विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस हे प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्य प्रतिस्पर्धी मानत आहेत का?

'वंचित बहुजन आघाडीला भाजपची 'बी' टीम म्हणणाऱ्यांची अवस्था आता 'बी' टीमसारखी झालीये. वंचित आघाडी 'ए' टीम झालीये. भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा असेल,' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळं एका नवीन राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील आरोप-प्रत्यारोप आहे की यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या वेळेस प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीनं 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्यापासून ही भाजपची 'बी' टीम आहे, अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती. या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर या 'बी' टीमनं काँग्रेस-राष्ट्रवादीचं किती आणि कसं नुकसान केलं, याचं विश्लेषण सुरू झालं.

राज्यातील 10 ते 12 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी 50 हजारांहून अधिक मतं घेतली. अकोला मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनाही अडीच लाखांहून अधिक मतं मिळाली.

उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची कामगिरी चांगली होती. त्याचा काँग्रेसला चांगलाच फटका बसला.

त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत वंचितची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. "आम्ही काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली आहे आणि त्यांच्या निर्णयाची वाट पाहतो आहोत. प्रतिसाद आला किंवा नाही आला तरी 'MIM' सोबत आमचा निर्णय घेऊन टाकू," असं प्रकाश आंबेडकरांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीला स्थान नको, अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली होती. या अटींवर काँग्रेस वंचितसोबत जाणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित सोबत न गेल्यास लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही मतविभागणी होणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अन्वयार्थ लावणं आवश्यक आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं, की "मुख्यमंत्र्यांना वंचितबद्दल एवढी आपुलकी का आहे, हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाहीये. वंचितमुळे अधिकाधिक मतविभाजन व्हावं अशीच मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे."

वंचितचं महत्त्व वाढवणं भाजपची गरज

वंचितचा वारंवार मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करणं याचा अर्थ काय असं विचारलं असता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "लोकसभा निवडणुकीत वंचितमुळं झालेल्या मतविभागणीचा फायदा हा भाजप-सेनेला झाला होता. त्यामुळं विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीला जितकी जास्तं मतं मिळतील, तितका फायदा हा भाजप-सेनेला होईल, असं चित्र आहे. नेमक्या या कारणासाठीच वंचित बहुजन आघाडीचं मोठेपण वाढवत राहणं हे भाजपच्या डावपेचांचा भाग आहे."

"लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेला राज्यातील 288 पैकी 227 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. पण भाजप आता बहुमतावर समाधानी होणार नाही. त्यांना विरोधकच नको. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचं मनोबल खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी गरज नसतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीमधून स्थानिक नेत्यांना पक्ष प्रवेश दिला जातोय. वंचितचं महत्त्व वाढवणं हादेखील काँग्रेस-राष्ट्रवादीचं मनोधैर्य कमी करण्याचाच प्रकार आहे," असं अभय देशपांडे यांनी सांगितलं.

विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

"गेल्या पाच वर्षांत राज्यातील विरोधी पक्ष हतोत्साहित झाला आहे. त्यातच अशा प्रकारच्या विधानातून करून आम्ही तुम्हाला खिजगणतीतही धरत नाही," असा संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेलं पानिपत आणि आता दोन्ही पक्षांमधून सुरू झालेली गळती यांमुळे मुख्यमंत्र्यांनी डिवचण्याच्या उद्देशातून केलेल्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळेही विरोधकांमध्ये घबराट उडू शकते," असं मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं.

एकीकडे मुख्यमंत्र्यांची अशी विधानं तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर अजूनही आघाडीत जाणार की नाही याबाबत कोणतंही स्पष्ट भूमिका न घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीवरील दबाव वाढवत आहेत असंही नानिवडेकर यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)