पी. व्ही. सिंधू : गोपीचंद यांची शिष्या झाली भारताची पहिली जगज्जेती खेळाडू

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

2001 मध्ये पुलेला गोपीचंद या 28 वर्षांच्या बॅडमिंटनपटूने महाप्रतिष्ठेची ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली. मुळातच भारतीयांच्या वाटेला विजेतेपदाचे असे क्षण विरळाच. त्यात ऑल इंग्लंड ही मानाची स्पर्धा.

गोपीचंद या स्पर्धेनंतर हैद्राबादला त्यांच्या घरी परतले तेव्हा त्यांचं विजयी वीरासारखं स्वागत झालं. गाडीतून त्यांच्या घरापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

जवळच्या सिकंदराबाद शहरात एक मुलगी हे सगळं टीव्हीवर पाहत होती. आई-वडील दोघंही व्हॉलीबॉल खेळाडू. वडील तर अर्जुन पुरस्कार प्राप्त. त्यामुळे घरी खेळांचं वातावरण होतंच. मुलीला फक्त आपला आवडता खेळ निवडायचा होता.

गोपीचंद यांचं झालेलं स्वागत तिच्या मनात घर करून राहिलं. तिच्या आईने केलेलं गोपीचंद यांच्या पराक्रमाचं वर्णन तिच्या मनावर कोरलं गेलं. तेव्हा तिचं वय होतं फक्त सहा वर्षं...

त्याचवेळी गोपीचंद यांच्या मनात वेगळंच काही सुरू होतं. चहुबाजूने कौतुकाचा वर्षाव होत होता. पण, मिरवणुकीच्याच वेळी शेजारी बसलेल्या आईला ते सतत सांगत होते, 'खूप उशीर झालाय.' त्यांना म्हणायचं होतं, की या विजेतेपदासाठी भारताला खूप वाट बघावी लागली. हे बदलायचं असेल तर चांगले प्रशिक्षण वर्ग भारतात तयार करावे लागतील.

या मानसिकतेतून त्यांनी ध्यास घेतला स्वत:चा प्रशिक्षण वर्ग उघडण्याचा. त्यातून आकाराला आली हैद्राबादच्या गच्चीबाऊलीमध्ये असलेली पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी...

या अकॅडमीच्या पहिल्या फळीतील एक खेळाडू म्हणजे आधी सांगितलेली सिकंदराबादमधली 6 वर्षांची मुलगी पुसरला वेंकट सिंधू...

गोपीचंद यांच्या ऑल इंग्लंड विजेतेपदापासून प्रेरणा घेऊन ती वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्याकडे खेचली गेली आणि गोपीचंद यांना जो जगज्जेता खेळाडू घडवायचा होता तो त्यांना तिच्यात दिसला.

अर्थात सायना नेहवाल, परुपल्ली कश्यप हे सिंधूपेक्षा सीनिअर खेळाडू मध्ये झाले. पण सिंधुने एकलव्याच्या साधनेनं जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे.

तिच्या खात्यात आता ऑलिम्पिक रौप्य, विश्वविजेतेपद स्पर्धांमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं, आशियाई खेळांमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि मानाच्या वर्ल्ड टूअर फायनलचं जेतेपद जमा आहे.

विश्वविजेतेपदाला गवसणी

ऑलिम्पिकचं वर्ष वगळता दरवर्षी होणारी विश्वविजेतेपदाची स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकच्या खालोखाल महत्त्वाची स्पर्धा. स्पर्धेत जागतिक क्रमवारीनुसार अव्वल खेळाडूच सहभागी होऊ शकतात. त्यामुळे स्पर्धेचा दर्जा सर्वोत्तम. आणि अशा स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे.

फायनलमध्ये नझोमी ओकुहारा या जपानी खेळाडूला 21-7, 21-7 असं हरवताना सिंधूचा आवेश बघण्यासारखा होता. एखाद्या भारतीय बॅडमिंटनपटूने सामन्यावर निविर्वाद वर्चस्व गाजवण्याची ही पहिलीच वेळ असावी.

5 फूट 10 इंच इतकी उंची, उंचीमुळे वेगाने बरसणारे स्मॅशचे फटके आणि त्याला अचूकतेची जोड यातून तिने हा विजय साध्य केला. बॅडमिंटनमधल्या चिनी, कोरियन आणि जपानी वर्चस्वाला तिने सुरुंग लावला.

खरंतर 2017 पासून मागची तीन वर्षं सिंधुनं या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण दरवेळी फायनलपर्यंत पोहोचून तिच्या पदरी पराभवच आला. आणखी काही सुपर सीरिजमध्येही हाच निकाल लागल्यामुळे मोठ्या फायनल खेळण्यासाठी सिंधू मानसिक दृष्ट्या कणखर नाही, अशी तिची अवहेलनाही झाली.

त्यातच 2019 मध्ये इंडोनेशियन ओपन वगळता स्पर्धा ती जिंकू शकली नव्हती. त्यामुळे तिचा फॉर्म हरवल्याचीही चर्चा झाली. पण, महत्त्वाच्या क्षणी सिंधूने आपला फॉर्म आणि आपली मानसिक कणखरताही दाखवून दिलीये. पुढच्या वर्षी टोकयोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपण तयार असल्याचा इशाराच तिने दिला आहे. सिंधुची ही कामगिरी नेमकी कशामुळे शक्य झाली?

मोठी स्पर्धा, मोठी तयारी

वयाच्या आठव्या वर्षापासून सिंधू गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. सब-ज्युनिअर स्तरापासून त्यांनी तिच्यावर विशेष मेहनत घ्यायला सुरुवात केली. स्वत: गोपीचंद यांना ऑलिम्पिक पदकाची आस होती. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या फेरीत झालेला पराभव त्यांना आजही आठवतो आणि बोचतो.

खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाने दखल घ्यायला हवी असेल तर मोठी स्पर्धा जिंकावी लागेल ही गोष्ट त्यांनी आपल्या शिष्यांच्या मनात बिंबवली आणि सिंधूने ती पुरपूर आत्मसात केली. तिची पहिली मोठी दखल जगाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक दरम्यान घेतली.

आताही विश्वविजेतेपद स्पर्धा आणि पुढच्या वर्षी येणारं ऑलिम्पिक याची तयारी सुरू झाली आहे. गोपीसरांची पहिली अट असते ती मोबाईल फोन आणि त्यातील व्हॉट्स अॅप पूर्ण बंद करण्याची. लक्ष विचलित होऊ नये म्हणून ही खबरदारी.

रिओच्या वेळी 21 वर्षांची असलेल्या सिंधुने (जी आधी फोनला चिकटलेली असायची) क्षणात फोन बंद केला होता. आताही मागचे तीन महिने तिचा फोन बंद आहे.

आपल्यापेक्षा क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूंना हरवायचं असेल तर त्यांच्यापेक्षा जास्त वेग, चपळता आणि क्षणात निर्णय घेण्याची मनाची स्थितप्रज्ञता पाहिजे. त्यासाठी वेगळी तयारी. सगळ्या प्रकारच्या फटक्यांचा अहोरात्र सराव हा तिचा शिरस्ता. ऑलिम्पिक दरम्यान तर दोघांनी मध्यरात्री उठून हॉटेलच्या खोलीत काही फटक्यांचा सराव केला होता.

इतकंच कशाला, मैदानावरची तिची देहबोली कशी असावी याचाही अभ्यास दोघांनी केला आहे. समोरच्या खेळाडूने तिला हलक्यात लेखू नये म्हणून ही तजवीज. एकदा गोपीसरांनी तिला अॅकॅडमीतल्या सहा कोर्टांच्या मध्यभागी उभं राहून फक्त ओरडायचा सराव करायला सांगितला होता.

फिटनेस, ताकद आणि वेग

2016 मध्ये सिंधुने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर तिने मोठ्या स्पर्धा जिंकाव्या आणि खेळात सातत्य ठेवावं अशी तिच्याकडून अपेक्षा होती. पण, मधल्या काळात तिच्याकडून ती पूर्ण झाली नाही.

तिने दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्या. पण ज्या अव्वल खेळाडूंना ती क्वार्टर फायनल नाहीतर सेमी फायनलमध्ये हरवत होती, त्यांच्याकडून फायनलमध्ये मात्र पराभव होत होता. त्यातूनच ती मोठ्या फायनलसाठी तयार नाही, असा शिक्का तिच्यावर बसला.

सिंधूकडे जिंकण्याची ईर्ष्या नाही असा काहींचा समज झाला. सिंधूसाठीही तो काळ कठीण होता. पण तिने मेहनत आणि सरावावर विश्वास ठेवला. महत्त्वाच्या क्षणी नेमकी कामगिरी करण्यासाठी फिटनेस, ताकद आणि वेग वाढवला पाहिजे हे तिला पटलं. आणि तिने त्यावरच लक्ष केंद्रित केलं.

आज सिंधू चिनी खेळाडूंच्या बरोबरीने तंदुरुस्त आहे. तिच्या मनगटात आणि दंडात हजार स्मॅशचे फटके मारण्याची ताकद आहे. आणि विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेतला तिचा वेग बघितला तर तुम्ही म्हणाल ती कोर्टवर धावत नाही, उडते. ताकद, वेग आणि एकाग्रता या तिच्या जमेच्या बाजू आहेत.

अव्याहत सराव

सिंधू ऑलिम्पिकसाठी तयारी करत होती तेव्हा गोपीसरांकडे आणखी एक सीनिअर खेळाडू होती, सायना नेहवाल. तेव्हाची भारताची अव्वल खेळाडू. तिचा गोपीसरांबरोबर सराव सुरू व्हायचा पहाटे पाचला. त्यामुळे गोपीसरांनी सिंधुला पर्याय दिला 4 वाजता सराव सुरू करण्याचा. म्हणजे चार ते पाच ते तिच्याबरोबर वेळ घालवणार होते. सिंधूने लगेच 'हो' म्हटलं.

तेव्हापासून सरावात दाखवलेलं सातत्य तिने आजही कायम ठेवलं आहे.

इतकंच कशाला, अगदी लहानपणी तिने गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेणं सुरू केलं तेव्हा सिकंदराबाद ते गचीबाऊली हा प्रवास होता २ तासांचा. जाऊन येऊन चार तास. पण, सिंधुने प्रवासाच्या या वेळा सांभाळून वेळेवर सरावाला येण्याचा दंडक कायम पाळला.

नेव्हर से डाय

सिंधुच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं लोभस हास्य. त्यामुळे तिच्या मैत्रिणीही खूप. अगदी बॅडमिंटन कोर्टवर तिच्याशी दोन हात करणाऱ्या ताय झू यिंग, यू फे चेन अशा चिनी खेळाडूही मैदानाबाहेर तिच्याशी हात मिळवतात, एकत्र शॉपिंग करतात.

पण या हास्याच्या बरोबरीने सिंधूकडे आहे एक करारीपणा...कधीही हार न मानण्याची वृत्ती. किंबहुना पराभव ती शांतपणे हसण्यावारी नेते. आणि कायम पुढचा विचार करते. गोपीसर आणि इतर कोचचा सल्ला मानून झालेल्या चुकांवर विचार करते. आणि वेळोवेळी खेळामध्ये बदल करते.

गोपीसरांशी मैत्री आणि प्रेरणा

तसंही गोपीचंद यांना अॅकॅडमीत कुणी सर म्हणत नाही. सगळे गोपीभैय्या म्हणतात. 30 व्या वर्षी अकॅडमी सुरू केल्यामुळे त्यांच्याकडे तरुण मुलांबरोबर तासनतास खेळण्याचा स्टॅमिना होता. सिंधुसाठी गोपीचंद प्रशिक्षकही आहेत आणि मार्गदर्शकही...

वैयक्तिक आयुष्यात ती आपल्या आईच्या खूप जवळ आहे. आणि तिचा प्रत्येक सल्ला मानते. पण, जेव्हा बॅडमिंटनचा प्रश्न असेल तेव्हा सिंधुसाठी गोपीचंद यांचा शब्द प्रमाण आहे. मध्यंतरी सायना आणि सिंधू यांना वेळ देण्यावरून तिघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्या. तसे खटक अधेमधे उडतच असतात.

पण सिंधुने त्या पलीकडे जाऊन बॅडमिंटनला प्राधान्यक्रम देण्यात कसूर केलेली नाही.

या सगळ्याच्या जोरावर तिने इथवर मजल मारली आहे. भारतीय बॅडमिंटनमध्ये नव्या दिग्गज खेळाडूचा जन्म झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)