भगतसिंह कोश्यारी यांचा प्रवास- शिक्षक, पत्रकार, लेखक ते मुख्यमंत्री, खासदार आणि राज्यपाल

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आलेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती.

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं.

प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत आमदार, मुख्यमंत्री, खासदार, राज्यपाल अशा विविधांगी भूमिका हाताळणाऱ्या कोश्यारी यांनी सुरुवातीला बिगर राजकीय क्षेत्रातही छाप उमवली आहे. त्यांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील, "नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करू इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.

या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख त्या निमित्ताने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर भगतसिंह कोश्यारी अनेकवेळा चर्चेत आले आहेत. मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून वेगळेपण सिद्ध केल्यानंतर त्यांनी मराठीतून अभिभाषण करणारे राज्यपाल अशीही ओळख त्यांनी अगदी सुरुवातीपासून मिळवली.

त्यांनी राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला.

त्यानंतर कोरोनाची साथ आल्यानंतरही भाजपचे नेते वारंवार राज्यपालांकडे जाऊन भेटी घेत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंची आमदार म्हणून नेमणूक करायला कोश्यारींनी विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंचा आमदार व्हायचा मार्ग मोकळा केला.

विद्यापीठाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारच्या विरोधात कोश्यारींनी भूमिका घेतली. त्यावेळी संघर्ष टाळून राज्य सरकारने कुलपती असलेल्या राज्यपालांचं म्हणणं मान्य केलं. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोश्यारींना केलेल्या नमस्काराचा फोटो राजभवनने जारी केला आणि त्यावर सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली.

राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने पक्षीय राजकारण करणं अपेक्षित नसतं. पण ते भाजपला झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांच्यावर राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष अथव अप्रत्यक्षपणे केला आहे.

सी. विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारींची नियुक्ती केली.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या आगामी राज्यपाल असतील, अशी चर्चा होती. मात्र, कोशियारांची नाव जाहीर झाल्यानं या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला.

कोण आहेत कोश्यारी?

उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोशियारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाली. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1961-62 या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते.

पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.

उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री:

  • कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.
  • इंग्रजी विषयात एमएची पदवी मिळवलेल्या कोश्यारींनी शिक्षक म्हणूनही काम केलं. ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते (लेक्चरर) होते.
  • कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिलंय. 1975 पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत.
  • समाजकारण, राजकारण यांसह साहित्य हाही कोश्यारींच्या आवडीचा प्रांत आहे. 'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
  • आणीबाणीविरोधात कोश्यारी यांनी आवाज उठवला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 असे तीन वर्षे ते तुरुंगात होते.
  • उत्तराखंडमधील शिक्षण क्षेत्रात कोश्यारींनी काम केलंय. पिठोरागड येथील 'सरस्वती शिशू मंदिर', 'विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज' आणि 'नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळा' या संस्थांचीही स्थापना भगत सिंह कोशियारींनी केली.
  • अविवाहित असलेल्या भगत सिंह कोश्यारींनी अवघं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी घालवलं आहे.
  • कोश्यारींनी ट्रेकिंग करायला आवडतं. तत्त्वज्ञान, इतिहास आणि शिक्षण या विषयांची पुस्तकं त्यांना वाचायला आवडतात.
  • उत्तर प्रदेशपासून 2000 साली वेगळं झालेल्या उत्तराखंड राज्यात भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याच मानही त्यांना मिळाला.

भगत सिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत भूषवलेली महत्त्वाची राजकीय पदं :

  • मे 1997 साली ते उत्तर प्रदेशच्या विधा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले.
  • उत्तर प्रदेश सरकारमधील महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमातून कोश्यारींनी महत्वाची भूमिका बजावली. 1999-2000 या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीतही होते.
  • उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या सरकारमध्ये कोश्यारी हे ऊर्जा आणि जलसिंचन मंत्री होते. 2000 ते 2001 एवढाच त्यांना कालावधी कामासाठी मिळाला.
  • 29 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत कोश्यारींनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.
  • मार्च 2002 ते नोव्हेंबर 2008 ही जवळपास सहा वर्षे ते उत्तराखंडच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
  • नोव्हेंबर 2008 साली कोश्यारी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांमध्ये काम केलं. फेब्रुवारी 2009 ते मे 2009 या कालावधीत कोशियारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट 2009 पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)