खय्याम : 'उमराव जान' मध्ये 'जान' टाकणारे संगीतकार शर्माजींचं निधन

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी टीव्ही एडिटर, भारतीय भाषा

"कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता

कहीं ज़मीं तो कहीं आसमां नहीं मिलता

जिसे भी देखिए वो अपने आप में गुम है

ज़ुबां मिली है मगर हमज़ुबां नहीं मिलता"

जर तुम्हाला विचारले की 1981 मध्ये आलेल्या या गाण्याचे संगीतकार कोण होते, तर उत्तर आहे ख्यातनाम संगीतकार खय्याम.

तेच संगीतकार खय्याम ज्यांनी 1947 मध्ये आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली आणि सुरुवातीचे पाच वर्षं त्यांनी 'शर्माजी' या नावाने संगीत दिलं.

भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय आणि प्रयोगशील संगीतकार मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी यांचं सोमवारी रात्री वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईत जुहूमध्ये एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चित्रपट, कला, राजकारण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींनी खय्याम यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शर्माजी आणि वर्माजी

खय्याम संगीतकार रहमान यांच्यासोबत जोडीनं संगीत देत असंत. या जोडीचं नाव होतं शर्माजी आणि वर्माजी. वर्माजी, म्हणजे रहमान पाकिस्तानला निघून गेले तर शर्माजी भारतातच राहिले.

हा किस्सा 1952 सालचा आहे. शर्माजींनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं होतं आणि त्यांना झिया सरहदी यांच्या 'फुटपाथ' या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली.

या चित्रपटात दिलीपकुमार यांच्यावर चित्रित केलेलं गाणं होतं, -"शाम-ए-ग़म की क़सम आज ग़मगी हैं हम, आ भी जा, आ भी जा आज मेरे सनम..."

दूरदर्शनला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत खय्याम यांनी सांगितलं होतं, "एक दिवस गप्पा मारताना झिया सरहदी यांनी विचारलं की तुमचं पूर्ण नाव काय आहे. मी सांगितलं मोहम्मद जहूर खय्याम. तर ते म्हणाले तुम्ही खय्याम नाव का नाही ठेवत. आणि त्यादिवशी पासून मी खय्याम झालो."

याच खय्याम यांनी कभी-कभी, बाजार, उमराव जान, रझिया सुल्तान या सारख्या चित्रपटांना अजरामर संगीत दिलं.

अभिनेता व्हायचं होतं

18 फेब्रुवारी 1927 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांच्या कुटुंबाचा चित्रपटाशी कुठलाही संबंध नव्हता. त्यांच्या कुटुंबात कोणी इमाम होते तर कोणी नमाजची जबाबदारी सांभाळणारे मुअज्जिन.

मात्र त्याकाळातल्या तरुणांसारखा खय्याम यांच्यावरही कुंदनलाल सैगल यांचा प्रभाव होता. त्यांना सैगल यांच्यासारखं गायक आणि अभिनेता व्हायचं होतं. याच आकांक्षेपोटी ते लहान वयातच घरातून पळून जाऊन दिल्लीला आपल्या काकांच्या घरी आले.

घरातली मंडळी यावरून खूपच नाराज झाली. पण त्यातून एक तोडगा असा निघाला की खय्याम प्रसिद्ध संगीतकार हुसनलाल-भगतराम यांचे शिष्य म्हणून संगीत शिकतील.

काही दिवसांतच ते मोठ्या उत्साहात नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आले, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की अजून बरच शिकणं बाकी आहे.

संगीत शिकण्याच्या ओढीनं ते दिल्लीहून लाहोरला बाबा चिश्ती (संगीतकार गुलाम अहमद चिश्ती) यांच्याकडे गेले. बाबा चिश्ती यांचे चित्रपटविश्वात चांगले संबंध होते लाहोर त्यावेळी चित्रपट निर्मितीचं महत्वाचं केंद्र होतं.

बाबा चिश्ती यांचं शिष्यत्व पत्करून खय्याम त्यांच्याच घरी राहून संगीत शिकू लागले.

दूरदर्शनसह अनेक ठिकाणी दिलेल्या मुलाखतींमध्ये खय्याम हा किस्सा आवर्जून सांगतात. "एकदा बी. आर. चोप्रा बाबा चिश्ती यांच्या घरी आले होते आणि चिश्ती साहब सगळ्यांना पगार वाटत होते. बी. आर. चोप्रांनी पाहिलं की मला पगार मिळाला नाही. त्यांनी विचारल्यावर बाबा चिश्ती म्हणाले की या तरुणासोबत असं ठरलंय की तो माझ्या घरी राहून संगीत शिकणार आणि त्याला पैसे मिळणार नाहीत. त्यावर बी. आर. चोप्रा म्हणाले की मी तर पाहतोय की सर्वांत जास्त काम हाच तरुण करतोय. त्याच वेळी बी. आर. चोप्रांनी मला 120 रुपये महिन्याचा पगार देऊ केला आणि चोप्रा कुटुंबाशी माझं नातं बांधलं गेलं."

निवडक पण दर्जेदार काम

खय्याम यांनी अनेक संगीतकारांच्या तुलनेत कमी काम केलं, पण जे काही केलं ते दर्जेदार आणि अफलातून होतं.

एक संगीतप्रेमी म्हणून जेव्हाही मी त्यांचं गाणं ऐकते तर मी स्तब्ध होऊन जाते. ती गाणी ऐकून असं वाटतं की कोणी तरी तुमच्या जखमा भरून काढतंय किंवा कोणी तरी हळूवार तुम्हाला थोपटतंय.

मग ते अखेरच्या भेटीची सल मांडणारं 'बाजार' चित्रपटाचं - 'देख लो आज हमको जी भरके' हे गाणं असेल किंवा 'उमराव जान'मधील प्रेमानं ओतप्रोत भरलेलं "ज़िंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है मुझे, ये ज़मीं चाँद से बेहतर नज़र आती है हमें" हे गाणं असेल.

यासाठी खय्याम खूप कष्ट घेत असंत. उदाहरण म्हणून त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती 1982 मध्ये आलेला चित्रपट 'उमराव जान' पाहा.

'उमराव जान अदा' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. 19 व्या शतकातील एका नृत्यांगणेची ही कहाणी होती.

खय्याम यांनी या चित्रपटाला संगीत देण्यासाठी ती कादंबरी तर वाचलीच, पण त्याकाळातील प्रचलित राग-रागिणी कोणत्या होत्या याचेही बारकावे शोधून काढले.

एस. वाय. कुरैशी यांना दिलेल्या का मुलाखतीत खय्याम सांगतात, " खूप बारकाईने अभ्यास केल्यानंतर मी आणि माझी पत्नी जगजीत यांनी ठरवलं की 'उमराव जान'चा सूर कसा असेल. आम्ही आशा भोसलेंना त्यांच्या नेहमीच्या सुरापेक्षा खालच्या पट्टीतला सूर दिला"

"मी माझ्या आवाजात त्यांना गाणे रेकॉर्ड करून दिलं. पण रिहर्सलच्या दिवशी जेव्हा आशाजींने गाणं म्हटलं तर त्या अवघडलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या की हा त्यांचा सूर नाहीये. मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मला आशा नाही, उमराव जानचा सूर हवा आहे. त्यावर त्या म्हणाल्या की तुमची उमराव जान तर गाऊच शकत नाहीये."

"मग आम्हा दोघांमध्ये एक तडजोड झाली. मी म्हणालो की आपण दोन्ही प्रकारे गाणं रेकॉर्ड करून घेउयात. आशाजींनी मला शपथ दिली की मी त्यांच्या आवाजाच्या पट्टीतही गाणं रेकॉर्ड करणार. तर मी त्यांना शपथ दिली की मला हव्या असलेल्या पट्टीत त्या मनापासून गातील. आशाजींनी 'उमराव जान'च्या सुरात गाणं म्हटलं आणि त्या इतक्या तल्लीन झाल्या की त्यांचं त्यांनाच आश्चर्य वाटलं. असं सगळं होऊन गेलं."

'उमराव जान'साठी खय्याम आणि आशा भोसले या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

आपल्या 88व्या वाढदिवसानिमित्ता बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की , उमराव जानला संगीत देण्यापूर्वी ते खूप घाबरले होते कारण काही दिवस अगोदरच पाकिजा चित्रपट आला होता आणि त्याचे संगीत एक मैलाचा दगड ठरले होते.

चित्रपटांना संगीत देताना सोबतच्या कलाकारांसोबत असे अनेक किस्से खय्याम यांच्यासोबत घडले. ते कसंही करून आपल्या गायकांचं मन वळवून घेत पण आपल्या गाण्याच्या चालीबाबत ते अगदी ठाम असंत.

इतिहासात डोकावून जर खय्याम यांच्या चित्रपट कारकीर्दीविषयी बोलायचं तर त्यांची कारकीर्द सुरू झाली 1947 मध्ये 'हिर रांझा' या चित्रपटापासून. त्यानंतर त्यांनी रोमियो जूलियट चित्रपटाला संगीत दिलं आणि गाणंही गायलं.

1950 मध्ये त्यांनी बीवी या चित्रपटाला संगीत दिलं. त्यातील मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'अकेले में वो घबराते तो होंगे' या गाण्यामुळे खय्याम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

1953 मध्ये आलेल्या फुटपाथ चित्रपटाने खय्याम यांना यांना ओळख मिळाली.

1958 में 'फिर सुबह होगी' मध्ये त्यांनी मुकेशसोबत 'वो सुबह कभी तो आयेगी' हे तयार केलं. 1961 मध्ये त्यांनी 'शोला और शबनम' मध्ये रफीसोबत 'जाने क्या ढूँढती रहती हैं ये आँखें मुझमें' हे गाणं आणलं. तर 1966 मध्ये त्यांनी 'आखिरी खत' चित्रपटातून लतासोबत 'बहारों मेरा जीवन भी सवारो' हे लोकप्रिय गाणं आणलं.

ख़य्याम यांनी 70 आणि 80 च्या दशकात कभी-कभी, त्रिशूल, खानदान, नूरी, थोडी सी बेवफाई, दर्द, आहिस्ता आहिस्ता, दिल-ए-नादान, बाजार, रजिया सुल्तान यासारख्या एकासरस एक चित्रपटांना अजोड संगीत दिलं. हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता.

खय्याम यांची प्रेमकहाणी

खय्याम यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांची विशेष भूमिका राहिली. ते स्वत: सार्वजनिक कार्यक्रमातही या गोष्टीचा उल्लेख करायला विसरत नसत. जगतीत कौर स्वत: एक उत्तम गायिका राहिलेल्या आहेत.

निवडक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम गाणी गायली आहेत. 'बाजार'मधील 'देख लो हमको जी भरके' किंवा 'उमराव जान'मधील 'काहे को बयाहे बिदेस'ही गाणी त्यांनी गायली.

श्रीमंत शीख कुटुंबातून आलेल्या जगजीत कौर यांनी खय्याम यांच्याशी तेव्हा लग्न केलं जेव्हा ते आपल्या करिअरमध्ये संघर्ष करत होते. म्हणतात ना धर्म आणि पैसा दोन प्रेमींमध्ये अडथळा बनू शकत नाही, तसंच काहीसं झालं.

दोघांची संगीताच्या निमित्तानं एकदा भेट झाली होती. पण एकदा मुंबईमध्ये जेव्हा वार्षिक संगीत स्पर्धेसाठी जगजीत कौर यांची निवड झाली तेव्हा त्यांना खय्याम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तेथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.

जगजीत कौर स्वत: चित्रपटांपासून दूर राहिल्या पण खय्याम यांच्या चित्रपटांमध्ये जगजीत कौर त्यांच्यासोबत संगीतावर काम करत असत.

जेव्हा 2013 मध्ये खय्याम यांचे पुत्र प्रदीप यांचा मृत्यू झाला तेव्हा या दोघांसाठीही तो अत्यंत वेदनेचा काळ होता. मात्र प्रत्येक अडचणीत जगजीत कौर यांनी खय्याम यांची साथ दिली.

दोघांची प्रेमकहाणी पाहून असं वाटतं की जगजीत कौर यांनी खय्याम यांच्यासाठीच त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हे गाणं गायलं असावं...

"तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो

तुम्हें ग़म की क़सम, इस दिल की वीरानी मुझे दे दो

मैं देखूँ तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती है

कोई दिन के लिए अपनी निगहबानी मुझे दे दो"

जेव्हा 'तो' शिक्का पुसला गेला

येथे 1976 चा चित्रपट 'कभी-कभी'च्या उल्लेखाशिवाय खय्याम यांची कहाणी अपूर्ण आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत खय्याम म्हणाले, "यश चोप्रा यांना त्यांच्या चित्रपटासाठी माझं संगीत हवं होतं. मात्र सर्व जण त्यांना माझ्यासोबत काम न करण्याचा सल्ला देत होते. ते मला म्हणालेही होते की चित्रपटसृष्टीतील लोक म्हणतात की खय्याम कमनशिबी माणूस आहे, त्यांचं संगीत लोकप्रिय होतं पण, चित्रपट ज्युबिली हिट नाही होत. पण मी यश चोप्रा यांच्या चित्रपटाला संगीत दिलं आणि तो चित्रपट डबल ज्युबिली चालवून लोकांची तोंडं बंद केली."

खरोखर साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि खय्याम यांच्या संगीताचा साज चढलेले कभी-कभी चित्रपटातील हे गाणं अप्रतिम आहे.

येथे या गाण्याच्या ओळी ओठांवर येतात....

"मैं पल दो पल का शायर हूँ"…..

"कल और आएँगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले

मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले

कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे

मसरूफ़ ज़माना मेरे लिए, क्यूँ वक़्त अपना बर्बाद करे

मैं पल दो पल का शायर हूँ...

खय्याम जरी संगीतप्रेमींना सोडून गेले असले तरी पण त्यांचं अजरामर संगीत ते या संगीतप्रेमींसाठी मागे ठेऊन गेले आहेत.

तो काळ ज्याला हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, त्या काळाला जोडणारा अखेरचा धागा खय्याम यांच्या जाण्याने तुटला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)