीची 'ती' पोस्ट इम्रान खान यांनीही केली ट्वीट

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुलीनं आपली 'ती' वादग्रस्त पोस्ट ट्वीट डिलीट केली. सना गांगुलीने खुशवंत सिंह याच्या 'द एंड ऑफ इंडिया' या पुस्तकाला एक उतारा सोशल मीडियावर शेअर केला होता.

तिच्या या पोस्टनंतर वाद उद्भवला होता या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सौरव गांगुली यांनी केला होता. पण आता सना गांगुलीची ती पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीटरवर 'द एंड ऑफ इंडिया' या पुस्तकातला तोच उतारा पोस्ट केला आहे, जो सनानंही केला होता.

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सनाने शेअर केलेल्या पुस्तकातल्या पानाचा उतारा असा होता, "प्रत्येक फासिस्ट सरकारची भरभराट होण्यासाठी त्यांना अशा समुदाय आणि गटांची गरज असते ज्यांच्यावर ते अत्याचार करू शकतात. याची सुरुवात एक वा दोन समूहांपासून होते, पण हे कधीही संपुष्टात येत नाही."

"द्वेषाच्या आधारावर उभं राहिलेलं आंदोलन हे भय आणि संघर्षाचं वातारवण असे पर्यंतच टिकून राहतं. आपण मुसलमान वा ख्रिश्चन नसल्याने सुरक्षित असल्याचं आज आपल्यापैकी ज्यांना वाटतंय, ते मूर्खांच्या जगात जगत आहेत."

"संघाने आधीपासूनच डाव्या विचारसरणीच्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या तरुणांना लक्ष्य केलेलं आहे. उद्या हे त्या महिलांकडे आपला मोर्चा वळवतील ज्या स्कर्ट घालतात, त्यांना लक्ष्य करतील जे मांस खातात, जे दारू पितात, जे परदेशी चित्रपट पाहतात, जे देवळात जात नाहीत, जे दंत मंजन वापरण्याऐवजी टूथपेस्ट वापरतात, जे वैद्याकडे जाण्याऐवजी अॅलोपथिक डॉक्टरकडून उपचार करून घेतात, जे जय श्री राम म्हणण्याऐवजी हस्तांदोलन करतात. कोणीही सुरक्षित नाही."

"भारताला जिवंत ठेवायचं असेल तर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या."

सौरव गांगुलीने सनाच्या या पोस्टनंतर ट्वीट करून म्हटलं होतं, की सनाला या संपूर्ण प्रकरणापासून दूर ठेवा...ही पोस्ट योग्य नाही...राजकारण समजण्यासाठी अजून ती खूप लहान आहे.

सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया

या प्रकरणी बहुतेकांनी मौन बाळगणं पसंत केलेलं असताना 18 वर्षांच्या सनाच्या या इन्स्टाग्राम पोस्टचं कौतुक होतंय.

देशातल्या सध्याच्या परिस्थितीशी याचा संदर्भ लावला जातोय.

सनाचे वडील सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतलेली आहे. हे पद गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहाला देण्यात येण्याची चर्चा त्यापूर्वी होती. पण शेवटी सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा झाली.

सना गांगुलीने ही इन्स्टाग्राम स्टोरी आता डिलिट केली आहे. तरी याचे स्क्रीनशॉट्स लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सनाने आपलं मन जिंकून घेतल्याचं अपर्णा नावाच्या एका ट्विटर युजरने म्हटलंय.

तर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने जामिया मिल्लिया इस्लामियामध्ये झालेल्या पोलीस कारवाईविषयी चिंता व्यक्त केलीय.

पण जामियाचा माजी विद्यार्थी असणाऱ्या माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाने या प्रकरणी अजूनतरी मौन बाळगलं आहे. खरंतर सेहवाग ट्विटरवर आपली मतं मांडण्यासाठी ओळखला जातो.

तर सना गांगुलीला उत्तर देताना पद्मा कुमार म्हणतात, "तू बरोबर आहेस...आपल्या देशाचं भाग्य एका चुकीच्या दिशेने जातंय..."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)