You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाना पाटेकर यांनी अमित शहांना भेटण्यामागे राजकीय अर्थ?
अभिनेते नाना पाटेकर यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे त्यामागे नवी राजकीय गणितं असावीत अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकेकाळी मनसे आणि मनसेप्रमुख यांच्यांशी वैचारिक जवळीक असणारे नाना पाटेकर आता भाजपच्या वाटेवर असावेत अशी चर्चा आहे.
नाना पाटेकर आणि अमित शहा यांच्या भेटीमागे अर्थ असावा असं म्हटलं जात असलं तरी नाना पाटेकर यांनी ही वैयक्तिक कामासाठीची भेट होती असं सांगितलं आहे. तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क केले जात आहेत. 'राजनिती', 'देऊळ' आणि इतर काही चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी राजकारण्यांची भूमिका केली होती. आता नाना पाटेकर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही राजकीय नेते होतात का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
नाना पाटेकर यांनी या आठवड्यामध्ये कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त प्रदेशाला भेट देऊन मदतीची घोषणा केली होती तसेच त्यांच्या 'नाम फाऊंडेशन'ला मदत करण्याचं आवाहनही लोकांना केलं होतं.
राज ठाकरे आणि नाना पाटेकर
यापूर्वीही राज ठाकरे यांनी आपल्या अभिनय आणि नाम फाऊंडेशनच्या कामाबरोबर अनेकदा आपली मते स्पष्ट मांडली आहेत. त्याचे राजकीय वर्तुळात पडसादही उमटले होते. 2017 साली नोव्हेंबर महिन्यात फेरीवाल्यांच्याविरोधात मनसेने घेतलेल्या भूमिकेबद्दल एका कार्यक्रमात आपले मत मांडले होते.
ते म्हणाले होते, "सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, अतिक्रमण नसावं असं माझंही मत आहे. पण दोनवेळच्या माझ्या भाकरीसाठी मी (भाजीवाले) काम करत आहे. ते जर नाही मिळालं तर मी तुमच्या हातचं हिसकावून घेईन, त्यामुळे मला काम करू द्या. इतकी वर्ष कार्पोरेशननं का नाही जागेची आखणी केली? फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. आपण कार्पोरेशनला याचं उत्तर विचारलं नाही."
यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना भर कार्यक्रमात त्यांची नक्कल करून उत्तर दिलं होतं. तसंच 'महात्मा नाना पाटेकर' अशा शब्दांमध्ये त्यांचा उल्लेख केला होता.
"माहीत नाही अशा गोष्टीत चोंबडेपणा करणं नाना पाटेकरनं थांबवावं" असा सल्ला राज यांनी दिला होता.
राज यांनी भर कार्यक्रमात अशा प्रकारे खिल्ली उडवल्यावर नाना पाटेकरांनी त्यांचं (राज ठाकरेंचं) काहीच नुकसान झालं नाही पण त्यांचं एक मत कमी मात्र नक्की कमी झालं अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली होती. यामुळे नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असावा असं मानलं जातं.
'मीटू' प्रकरण
त्यानंतर 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने नव्याने केल्याने खळबळ उडाली होती.
"नाना पाटेकर बॉलिवुडमधील अनेक महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, पण यावर कुणाची बोलायची हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकावल्याचंही", तनुश्रीने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
नाना पाटेकर यांच्याविरोधात 'मीटू' मोहिमेमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी आरोप केल्यावर राज ठाकरे यांनी नाना पाटेकर असे वागणार नाहीत असे सांगितले होते. "नाना पाटेकर कधीकधी मूर्खपणा करतो, कधीकधी उद्धटपणा करतो, वेड्यासारखा करतो. तो उत्तम कलाकार आहे सगळं खरं आहे. पण नाना अशी काही गोष्ट करेल असं मला वाटत नाही", असं जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं.
यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या कार्यक्रमात आपल्यासाठी शरद पवार आदर्श असल्याचं मत व्यक्त केलं होतं.
तेव्हा नाना म्हणाले होते, "नकळत्या वयात आपल्याला हिरो लागतो, आदर्श लागतो. तेव्हा शरदराव (पवार) माझे हिरो होते, आदर्श होते. माणूस काहीतरी करून दाखवेल असं वाटायचं" अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच अजित पवार यांचंही त्यांनी कौतुक केलं होतं.
"अजित माझा कालही मित्र होता, आजही आहे आणि उद्याही राहील. जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे काही मागेन त्या दिवशी माझ्यावर माझ्या किंमतीचा टॅग लागेल. आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला आहे. यापलिकडे देवाकडेही काही मागण्याची गरज नाही. उद्या अजितकडे काही मागितलं तर तो नाही म्हणणार आहे का?" असं म्हणून अजित पवार यांची फिरकी घेतली होती.
'नाना भाजपचे मित्र म्हणून कार्यरत होऊ शकतात'
नाना पाटेकर यांच्या भेटीमागे काही राजकीय अर्थ असावेत का याबाबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "नाना पाटेकर महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. त्यांचे सगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. विचारसरणीच्या दृष्टीने शिवसेना-मनसे यांच्याशी त्यांची जवळीक दिसते. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि अन्य नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. भाजप प्रवेश किंवा निवडणुकीच्या रिंगणात थेट उतरण्यापेक्षा 'फ्रेंड्स ऑफ भाजप' अशा स्वरुपात ते दिसू शकतात."
नाना पाटेकर यांच्या भेटीमागे त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामाचाही संदर्भही असू शकतो अशी शक्यता देशपांडे यांनी व्यक्त केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकांआधीही भाजपच्या नेत्यांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली होती. नाना पाटेकर-अमित शहा त्यांची भेट अशा उपक्रमाचा भाग असू शकते.
नाना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या अनुषंगानेही ही भेट असू शकते. निवडणूक लढवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला नाही. पूर्णवेळ राजकारणाऐवजी भाजपचे मित्र म्हणून ते कार्यरत होऊ शकतात. मात्र त्यांच्या भेटीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही."
मनसेशी संबंध नाही
तर राज ठाकरे यांचा आज मनसेशी काही संबंध आहेत का याबाबत बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, " राज ठाकरे यांचे अनेकांशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत. परंतु नाना पाटेकर यांचा पक्ष म्हणून मनसेशी काहीही संबंध नाही." नाना पाटेकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचं आवाहनही केलं होतं. त्यावरही अनेकदा चर्चा झाल्या आहेत.
आजच्या भेटीबाबात भाजपच्या प्रवक्त्याने बोलायला नकार दिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)