You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधानसभा निवडणूक 2019: देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार - अमित शाह
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली.
काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपा युती आणि हरयाणामध्ये भाजपा तीन-चतुर्थांश मतांनी विजयी होतील अशी खात्रीही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. मुंबईत ते 'कलम 370: एक मंथन' या विषयावर बोलत होते. या भाषणामध्ये अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं शेती, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "'एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेगा' या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या घोषणेनुसारच आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळेच आम्ही नवे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच महिन्यात कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. आमच्या तीन पिढ्यांनी हे कलम रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. असं असतानाही विरोधी पक्षांना या निर्णयात राजकारण दिसत आहे."
'पं. नेहरूंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न'
"काश्मीरचा प्रश्न सरदार पटेल यांच्या हातामध्ये नव्हता. सरदार पटेल यांनी इतर सर्व संस्थाने विलिन करून घेतली. मात्र काश्मीरचे प्रकरण तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होता. ते मात्र विलीन होऊ शकलं नव्हतं.
"पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय फौजांनी मागे ढकलत नेलं होतं. परंतु अचानक हा प्रश्न युनोमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युद्धविरामाचा निर्णय घेतला गेला. त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात आजवर आलं नाही. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न पं. जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळेच उद्भवला आहे," अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी पं. नेहरू आणि काँग्रेसच्या सरकारवर टीका केली.
ते पुढे म्हणाले, "कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरचा फायदा झाला आहे. तेथे दहशतवाद संपून जाईल. तिथल्या अनुसुचित जाती-जमातींच्या लोकांना आरक्षणाचा फायदा होईल. तिथली सफरचंदं देशभरात जातील. अॅट्रोसिटीविरोधी कायदा लागू होईल. सफाई कर्मचारी आयोग, मानवाधिकार आयोग कायदा काश्मीरमध्ये लागू होईल. बालविवाहविरोध कायदा लागू झाल्यामुळे तेथिल मुलींचं संरक्षण करेल. काश्मीरमधील दिव्यांग बंधूंनाही मदत होणार आहे. तीन कुटुंबांनी या राज्यात भ्रष्टाचारविरोधी कोणताही कायदा केला नव्हता तेथे अॅंटी करप्शन ब्युरोही नव्हता. आता भ्रष्टाचारी लोकांना काश्मीरच्या थंडीतही घाम फुटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात कलम ३७० नसूनही इथली भाषा, संस्कृती सुखरूप आहे. तसंच इतर राज्यातही आहे. परंतु काश्मीरमध्ये संस्कृतीचं कारण पुढे करून कलम 370 कायम ठेवले होते. "
1971 साली बांगलादेश युद्ध भारतानं जिंकलं तेव्हा भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं अभिनंदन केलं होतं. 1994 साली काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे सांगण्यासाठी वाजपेयी युनोमध्ये गेले होते. देशहिताच्या प्रत्येक बाबतीत भाजपनं विरोधी पक्षात असूनही सरकारच्या मागे उभं राहाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राहुल गांधी यांनी देशहिताच्या मुद्द्यावर भाजप सरकारमागे राहिले नाहीत. राहुल गांधी यांनी कलम 370 हटविण्याला विरोध केला, सर्जिकल स्ट्राईकच्यावेळेसही ते देशहिताच्या बाजूने नव्हते अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
अमित शाह यांची सोलापूर सभा
अमित शाह यांची याआधी सोलापुरात सभा झाली होती.
"काँग्रेस - राष्ट्रवादी लोकशाही मूल्यं मानत नाहीत. ते घराणेशाही मानतात," असं वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापुरात केलं आहे. "जर भाजपने आपला दरवाजा पूर्ण उघडा ठेवला तर शरदराव राष्ट्रवादीत कुणीच शिल्लक राहणार नाही," असं शहा म्हणाले.
त्यांच्या उपस्थितीत सोलापुरात आज काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सोलापूरचे खासदार जयसिद्धेवर स्वामी उपस्थित होते.
धनंजय महाडिक, जयकुमार गोरे, राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा आज समारोप झाला आहे.
अमित शहा यांच्या सोलापूरच्या भाषणातील मुद्दे -
- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं सेना-भाजप युतीच्या 48 पैकी 41 जागा निवडून दिल्या. त्यामुळेच नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं.
- गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्र सगळ्याच क्षेत्रात पिछाडीवर होता. पण गेल्या 5 वर्षांत फडणवीस सरकारनं राज्याचा विकास केला.
- काँग्रेस - राष्ट्रवादी लोकशाही मूल्यं मानत नाहीत. ते घराणेशाही मानतात.
- अजित पवारांनी 64 हजार कोटी रुपये खर्च केले. पण 1 इंच जमीन सिंचनाखाली आली नाही. देवेंद्र फडणवीसांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत 8 हजार कोटी खर्च केले आणि हजारो गावं पाण्याखाली आली.
- काँग्रेसनं 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले. मोदी सरकारनं गेल्या 5 वर्षांत एकही घोटाळा केला नाही.
- वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. चंद्रकांत दादा पाटलांनी भाजपचा पूर्ण दरवाजा उघडा ठेवला, तर शरदराव काँग्रेस-राष्ट्रवादीत कुणीच शिल्लक राहणार नाही.
- 13 व्या वित्त आयोगात काँग्रेसनं महाराष्ट्राला 1 लाख 14 हजार कोटी रुपये दिले, तर मोदी सरकारनं 14 व्या वित्त आयोगात 2 लाख 86 हजार 354 कोटी रुपये दिले.
- काश्मीरमध्ये कलम 370 हटल्यापासून आजपर्यंत एकही गोळी चाललेली नाही, एकही मृत्यू झालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे -
- विरोधी पक्षात असलो तर संघर्षाची यात्रा आणि सत्तेत असलो तर संवादाची यात्रा काढायची आमची संस्कृती आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीनेही यात्रा काढलीय. आमच्या यात्रेत पावसाळ्यातही मंडप पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेत मंगल कार्यालयही भरत नाही.
- बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं आणि सोलापूरात जयसिद्धेवर स्वामी निवडून आले, तर ईव्हीएम वाईट, हा कोणता न्याय आहे? खराबी ईव्हीएमध्ये नाहीये, विरोधकांच्या खोपडीत आहे.
- गेल्या 5 वर्षांत शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी रुपये जमा केले. काँग्रेस-राष्ट्रवादीनं गेल्या 15 वर्षांत फक्त 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.
- गुंतवणूक, रोजगार अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे, असं नीती आयोगाची आकडेवारी सांगते.
चंद्रकांत पाटील यांच्या भाषणातले मुद्दे
- ज्या महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाशिवाय काही चाललं नाही, त्या राज्यात मुख्यमंत्र्यांनी विकासाचं राजकारण केलं. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं, त्यांचे आभार मानायचे असतात, कामांचा हिशोब द्यायचा असतो, अशी आमची संस्कृती आहे, म्हणून आम्ही महाजनादेश यात्रा काढली आहे.
- शरद पवार पत्रकारांवर उखडले. जवळची माणसं निघून जात असल्यामुळे त्यांचा तिळपापड होत आहे. माझी पोरं घेऊन जात आहे, असं ते म्हणत आहेत. पण, उदयनराजे, शिवेंद्रराजे काय पोरं आहेत का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)