You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार: पृथ्वीराज चव्हाण यांना वगळलं तर संजय राऊत अनुपस्थित
सरकार स्थापनेला जवळपास महिना उलटून गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला.
मुंबईस्थित विधान भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या 35 मंत्र्यांची यादी राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
29 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पाहा ताजे अपडेट्स -
संध्याकाळी 4 वाजून 44 मिनिटं
घटकपक्षांना शपथविधी निमंत्रण नाही याची भविष्यात किंमत चुकवावी लागेल असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केलं आहे.
2 वाजून 26 मिनिटं
आदिती तटकरे, संजय राठोड, प्राजक्त तनपुरे. बच्चू कडू आणि उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
2 वाजून 14 मिनिटं- उद्धव ठाकरे सरकारमधले राज्यमंत्री
काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि विश्वजित कदम, शिवसेनेचे अब्दुल सत्तार, शंभूराजे देसाई यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
2 वाजता- आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री
आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करणारे आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाचीही जबाबदारी स्वीकारली आहे.
आदित्य यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आदित्य यांना कोणतं खातं मिळणार, ही उत्सुकता आहे.
1 वाजून 55 मिनिटं - भगतसिंह कोश्यारींचा संताप
काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली. अक्कलकुवाचे आमदार असलेल्या पाडवी यांनी शपथ घेताना ठरलेल्या मजकुरासोबतच काही अधिक गोष्टी वाचल्यानं राज्यपालांना राग आला आणि त्यांनी पाडवींना पुन्हा शपथ वाचायला लावली.
शिवसेनेचे संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, शिवसेनेचे अनिल परब, उदय सामंत, काँग्रेसचे के.सी.पाडवी, असलम शेख तसंच अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
1 वाजून 40 मिनिटं - जितेंद्र आव्हाड, अमित देशमुखांची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसंच काँग्रेसचे नेते अमित देशमुखांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
आघाडी सरकारच्या काळात जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. अमित देशमुख यांनीही यापूर्वी राज्य मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
1 वाजून 33 मिनिटं- कोणी कोणी घेतली शपथ?
आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, काँग्रेसचे नेते सुनील केदार, शिवसेना नेते संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
1 वाजून 15 मिनिटं- सीमाभागासह जय महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'सीमाभागासह जय महाराष्ट्र' असा समारोप केला. हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शनिवारी (28 डिसेंबर) कोल्हापूर आणि बेळगाव यांच्यामधील बससेवा बंद करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या शपथेला या सीमावादाची पार्श्वभूमी होती.
1 वाजून 10 मिनिटं- धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं आहे.
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा परळीमधून पराभव केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे- पाटील तसंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
1 वाजून 4 मिनिटं- अजित पवार उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविली जाईल, याची उत्सुकता आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असलं तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र मंत्रीमंडळ विस्तारातून वगळण्यात आलं.
12 वाजून 52 मिनिटं- संजय राऊतांची अनुपस्थिती
शिवसेना खासदार संजय राऊत हे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र ANI शी बोलताना संजय राऊत यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे.
आम्ही पक्षाकडून मागणारे नसून पक्षाला देणारे आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
12 वाजून 30 मिनिटं- नेते-कार्यकर्त्यांची गर्दी
विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी संभाव्य मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
11 वाजून 39 मिनिटं - सोहळ्याचं आमंत्रण नसल्यानं राजू शेट्टी नाराज
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नसल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं, की सत्तास्थापनेच्या चर्चेमध्ये मित्र पक्षांना सन्मानं वागवलं गेलं. मात्र आता सत्ता स्थापन झाल्यानंतर मित्र पक्षांचा विसर पडला आहे. किमान समान कार्यक्रम तयार करत असतानाही आमचे मुद्दे विचारात घ्या, असं आम्ही म्हटलं होतं.
पण तेव्हाही आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही. भाजप नीट वागलं नाही म्हणून आम्ही त्यांची सोबत सोडली. आता हे नीट वागत नसतील तर त्यांच्यामागे फरपटत जावं, असं नाही.
11 वाजता- आज होणाऱ्या कार्यक्रमात कोण घेणार शपथ?
मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का झाला?
दरम्यान, या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचं कारण म्हणून कॉंग्रेसकडे बोट दाखवलं गेलं. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत निश्चित होणार होती आणि राज्यातले अनेक नेते स्वत:साठी वा त्यांच्या समर्थकांसाठी जोर लावत होते, त्यामुळे कॉंग्रेसची अंतिम यादी येण्यास उशीर झाला असं अशी चर्चा होती.
त्याबरोबरच, कॉंग्रेसला मिळणारी खाती आणि त्यासाठी दिल्या जाणा-या नावांवरून दिल्लीत आणि महाराष्ट्रात विविध आग्रह आणि मतांतरं होती असंही समजतं आहे.
महसूल, अर्थ या महत्त्वाच्या खात्यांसाठी काँग्रेस आग्रही होती. त्याच खात्यांसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतही त्यांचे वाद होते. त्यामुळे ही यादी लांबत गेली. कॉंग्रेसला हव्या असणा-या खात्यांमधले वाद इतके टोकाला गेले की कॉंग्रेस प्रसंगी बाहेरूनही पाठिंबा देईल अशा आशयाच्या काही बातम्याही आल्या. कॉंग्रेसला त्यांच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांमध्ये जुने आणि नवे चेहरे, सामाजिक आणि प्रादेशिक समतोलही साधायचे होते.
याबद्दल 'बीबीसी मराठी'शी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं, की कॉंग्रेसमुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडला असं म्हणता येणार नाही. पण असे तीन वेगवेगळे पक्ष पहिल्यांदा एकत्र येतात तेव्हा स्वाभाविक आहे की काही निर्णयांमध्ये थोडा वेळ लागणार. पण त्यामुळे सरकारचं काम कुठेही अडलं नाही. एक मंत्रिमंडळ सगळी कामं करत होतं. त्याचबरोबर, हा जो एवढा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याच्या तयारीसाठी प्रशासनालाही तयारीसाठी थोडा अवधी हवा होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)