You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण जिंकले, अतुल भोसले पराभूत
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रिंगणात असल्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील लढत महत्त्वपूर्ण मानली गेली. या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसलेंचा पराभव केला.
चव्हाण हे 9130 मताधिक्यानी जिंकले आहेत.
कशी झाली ही लढत?
कराड मतदारसंघात 1960पासून काँग्रेसचं वर्चस्व आहे. विधानसभेच्या 13 निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच बाजी मारली आहे. मात्र यंदा कराडचा मुकाबला तिरंगी होतो आहे.
2014 मध्ये विलासराव पाटील यांना नमवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे.
उदयनराजेंविरुद्ध पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट दिलं जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र तसं झालं नाही. खासदारकी ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा आमदारकीसाठी विचार करण्यात आला आहे.
भाजपने याठिकाणी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूरच्या मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. 2014 मध्येही अतुल यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्याबरोबरीने उदयसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने मुकाबला चुरशीचा झाला आहे. उदयसिंह यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
विलासराव पाटील यांचे सुपुत्र असलेले उदयसिंह हे जिल्हा परिषद सदस्य होते तसंच रयत सहकारी मिलचे चेअरमन आहेत.
2014 मध्ये या तिघांमध्येच झालेल्या मुकाबल्यात पृथ्वीराज चव्हाणांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांना एकूण 76,831 मतं मिळाली होती. विलासराव पाटील यांना 60,413 तर अतुल भोसले यांना 58,000 मतं मिळाली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)