पश्चिम महाराष्ट्राचा कल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने; रोहित पवार, पृथ्वीराज चव्हाण विजयी

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील परंपरागत मतदारसंघ टिकविण्यात दोन्ही पक्षांना बऱ्यापैकी यश आल्याचं निकालांचे कल पाहून स्पष्ट होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला 9 जागांवर आघाडी मिळाली आहे.

अर्थात, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपनं मुसंडी मारत 18 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेनेला 7 जागांवर आघाडी मिळाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व

शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांचेच लक्ष सातारा जिल्ह्याकडे लागले होते. साताऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेचीही पोटनिवडणूक झाली. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.

साताऱ्यामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यामधील सातारा-जावळी मतदारसंघामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत. कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे पराभूत झाले आहेत.

साताऱ्यातील वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील विजयी झाले. कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटलांनी विजय मिळवला आहे.

कराड दक्षिणमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडून आले. पाटणमधून मात्र शिवसेनेचे शंभूराजे देसाई विजयी झाले.

फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण विजयी झाले तर माणमधून भाजपचे जयकुमार गोरेंनी विजय मिळवला.

कोल्हापूरमधील स्थिती काय?

चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील आघाडीवर आहेत. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ विजयी झाले आहेत. मुश्रीफ यांना 1 लाख 15 हजार 438 मतं मिळाली. अपक्ष म्हणून उभं राहिलेल्या समरजितसिंह घाटगे यांना 87 हजार 765 मतं मिळाली आहेत.

कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसचे ऋतुराज पाटील विजयी झाले आहेत. ऋतुराज हे डी. वाय. पाटील यांचे नातू आहेत. त्यांच्याविरोधात धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक निवडणुकीच्या रिंगणात होते.

कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला.

करवीर तालुक्यातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके पराभूत झाले आहेत. शाहुवाडीतून जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांचा पराभव केला.

इचलकरंजीमधून अपक्ष म्हणून लढणारे प्रकाशअण्णा आवाडे जिंकले आहेत. त्यांनी सुरेश हाळवणकरांचा पराभव केला.

राधानगरी-भुदरगडमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विजयी झाले आहेत. हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे विजयी झाले आहेत.

शिरोळमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी विजय मिळविला आहे. चंदगड मधून राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी झाले आहेत.

सांगलीमध्ये संमिश्र कौल

सांगलीमधून भाजपचे सुधीर गाडगीळ विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला.

मिरजेमधून भाजपचे विद्यमान आमदार सुरेश खाडेंनी विजय मिळवला आहे. सांगली-तासगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या 61 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

जतमधून काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा 34 हजार 379 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या विलासराव जगतापांचा पराभव केला आहे.

खानापूरमधून शिवसेनेचे अनिल बाबर विजयी झाले आहेत. तर पलूस-कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम दीड लाखांहून अधिक मताधिक्यानं विजयी झाले आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं ही NOTA ला मिळाली आहेत.

इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटीलही विजयी झाले आहेत. शिराळ्यामधूनही राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विजयी झाले आहेत.

काय आहे अहमदनगरचं चित्र?

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 11 मतदारसंघ आहेत. अकोले मतदारसंघातून वैभव पिचड पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे यांनी 57 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी 62 हजार मतांनी विजय मिळवला आहे. तर शिर्डीमधून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

कोपरगावमधून भाजपच्या स्नेहलता कोल्हेंचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळेंनी त्यांचा पराभव केला. श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहुजी कानडे विजयी झाले आहेत.

नेवासेमधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख विजयी झाले आहेत. शेवगावमधून भाजपच्या मोनिका राजाळे यांनी आघाडी घेतली आहे. राहुरीमधून भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांच्यावर विजय मिळवला.

पारनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके आघाडीवर आहेत, तर अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजयी झाले आहेत.

राज्यातील ज्या मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं, त्यांपैकी एक म्हणजे कर्जत-जामखेड. इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणाची सरशी-कोणाचा पराभव?

करमाळ्यातून शिवसेनेच्या रश्मी बागल या पिछाडीवर आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे नारायण पाटील यांनी दहा हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. माढ्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन शिंदे विजयी झाल्या आहेत.

बार्शीतून शिवसेनेचे दिलीप सोपल पराभूत झाले आहेत. अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला. मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने विजयी झाले आहेत.

सोलापूर शहर उत्तर मधून भाजपचे विजयकुमार देशमुख विजयी झाले आहेत. सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदेंना विजयी झाल्या आहेत.

अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी विजयी झाले आहेत. सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख विजयी झाले आहेत. सोलापूर उत्तरमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख विजयी झाले आहेत.

पंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके विजयी झाले आहेत. सांगोल्यामधून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विजयी झाले आहेत. माळशिरस मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते विजयी झाले आहेत.

पुणे ग्रामीणमध्ये महाआघाडीचंच वर्चस्व

पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले, त्यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला.

भोर हवेली मतदार संघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे विजयी झाले आहेत.

इंदापूर मतदारसंघातून आघाडीचे दत्ता भरणे यांनी विजय मिळविला असून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी पराभव केला.

दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निसटता पराभव झाला. भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी अवघ्या 618 मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात 200 मतांनी विजय झाला होता. मात्र यावर राहुल कुल यांनी आक्षेप घेत फेरमोजणीची मागणी केली. त्यात राहुल कुल यांना 618 मतांच्या फरकाने विजय झाला.

पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी विजय मिळविला. शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचा त्यांनी पराभव केला.

चिंचवड मधून भाजपचे लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा त्यांनी पराभव केला.

मावळ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला.

भोसरी मधून भाजपच्या महेश लांडगे यांचा विजय झाला त्यांनी अपक्ष विलास लांडे यांचा पराभव केला.

जुन्नर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांचा विजय झाला असून त्यांनी शिवसेनेच्या शरद सोनवणे यांचा पराभव केला.

आंबेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला. शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांचा त्यांनी पराभव केला.

खेड आळंदी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेच्या आमदार सुरेश गोरेंचा पराभव केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)