You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साकोली निकाल: काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला भाजपच्या परिणय फुके यांचा पराभव
विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली.
या लढतीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपच्या परिणय फुके यांचा पराभव केला.
2014 साली या निवडणुकीत भाजपचे काशीवर राजेश लहानू विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या सेवकभाऊ वाघयेंचा पराभव केला होता.
पार्श्वभूमी
भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखानी आणि लाखांदूर तालुके या मतदारसंघात येतात.
2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे काशीवार लहानू इथून तब्बल 25,489 च्या मताधिक्याने निवडून आले होते. तर 2009 मध्ये नाना पटोले या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते.
पण 2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी भाजपविरोधात बंड पुकारलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला. आता ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मतदानाच्या दोन दिवस आधी परिणय फुके आणि नाना पटोलेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने या मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या हाणामारीत भाजपच्या परिणय फुकेंचा भाऊ तर काँग्रेसच्या नाना पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी झाल्याचं वृत्त 'एबीपी माझा' ने दिलं होतं.
21 ऑक्टोबरला साकोलीतल्या 97 मतदान केंद्रांवर मिळून 71.16% मतदान झालं. या मतदारसंघातल्या एकूण 3,18,393 मतदारांपैकी 2,26,583 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुख्य लढती
साकोली मतदारसंघातील साकोली, लाखानी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांपैकी लाखांदूर हा नाना पटोलेंचा प्रभाव असणारा तालुका मानला जातो.
या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलं असून उद्योगांचं फारसं अस्तित्त्वं नाही. साकोली विधानसभा मतदारसंघावर गेली अनेक वर्षं भाजपने आपला वरचस्मा राखलेला आहे.
पण लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोलेंनी पक्ष बदल केल्याने आता इथलं चित्रं काहीसं बदललंय. नाना पटोले आता काँग्रेसच्या तिकीटावर ही विधानसभा निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजपने परिणय फुके यांना तिकीट दिलेलं आहे.
पारडं कोणाचं जड
साकोलीतल्या या लढतीविषयी बोलताना पत्रकार रवी गजभिये म्हणतात,"साकोलीतली ही लढत स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशी पाहिली जातेय. परिणय फुके हे इथले भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री असले तरी बाहेरचे आहेत तर नाना पटोले काँग्रेसचे हेवीवेट नेते आहेत. मोदींना त्यांनी थेट विरोध केला होता. त्यामुळे त्यांची प्रतिमा मोठी आहे.
"पण भंडाऱ्यातल्या वातावरणात जातीय मतं महत्त्वाची ठरतात. इथला कुणबी फॅक्टर महत्त्वाचा आहे. पालकमंत्री असल्याने परिणय फुकेंना मोदी लाटेचा फायदा होईल असं भाजपला वाटत होतं. तर नाना पटोले स्थानिक असल्याने इथून लढत आहेत.
"सेवक वाघाये यांनी बंडखोरी करत इथून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. इथली लढत सुरुवातीला तिरंगी वाटत होती. पण नंतर ते मागे पडले.
नंतर तिथे जे मारहाण प्रकरण झालं, त्यानंतर थोडं वातावरण बदललं. साकोलीचे मतदार म्हणू लागले की बाहेरच्या उमेदवारांपेक्षा स्थानिक उमेदवार बरा. म्हणूनच पटोलेंची बाजू भक्कम वाटतेय. इथे भाजपला फटका बसू शकतो आणि काँग्रेस विजयी होऊ शकते."
पत्रकार पंकज इंगोलेंनी साकोलीतल्या या लढतीविषयी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "साकोलीतून सेवक वाघाये इच्छुक होते. पण पटोलेंनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून तिकीट घेतल्यावर वाघयेंनी बहुजन वंचित आघाडीकरून उमेदवारी अर्ज भरला.
"सध्या वाघाये आणि परिणय फुके हे दोघेही नाना पटोलेंच्या विरोधात आहेत. यातही वाघायेंना जी मतं मिळतील त्याचा फुकेंना फायदा होईल. सुरुवातीला पटोलेंच्या बाजूने चित्र नव्हतं. नागपुरातून साकोलीत येऊन लढणाऱ्या परिणय फुकेंनी साम-दाम-दंड-भेद सगळ्याचा वापर केला. पण शेवटच्या क्षणी झालेल्या वादानंतर आता पटोलेंच्या बाजूने चित्र आहे. त्यामुळे इथे टफ फाईट असेल. शिवाय तेली समाजाची मतं कोणाला मिळतात हे देखील महत्त्वाचं असेल. कारण इथला तेली समाज करंजेकर भाजपमध्ये गेल्याने भाजपवर नाराज होता. ही जवळपास 40 हजार मतं आहेत. आणि याचा फटका परिणय फुकेंना बसू शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)