You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाची सूत्रे सोनिया दुहान यांच्याकडे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाची सूत्रे युवा नेत्या सोनिया दुहान यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
'शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीला मी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करेन', असं सोनिया दुहान यांनी ट्वीट करुन सांगितलं. साहेब! अशा शब्दात त्यांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यानंतर शरद पवारांनी काहींची हकालपट्टी केली तर काहींची नियुक्ती केली. त्याअंतर्गत पवारांनी सोनिया दुहान यांच्याकडे राजधानी दिल्लीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.
सोनिया दुहान कोण आहेत?
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहापोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घेण्याच्या घोषणेसाठी पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उपस्थित होते. पवारांच्या मागे महिला नेत्या उपस्थित होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणात नसलेल्या पण इतक्या महत्त्वाच्या व्यासपीठावर बसलेल्या या नेत्या कोण असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला गेला.
त्यांचं नाव- सोनिया दुहान. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने शपथ घेतली होती त्यावेळी राज्यात आणि राज्याबाहेर बरंच नाट्य घडलं होतं. त्यावेळी सोनिया दुहान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्याबाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं.
अजित पवार यांच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार उपस्थित होते असं सांगण्यात आलं. त्यातले काही आमदार राष्ट्रवादीमध्ये परत येऊ लागले. त्याच दिवशी दुपारी चार वाजता शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार उपस्थित झाले.
अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे होते अशी चर्चा तेव्हा दिवसभर होती. त्यांना मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना जवळपास ताब्यात घेऊनच पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात आणलं होतं.
आता नरहरी झिरवळ, अनिल पाटील, नितीन पवार, दौलत दरोडा यांनीही पुन्हा आपल्या मूळ पक्षाशी निष्ठा जाहीर केली यातल्या तीन आमदारांना सोमवारी हरियाणामधील गुरुग्राम येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेनं मुंबईला परत नेलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्या टीमने ही सुटका केली होती.
अशी झाली सुटका...
सोनिया दुहान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यावेळी केलेल्या ऑपरेशन गुरुग्रामबद्दल माहिती दिली. त्या स्वतः गुरुग्राममध्ये राहातात. त्या म्हणाल्या, "आमच्या (राष्ट्रवादी) काँग्रेसच्या आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये बंद केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु नक्की कोणतं ओबेरॉय हॉटेल हे आम्हाला समजलं नव्हतं. दिल्ली आणि गुरुग्राम अश दोन ठिकाणी ओबेरॉय हॉटेल्स आहेत."
"आमच्या आमदारांनांही आपल्याला कुठे ठेवण्यात आलंय हे माहिती नव्हतं. त्यांनी फूड ऑर्डर बूकवरून ओबेरॉयमध्ये आहोत इतकाच मेसेज कसाबसा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे आम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
गुरुग्रामच्या ओबेरॉयमध्ये आम्ही 200 लोकांना घेऊन गेलो. त्यासाठी 2 टीम्स तयार करण्यात आल्या होत्या. हे तिघे पाचव्या मजल्यावर आहेत असं आम्हाला समजलं ते 5109, 5100, 5111 या खोल्यांमध्ये होते आणि त्यांच्यावर भाजपच्या सुमारे 100 ते 150 लोकांचा पहारा होता."
"या लोकांना सोडवण्यासाठी आमच्या टीमने हॉटेलमध्ये रुम्स बुक केल्या आणि दिवसभर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही तेथे राहिलो. जसे आमचे एकेक आमदार दृष्टीस पडले तसे एकेकाला हॉटेलच्या काही स्टाफच्या मदतीनं मागच्या दाराने आम्ही बाहेर काढलं. त्यानंतर गोएअरच्या विमानानं त्यांना मुंबईत आणलं. आता ते तिघेही आपल्या इतर सहकारी आमदारांबरोबर आहेत आणि आनंदी आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)