विधानसभा निकाल : शिवसेनेची भाजपबरोबरची बार्गेनिंग पॉवर वाढली का?

शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली रस्सीखेच येणाऱ्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. सध्या असलेले कल पाहता शिवसेनेच्या जागा कायम असल्याचं दिसत आहे. पण भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाधानकारक निकाल लागल्याचं सांगितलं. त्याच वेळी त्यांनी ही आठवण करून दिली की सत्तेत आमचा वाटा 50 टक्क्यांचा राहील.

सुरुवातीचे कल पाहिल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की आमचा सत्तेत वाटा 50 टक्के राहील. 'युती होण्याच्या पूर्वीच आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत. त्यामुळे आमचा सत्तेत अर्धा वाटा राहील' असं ते म्हणाले.

सध्याचे कल असं सांगत आहेत की शिवसेनेला 64 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपला 101 जागांवर आघाडी मिळाली आहे. दोन्ही पक्ष मिळून सत्ता सहज स्थापन होऊ शकते, पण प्रश्न असा आहे की हा 2014 ते 2019 च्या तुलनेत शिवसेनेचा 2019 ते 2024 या काळात सत्तेत मोठा वाटा राहील का.

शिवसेनेला गेल्या वेळी दहा मंत्रिपदं मिळाली होती. त्यात गृह, महसूल, अर्थ, ऊर्जा, कृषी, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती भाजपकडेच होती. परिवहन, पर्यावरण आणि उद्योग ही खाती शिवसेनेकडे होती.

येणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेची वाटाघाटी वाढण्याची क्षमता वाढली आहे असं जाणकार सांगत आहेत.

निवडणुकीच्या आधीपासूनच शिवसेनेनी आपले मनसुबे जाहीर केलेले आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवेळीच ते जिथं जातील तिथं त्यांचं स्वागत झालं आणि त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी ते भावी मुख्यमंत्री आहेत अशाच घोषणा दिल्या. एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेते नेहमी बोलत आहेत.

जर भाजपच्या जागा कमी झाल्या तर त्यांना शिवसेनेवर अवलंबून राहावं लागेल. गेल्यावेळी भाजपच्या 124 जागा होत्या आणि शिवसेनेच्या 63 जागा होत्या. यावेळी दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले त्यामुळे भाजपच्या जागा फार वाढण्याची शक्यता नव्हती असं दिसत होती. भाजप आणि मित्रपक्षांनी 164 जागा लढवल्या आणि शिवसेनेनं 124 जागा लढवल्या. हे कल पाहिले तर असं दिसतं की भाजपचा स्ट्राइक रेट हा शिवसेनेपेक्षा चांगला आहे पण निरंकुश सत्तेसाठी हे पुरेसं नाही.

गेल्यावेळी भाजपकडे 124 जागा असल्यामुळे त्यांची बार्गेनिंग पावर जास्त होती. बहुमतासाठी साठी त्यांना 21 जागा कमी पडल्या होत्या. त्यांना राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेचं महत्त्व कमी केलं. जर तुम्ही आमच्या सोबत जरी आला तरी तुम्ही आमचं सरकार पाडू शकत नाही असा आत्मविश्वास भाजपकडे होता.

पण आता हे समीकरण बदलणार अशी चिन्हं आहेत का असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात की, "सध्या तरी वाटाघाटीच्या मैदानात शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी असावं अशी मागणीही ते ठेऊ शकतात आणि महत्त्वाची खाती देखील ते घेऊ शकतात."

शिवसेना उपमुख्यमंत्रिपद घेऊ शकते. आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी हे पद आदित्य यांना देण्याची तयारी दर्शवली आहे. पण शिवसेना आपली मागणी वाढवू शकतं. भाजपला हा निकाल अपेक्षित नव्हता. त्यांच्या जागा तर कमी झाल्याच पण शिवसेनेच्या जागा कमी झाल्या नाही.

आता शिवसेनेसोबत राहणं ही भाजपची मजबुरी झाली आहे. राज्यातल्या या नात्याचा परिणाम केंद्रातील घटकांवरही होऊ शकतो असं केसरी यांना वाटतं. राज्यातच नव्हे तर केंद्रातही चांगली खाती शिवसेना मागू शकते.

भाजप आणि शिवसेनेच्या नात्यांमध्ये तणाव कायम राहील, असं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

"ही युती याच कारणासाठी झाली की शिवसेनेनी विरोधी पक्षाची जागा घेता कामा नये. जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा कमी तर होतच आहेत पण ते कमजोर पडल्यामुळे विरोधी पक्षाची जागा तयार होत आहे ती शिवसेनेनं घेऊ नये म्हणून भाजपने प्रयत्न केले आहेत," असं पळशीकरांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)