You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
चंद्रपूरच्या नागभीडमधल्या शिवटेकडीला अमित भगतनं पहिल्यांदा भेट दिली, तेव्हा आपल्या हातून अशा कुठल्या पुरातन स्मारकांचा शोध लागेल असं त्याला वाटलंही नव्हतं.
पण पुढची साडेचार वर्षं अमितनं चंद्रपूर व भंडाऱ्यातील गावं पिंजून काढली आणि शंभरहून अधिक एकाश्म स्मारकं हुडकून काढली. त्यानं जमा केलेल्या माहितीने भारतीय पुरातत्व खात्याला संशोधनाची नवी दिशा दिली आहे.
खरं तर अमित एका सरकारी विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी आहे. पण इतिहासाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही. जिथे जाईल तिथे तो ऐतिहासिक स्थळांना भेट देतो. 2014 मध्ये चंद्रपुरात बदली झाल्यावर त्यानं अशीच नागभीडला भेट दिली होती.
अमित सांगतो, "नागभीडच्या शिवटेकडीच्या पायथ्याला काही एकाश्म स्मारकं (Menhirs) आहेत. ती पाहण्यासाठी मी तिथे गेलो आणि यासारखी अजून काही स्मारकं आहेत का? याचा शोध घ्यायला लागलो. इथल्या स्थानिकांना मी याबद्दल विचारल्यावर त्यांनी जंगलात अशी काही स्मारकं असू शकतात असं सांगितले. त्यातील काही लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मी जंगलामध्ये विविध ठिकाणी फिरलो. तेव्हा मला अशी काही ठिकाणं आढळून आली, जिथे मोठ्या प्रमाणात एकाश्म स्मारकं होती."
महापाषाणयुगात मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्या दफनस्थळी लहान मोठ्या दगडांचा खच करून त्यामध्ये एक मोठा दगड उभा केला जायचा, त्यालाच एकाश्म स्मारक किंवा शिलास्तंभ म्हणतात. चंद्रपुर-भंडाऱ्यात सापडलेली एकाश्म स्मारकं ही 1 फुटापासून ते 13 फुट उंचीची आहेत. हे सर्व अखंड शिलास्तंभ आहेत.
चंद्रपूर - भंडाऱ्यामधील बृहद्श्मयुगीन संस्कृतीचा शोध
अमितनं चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये अशी आठ नवी स्थळं शोधून काढली आहेत. यामध्ये चंद्रपुरातील डोंगरगाव, नवखळा, कोरंबी, कसरला, बनवाही, मांगली तर भंडाऱ्यातील, चांदी, चन्नेवाडा या गावांतील स्मारकांचा समावेश आहे. मात्र ही गावं शोधण्यासाठी 700 ते 800 गावं पिंजून काढावी लागल्याचं तो सांगतो.
फक्त एकाश्म स्मारकच नाहीत तर इतिहासपूर्वकाळातील अनेक दगडी रचना अमितनं शोधल्या आहेत. चंद्रपूरच्या जंगलांमध्ये सापडलेली ही स्मारकं महापाषाणयुगातील म्हणजे ती जवळपास 3000 वर्षांपूर्वीची आहेत. या स्मारकांमध्ये एकाश्म स्मारक (Menhirs), शिलावर्तुळ (Cairn circle), शिलाप्रकोष्ठ (Dolmen) तर काही शिलापेटिका (Capstone) असे दफनाचे प्रकार आहेत. अमितने 150 हून अधिक शिलास्तंभ, शिलावर्तुळे - 7, स्लॅबवर्तूळ - 33, शिलापेटिका - 35 शोधल्या आहेत.
अमितने विविध ठिकाणी शोधलेली स्मारकं
यापूर्वीही सापडलेत अवषेश
यापूर्वी नागपूरात काही शिलावर्तूळांचे उत्खनन केल्यानंतर त्यामध्ये अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे दफन केलेले मानवी अवशेष सापडले आहेत. मात्र जे शिलाप्रकोष्ठ अथवा एकाश्म स्मारकं आहेत यांची उत्खननं फार कमी प्रमाणात झाली आहेत.
कारण हे अत्यंत कमी प्रमाणात आढळतात. मात्र असा समज आहे की ही मुख्य दफनं नसून ती केवळ स्मारकं असतील. म्हणजेच मृत व्यक्तीची आठवण म्हणून ही स्मारकं उभी केली असावीत. तर काही एकाश्म स्मारकाखाली दफनंसुध्दा सापडली आहेत.
अजूनही काही ठिकाणी सुरू आहे ही प्रथा
गडचिरोलीतील काही भागात तसेच छत्तीसगड, झारखंडमधील काही समुदायांमध्ये अशा प्रकारच्या परंपरा अजूनही आहेत.
जिथे आजही लोकं मृतव्यक्तींच्या आठवणीमध्ये दगडांची, लाकडांची स्मारकं उभारतात. जर आजच्या संदर्भात पाहायचं झालं तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींचे स्मारक हे सुध्दा एकाश्म स्मारकाचं प्रतीक आहे.
महापाषाणयुगीन संस्कृती (Megalithic Culture)
महापाषाणयुगाला (Megalithic) महाश्मयुगीन व बृहदश्मयुगीन ज्याला या नावानेही ओळखले जाते. हे नाव त्यांच्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारकं उभारण्याच्या पद्धतीमुळे मिळाले. मानवी सांस्कृतिक इतिहासात महापाषाणयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे.
त्याचं कारण म्हणजे या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महापाषाणयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा आताही मोजक्या ठिकाणी प्रचलित आहेत.
महापाषाणयुगीन दफनांचे प्रकार
भारतात महापाषाणयुगीन दफनांच्या विविध पद्धती आढळून येतात. त्यामध्ये शिळावर्तुळे (Cairn Circles), गर्त वर्तुळे (Pit Circles), शिलाप्रकोष्ठ (Dolmens), शवपेटिका (Cists), उभी एकाश्म स्मारके / शिळास्तंभ (Menhirs) हे प्रकार आढळून येतात.
यापैकी विदर्भात शिळावर्तुळे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तुलनेने शिलाप्रकोष्ठ व गर्त वर्तुळे कमी प्रमाणात आणि शवपेटिका व एकाश्म स्मारके तुरळक प्रमाणात आढळतात. त्यामुळे साहजिकच चंद्रपूर जिल्ह्यातदेखील मोजकीच एकाश्म स्मारके आढळून आल्याचे पुरातत्व संशोधकांनी नमूद केले आहे.
भारतातील महापाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष
भारतातील महापाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात उपलब्ध झाले आहेत. दक्षिण भारतातील केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा या भागांत महापाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांनी उभारलेली दफने मोठ्या प्रमाणावर आजही पहायला मिळतात.
दक्षिण भारत सोडून ती राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्मीर व बिहार येथेही अस्तित्वात आहेत. अलीकडेच ईशान्य भारतात आढळून आलेली महापाषाणयुगीन स्मारके ही इ.स 900 मधील असल्याचे सिद्ध झाले आहे. आजही महापाषाणयुगीन स्मारके उभारण्याची प्रथा मध्यभारतातील गोंड, झारखंडमधील मुंडा आणि मेघालयातील खासी या आदिवासी जमातीमध्ये आढळून येते.
जागतिक स्मारकं
महापाषाणयुगीन काळातील सर्वात प्रसिध्द स्थळ म्हणजे ब्रिटनमधील स्टोनहेंज हे आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून याची नोंद केली आहे. जगभरात साधारणतः इसवी सन पूर्व दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीची अशी स्थळं जगभरात आढळून येतात. ती युरोपातही आहे, आफ्रिकेतही आहेत आणि आशियाखंडातही आहेत.
भारतात अशाप्रकारची स्थळं प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळून येतात. तर महाराष्ट्रात जवळपास अंदाजे सर्वाधिक स्थळं ही पूर्व विदर्भात आहेत.
अमितने भारतीय पुरातत्व विभागाकडे दिलेल्या माहितीनंतर पुरातत्व विभागातर्फे यावर संशोधन होणार आहे. नागपूर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी सांगितलं की, "विदर्भामध्ये दहा वर्षापूर्वी अशा प्रकारची एकाश्म स्मारकं फार कमी होती. मात्र असं लक्षात आलं की, जो जंगलव्याप्त भाग आहे तिथे असा प्रकारची स्मारकं मोठ्या प्रमाणावर आहेत. शासनाकडून या सगळ्या स्मारकांची पाहाणी करण्यात येत आहे.
"यामध्ये भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण यांनी या ठिकाणांची पाहाणी केलेली आहे. तसेच गवेशणाचा एक मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. राज्य शासनाकडून या भागाची आम्ही पाहाणी केलेली आहे. यामध्ये प्रथम त्या स्मारकांचे, दफनभूमीचे डॉक्यूमेंटेशन करणे, त्यांची मोजमाप घेणे आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावशेष आहेत का? ते किती जुने आहेत या सर्वांचा विचार करून आम्ही तसा प्रोजेक्ट हातामध्ये घेणार आहोत."
महापाषाणयुगीन संस्कृतीचा प्रभाव व निरंतरता
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा येथील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील माडिया गोंड जमातीमध्ये आजही मृत व्यक्तीला दफन करून त्याच्या स्मरणार्थ असे शिलास्तंभ उभारण्याची प्रथा आहे. मृतात्म्याचे दैवतीकरण आणि मृत्यूनंतरच्या जगाबद्दलचे कुतुहूल यातून ही प्रथा उदयास आलेली दिसून येते. यात त्या दफनभूमीचे पावित्र्य सुद्धा अभिप्रेत असल्याने त्यास विलक्षण महत्व आहे.
इतिहासपूर्व काळातील या प्रथा आजही आपल्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात ठळकपणे अबाधित राहिल्याचे दिसून येते. मग तो "शहीद स्मारक" वा "अमर जवान" म्हणून हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांचा स्मारक शिलास्तंभ असो वा 'शक्तिस्थल' म्हणून ओळखला जाणारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा स्मारक असो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)