You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशिष शेलार: आदित्य ठाकरे या 'बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाने सोनियांच्या नावाने शपथ घेणं, यापेक्षा मोठा अपमान काय?'-#5मोठ्याबातम्या
प्रमुख वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. बाळासाहेबांच्या नातवाने सोनियांची नावाची शपथ घेणं यापेक्षा मोठा अपमान काय?
"बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेणं यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो?" असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.
महाविकास आघाडीने सोमवारी संध्याकाळी 162 आमदारांची ओळख परेड मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये घेतली आणि त्यांना आपापल्या पक्षाशी आणि या आघाडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली, त्यावर शेलार यांनी टीका केली.
"काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये आमच्याकडे बहुमत आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रकार झाला. आमदारांना एक शपथ देण्यात आली. या शपथेमध्ये सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख होता. बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नाव असलेली शपथ घेणं यापेक्षा दुर्देव काय?" असा प्रश्न त्यांनी केला. ही शिवसेनेसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी मान खाली घालायला लावणारी बाब आहे, असंही ते म्हणाले. 'आजतक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या जवळजवळ सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
2. '...त्यापेक्षा विस्फोटकं टाकून लोकांना मारून टाका' - न्यायालय
"न्यायालयाच्या आदेशानंतरही कृषी कचरा जाळण्याचा प्रकार सुरू असणं हे दुर्दैवी असून हे अंतर्गत युद्धापेक्षाही भयंकर नाही का?" असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारलं आहे.
त्यापेक्षा विस्फोटकं टाकून मारून टाका या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटलं आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
प्रदूषण आणि पाण्याच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप करणे हे अत्यंत धक्कादायक आहे, अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली. दिल्लीकरांचा श्वास अशुद्ध हवेमुळे कोंडला आहे आणि राजकारणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली.
न्या. अरुण मिश्रा आणि न्या.दीपक गुप्ता यांनी प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश सरकारने नागरिकांना नुकसानभरपाई द्यायला का सांगू नये, असंही न्यायालय म्हणाले.
3. राज्यपालांना हटवण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी
महाराष्ट्रातील एकूण घडामोडी पाहता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. जनतेचा घटनेवरचा, लोकशाहीवरचा विश्वास कायम राखायचा असेल तर राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावी आणि याची स्वत:हून राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी, अशी विनंती समितीने केली आहे.
'पुढारी'ने ही बातमी दिली आहे.
कोश्यारी हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत. एका राज्याचं मुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवलं आहे. अशी माहिती राजभवनाच्या वेबसाईटवरच देण्यात आली आहे.
त्यामुळे कोश्यारी यांची भूमिका पक्षपातीपणाची आहे, हे एकूणच घडामोडींवरून दिसतं आहे, असं मराठी एकीकरण समितीने म्हटलं आहे.
पहाटे राष्ट्रपती राजवट हटवणं, सकाळीच शपथविधी सोहळा आयोजित करणं हे प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारे आहेत. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांनी कोणाचेही हितसंबंध जपणे योग्य नाही. मणिपूर, मेघालय, गोवा आणि कर्नाटक राज्यात देखील राज्यपालांच्या भूमिकेमुळे काय घडले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ हटवण्यात यावे, असं समितीने म्हटलं आहे.
4. राज्यात कांद्याची विक्रमी दरझेप
राज्याच्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवारी घाऊक बाजारातील कांद्याच्या दराने शंभरी गाठली. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याची विक्री उच्चांकी 120 ते 129 रुपये दराने केली जात आहे. कांदा दरवाढीमुळे गृहिणींचे अंदाजपत्रक पुरते कोलमडले असून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
2013 मध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदा कांद्याने ऐतिहासिक उच्चांक गाठल्याचे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न समितीतील घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितलं.
कांदा उत्पादक भागाला पावसाने झोडपून काढल्याने कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं. अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे पीक हाती येण्यापूर्वीच शेतात खराब झाले.
5. नेहरू कप: हॉकीच्या मैदानात तुंबळ हाणामारी
नॅशनल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नेहरू कप हॉकी स्पर्धेत पंजाब पोलीस आणि पंजाब नॅशनल बँक सामनादरम्यान दोन्ही संघात तुंबळ हाणामारी झाली. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांवर हॉकीने हल्ला केला. मैदानात अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे काहीवेळ प्रेक्षकही गोंधळून गेले. मात्र मैदानात हाणामारी सुरू झाल्याचं कळताच प्रेक्षकांचीही गडबड उडाली.
हाणामारीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. आयोजकांनी मैदानात धाव घेऊन दोन्ही संघातील खेळाडूंना शांत केलं. दोन्ही संघांच्या 8-8 खेळाडूंनिशी सामना सुरू झाला. यावेळी पीएनबीने 6-3च्या फरकाने जिंकला.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी याप्रकारची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही संघ आणि त्यांच्या व्यवस्थापकांविरोधात करण्याची मागणी केली आहे. घडलेल्या प्रकाराचा अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं हॉकी इंडियाच्या सीईओ अलिना नॉर्मन यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)