द्युती चंद : 'मी एका मुलीवर प्रेम करते, पण त्यावरून माझं क्रीडा कौशल्य तपासू नये'

भारताची अव्वल धावपटू द्युती चंद उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. द्युतीच्या नमुन्यांमध्ये प्रतिबंधित उत्तेजकं सापडल्याने तिच्यावर हंगामी बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

26वर्षीय द्युतीने 2018 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं होतं. द्युतीच्या नमुन्यांमध्ये अँडेरिन, ऑस्टरिन आणि लिंगनड्रोल हे प्रतिबंधित घटक आढळले. राष्ट्रीय उत्तेकजविरोधी संघटनेने जारी केलेल्या पत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अडव्हर्स अनालिटिकल फाईंडिंग्जमध्ये द्युती दोषी आढळली आहे.

जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेने जारी केलेल्या तत्वांनुसार नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये तुमच्या सँपल ए मध्ये प्रतिबंधित घटक आढळले आहेत असं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. स्पर्धेव्यतिरिक्त कालावधीत खेळाडूंच्या उत्तेजक चाचण्या घेतल्या जातात. त्यानुसार गेल्यावर्षी 5 डिसेंबरला भुवनेश्वर इथे द्युतीचे नमुने घेण्यात आले होते.

प्रतिबंधित घटक आढळल्याने बंदीची कारवाई होऊ शकते असं या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान यासंदर्भात मला काही माहिती नसल्याचं द्युतीने म्हटलं आहे.

भारताची अव्वल धावपटू द्युती चंदने 2019 साली आपण समलिंगी संबंधांमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

आपण एका मुलीच्या प्रेमात आहोत असं द्युतीने म्हटलं आणि समलिंगी संबंधांत असल्याचं जाहीरपणे सांगणारी द्युती ही पहिलीच भारतीय क्रीडापटू ठरली.

2018 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत द्युतीने दोन रौप्यपदकांची कमाई केली होती तसंच 100 मीटर प्रकारातील विक्रमही तिच्या नावावर आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी द्युती प्रयत्नशील आहे.

पण यंदा तिच्या बातम्यांमध्ये राहण्याचं कारण वेगळं आहे.

"मला माझी जोडीदार मिळाली आहे. साथीदार कोण असावा, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असावं. समलिंगी संबंधांचा मी सदैव पुरस्कार केला आहे. हा अत्यंत वैयक्तिक खासगी निर्णय आहे," असं द्युतीने इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना म्हणाली.

"सध्या माझं उद्दिष्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिकसाठी पात्र हे आहे. मात्र त्यानंतर साथीदारासोबत नवं आयुष्य सुरू करण्यास मी उत्सुक आहे," असंही द्युतीने सांगितलं.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा महत्त्वाचा निकाल दिला होता. त्यानंतरच आपण यासंदर्भात खुलेपणाने बोलू शकले, असं द्युतीने सांगितलं.

"कुणावर प्रेम करावं याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही आणि ते नाकारू नये. सर्वोच्च न्यायालयाने जुना कायदा रद्दबातल ठरवला. मी कुणाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून माझं क्रीडापटू म्हणून कौशल्य तपासू नये. देशासाठी पदकं जिंकून देण्याचा माझा सदोदित प्रयत्न असेल," असं ती पुढे म्हणाली.

"क्रीडापटू आणि माणूस म्हणून मला मानसिक पाठिंबा देणाऱ्या साथीदाराची आवश्यकता आहे. मी गेली दहा वर्ष जगभर प्रवास करत खेळते आहे. यापुढे पाच ते सात वर्ष खेळण्याचा माझा प्रयत्न आहे."

ओडिशामधील जयपूर जिल्ह्यातील चका गोपाळपूर हे द्युतीचं गाव आहे.

द्युती चंदचा स्त्रीत्वासाठी लढा

ओडिशाच्या द्युती चंदची कारकीर्द ही मैदानाइतकीच न्यायालयात खेळली गेली आहे. अॅथलिट द्युती चंदला स्वत:च्या स्त्रीत्वाची परीक्षा द्यावी लागली आहे. यासाठी द्युतीने प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला.

ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी द्युतीची निवड झाली होती. बेंगळुरूतील स्पोर्ट्स ऑथॅरिटी ऑफ इंडियाच्या डॉक्टरांनी द्युतीची चाचणी घेतली. या चाचणीच्या निकालानंतर द्युतीला भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

द्युतीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढं असल्याने तिला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने लंडन ऑलिम्पिकनंतर महिला अॅथलिटसाठी हायपर अँण्ड्रोजेनिझम चाचणी लागू केली.

महिलांच्या शरीरात पुरुषांच्या पातळीएवढी संप्रेरकं असल्याने त्याचा फायदा महिला क्रीडापटूंनी घेऊ नये आणि महिला क्रीडापटूंमधील स्पर्धा निकोप राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे शांती सुंदरराजन आणि पिंकी प्रामाणिक यांची कारकीर्द ओहोटीला लागली.

दक्षिण आफ्रिकेची अव्वल अॅथलिट कॅस्टर सेमेन्यावरही 2008 मध्ये याच कारणांमुळे बंदी घालण्यात आली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने कॅस्टरला पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वीच कॅस्टरसंदर्भातील खटल्याचा निकाल जाहीर झाला होता.

द्युतीवर बंदी घालण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला आधार दिला. एखाद्या महिलेच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाने वाढले असेल तर तो किंवा ती खेळाडू बंदीस पात्र ठरतो. मात्र एखाद्या महिलेच्या शरीरात नैसर्गिकपणे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषाच्या शरीरातील पातळीएवढे असेल तर तिला दोषी ठरवलं जातं.

या नैसर्गिक वाढीमागे महिला क्रीडापटूंची भूमिका काय?

संबंधित महिलेच्या शरीरात गुणसूत्रांची स्थिती सर्वसामान्य असेल तर टेस्टोस्टेरॉनच्या वाढीला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांसह द्युतीने आपलं म्हणणं कॅस अर्थात Court Arbitration for Sports अर्थात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे मांडलं.

विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, क्रीडा या तीन क्षेत्रांना व्यापलेल्या या खटल्यातील खाचाखोचा समजून घेऊन कोलकाता येथील जेंडर व्हेरिफिकेशन टेस्टच्या अभ्यासक पायोश्री मित्रा यांनी द्युतीला सर्वतोपरी मदत केली.

पतियाळा इथल्या स्पोर्ट्स ऑथॅरिटी ऑफ इंडियाचे संचालक जिजी थॉमसन यांनीही द्युतीला पाठिंबा दिला. क्रीडा क्षेत्रातील अवघड गुंत्यांची उकल करण्याचे सर्वाधिकार क्रीडा लवादाकडे आहेत.

महिला खेळाडूंमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुष पातळीएवढे असले तरी त्यामुळे महिला खेळाडूंना अकारण फायदा होऊ शकतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकलेलं नाही हे कॅसने मान्य केलं. यामुळे कॅसने हायपर अँण्ड्रोनिझम चाचणी दोन वर्षांसाठी स्थगित केली. टेस्टोस्टेरॉनच्या वाढलेल्या प्रमाणामुळे महिला खेळाडूंना विनाकारण फायदा होत असेल तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाने हे दोन वर्षात सिद्ध करावं. तोपर्यंत अशी चाचणी केली जाऊ नये असा निकाल द्युतीच्या निमित्ताने कॅसने दिला.

द्युतीने खचून न जाता चिकाटीने पाठपुरावा केल्यामुळे जगभरातील असंख्य महिला क्रीडापटूंच्या व्यथेला वाचा फुटली.

मात्र दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाने लिंगचाचणीसंबंधी अधिक पुराव्यांसह कॅसकडे दाद मागितली. द्युतीच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे पुरुषांइतके असल्याचे पुरावे महासंघाने स्पष्ट केलं. द्युतीचा खटला पुन्हा सुरू करण्यात आला असला तरी संप्रेरकाच्या प्रमाणाबाबत शिथिल करण्यात आलेली अट तशीच राहणार आहे.

दरम्यान गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स संघटनेनं टेस्टोस्टेरॉनबाबतचा निर्णय मागे घेतला. यामुळे द्युतीचा 100 आणि 200 मीटरमध्ये प्रकारात धावण्याचा मार्ग खुला झाला.

समलिंगी संबंधातील क्रीडापटू

आंतरराष्ट्रीय पातळीवर दोनशेहून अधिक क्रीडापटूंनी गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुअल यापैकी एक लैंगिक ओळख जगासमोर मांडली आहे.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हायलेय जेन्सनने ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू निकोला हॅन्कॉक हिच्याशी लग्न केलं.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका महिला संघाची कर्णधार डेन व्हॅन निइकर्क आणि संघातील सहकारी मॅरिझेन कॅप यांनी एकमेकांशी लग्न केलं होतं.

त्याआधी काही वर्ष न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू आणि अॅमी सॅटरव्हेट आणि लिआ ताहूहू यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)