मुक्ताईनगर : रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का, अपक्ष चंद्रकांत पाटील विजयी - विधानसभा निवडणूक निकाल

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजी नाट्यामुळे मुक्ताईनदर मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला.

भाजपने यंदाच्या विधानसभेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत खडसेंचं नाव नव्हतं. खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी यांना भाजपतर्फे शेवटच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. मात्र मुक्ताईनगरचा गड राखण्यात रोहिणी खडसेंना अपयश आलं आहे.

शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केलेले चंद्रकांत पाटील यांनी 1927 मतांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला. राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी उमेदवार अॅड. रवींद्र पाटलांना माघारीचे आदेश दिले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यात थेट मुकाबला रंगला.

खडसेंनी सलग सहावेळा मतदारसंघावर वर्चस्व गाजवलं आहे.

"तिकीट न देण्याच्या निर्णयावर समाधानी नाही. मला वाटतं माझ्यावर अन्याय झाला. 40 वर्षं मी पक्षासाठी परिश्रम केले. कष्ट केले. मी पक्षाला सांगितलं होतं की मला 5 वर्षांसाठी संधी द्या. माझे काही ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत. पण पक्षाने सांगितलं की तुम्हाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही मदत करू. पक्षाने सांगितल्यामुळे मी नाईलाजाने मान्य केलं," असं खडसे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं होतं.

खडसेंनी म्हटलं, "पक्षाने दोन महिन्यांआधी सांगितलं होतं की काही नवीन जबाबदारी देऊ. नवीन जबाबदारी म्हणजे तिकीट मिळणार नाही. त्यामुळे माझी मानसिक तयारी आधीच झाली होती. सरकारी भूखंडांचे मी शून्य टक्के व्यवहार केले आहेत. पण सरकारला वाटलं की माझी न्यायालयीन चौकशी करावी. केली. अँटी करप्शनकडून दोन वेळा चौकशी झाली. इन्कम टॅक्सच्या चौकशा झाल्या. एवढं सगळं झालं. त्यात काहीच आढळलं नाही. म्हणून सरकारला विचारलं की अजून काही असेल तीही चौकशी करा. पण मला कारण सांगा की माझा गुन्हा काय? 40-42 वर्षं जे काम केलं त्यावर पाणी फेरण्याचं काम होत असेल तर त्याचं दुःख वाटणं स्वाभाविक आहे. मी पक्षाला विचारलं होतं माझा दोष काय सांगा. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. माझा अंडरवर्ल्डशी काहीच संबंध नाही."

एकनाथ खडसेंच्या माध्यमातून झालेली विकासकामं रोहिणी यांच्यासाठी जमेची बाजू होती. जलयुक्त शिवारची सर्वाधिक कामं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकली असती.

'रोहिणी विधानसभेच्या उमेदवार म्हणून नवीन आहेत. भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू शकतो,' असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं.

चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता. याच मतदारसंघातून त्यांनी दोनदा पराभव स्वीकारला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)